A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय शंकरा गंगाधरा

जय शंकरा ! गंगाधरा !

गौरीहरा, गिरिजावरा !
विपदाहरा, शशिशेखरा !

विष प्राशुनी जगतास या
दिधली सुधा करुणाकरा !
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वराविष्कार- पं. राम मराठे
पं. राम देशपांडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मंदारमाला
राग - अहिर भैरव
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
शशिशेखर - शंकर.
ज्या देशातील भगवंत, निष्काम कर्मयोगाचा संदेश देणारा पूर्णावतार, आधी गोकुळ वृंदावनातील बन्‍सी बजैय्या आहेत..
जेथील सर्व विद्यादायिनी देवता 'वीणावर-दंड-मंडितकरा' अशी कला-विलासिनी आहेत..
जेथील सर्व वैराग्यशील महर्षीदेखील ब्रह्मवीणेच्या नादब्रह्मांत तल्लीन होणारे संगीतशास्‍त्रज्ञ आहेत..
.. त्या देशाची महान संगीत परंपरा काय वर्णावी? ह्या परंपरेत संगीताला 'पंचम वेदा'ची पदवी प्राप्त करून देणारे थोर गायक नि नायक होऊन गेले. त्यांच्यापैकी दोन-तीन गायकांच्या जीवनातील काही प्रसंगांचे आधार घेऊन मी हे स्वतंत्र नाटक लिहिले आहे. अर्थात ह्यात काही गवयांच्या जीवनातील प्रसंग आणि स्वभाववैशिष्ट्ये यांच्या छटा कोठे कोठे आढळल्या तरी ह्याचे कथानक पूर्णत: काल्पनिक आहे.

हे कथानक इ. स. १७०० ते १८०० च्या दरम्यान, राजपुतान्यातील एका राज्यात घडले असल्याचे गृहीत धरले आहे. जनास विटलेल्या, स्‍त्रीद्वेष्ट्या संगीतकाराचे भाव-भक्तीच्या बळावर झालेले मधुर परिवर्तन रेखाटणे, एवढेच या कथानकाचे मुख्य उद्दिष्ट, मुख्य सूत्र आहे. नाटक महान संगीतकाराचं नि संगीतविषयक असल्याने, त्यात संगीताच्या विविध आविष्कारांना अग्रहक्क मिळणे क्रमप्राप्त ठरते. म्हणूनच कथानक मध्ययुगीन असूनही.. दरबारी राजकारणाशी संबंधित असूनही.. ते शक्य तेवढे साधे नि सरळ ठेवण्याचा प्रयत्‍न आहे.

याला व्यावहारिक कारणही आहे. किंबहुना आजकाल संगीत नाटक लिहू धजणार्‍या सर्व लेखकांना ताप देणारी ही अडचण आहे. तिचा निर्देश या ठिकाणी थोडक्यात करणे गैरवाजवी ठरणार नाही.
जुनी संगीत नाटके 'अविहितगतयामा रात्रिरेवव्यरंसीत्‌' या थाटात 'रात्रीचा समय सरुनि उष:काल' येईपर्यंत चालत ! पण तो जमाना गुजरला. आजचा प्रेक्षक तिसर्‍या (म्हणजेच बहुधा अखेरच्या !) अंकात चुळबुळ करीत प्रियेला 'पहा' म्हणतो, ते रंगभूमीवरच्या रंगदार उष:कालाला उद्देशून नव्हे, तर मनगटावरील घड्याळाला ! अशा या माफक रसिकतेच्या काळात, संगीत नाटके चार तासांच्या आत संपतील अशा बेताने लिहिणे, हे कठीण कर्म झाले आहे. हिशेब करा, नाटक संगीतमय असेल तर त्यात (अंकागणिक ५ या हिशेबाने) किमान १५ पदे येणारच. आणि प्रत्येक पदास ५ मिनिटे धरली, तरी ७५ मिनिटे गायनालाच खर्ची पडणार. त्यात दोन मध्यंतराच्या २०-२५ मिनिटांची भर. यात सुमार अडीच तासच गद्य-विभागाला, संभाषणांना, मिळतात. साहजिकच, इच्छा असूनही जुन्या घरंदाज नाटकांप्रमणे कथानकाची गुंतागुंत वाढविणे अशक्यप्राय होऊन बसते. मग रसाची चर्वणा कोठली? मधुर फळांचा रसदेखील प्रथम यंत्राने बाटल्यांत नि नंतर बाटल्यांनी घशात घटघटा लोटण्याचा हा काळ !
रसिक जनतेने, चोखंदळ टीकाकार-वर्गाने आणि कलाप्रिय सरकारने ही परिस्थिती लक्षात घ्यावी.
असो. संगीत नाटकांची परेशानी सविस्तर सांगण्याचे हे स्थळ नव्हे. एरव्ही, रूप-अभिनय-गायन ह्या तिन्ही गुणांचा संगम असलेल्या नटनटींची दुर्मिळता, 'संगीताचा वापर म्हणजे जुनाटपणा, लेखणीचा कमकुवतपणा', 'संगीत हे रंगभूमीला मारक आहे', इत्यादि निराधार अपसमज, यांबाबातही विवेचन करावे लागले असते.

सांगण्याचा मुद्दा एवढाच की, अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ 'संगीत नाटक'च नव्हे तर संगीताचे नाटक लिहिण्याचे धारिष्ट्य मी केले आहे. अनेक गुरूजनांच्या नि मित्रजनांच्या सहकार्याने पहिल्या प्रयोगाच्या मुक्कामापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आशा आहे, 'पंडितराज जगन्‍नाथ', 'सुवर्णतुला' ह्या माझ्या संगीत नाटकांप्रमाणेच हे नाटकही आपणां रसिकांच्या पसंतीस उतरेल. आपणांस विनंती हीच की जर या 'मंदारमाले'त काही गुण नि गंध असेल, तर ती आपण कंठस्थ कराल.
(संपादित)

विद्याधर गोखले
'मंदारमाला' या नाटकाच्या खुद्द नाटककार लिखित प्रस्तावनेतून.
सौजन्य- विद्यानंद-सरस्वती-प्रकाशन

  इतर संदर्भ लेख

 

  पं. राम मराठे
  पं. राम देशपांडे