A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जीर्ण पाचोळा पडे तो

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास.

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखीं दडवुं द्या जगासी
सूर्य गगनांतुनि ओतुं द्या निखारा
मूक सारें हें साहतो बिचारा !

तरूवरचीं हंसतात त्यास पानें
हंसे मुठभर तें गवतही मजेनें
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शान्‍त !

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धांवत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा, घेरुनीं तयातें
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठें !

आणि जागा हो मोकळी तळाशीं
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी !
गीत - कुसुमाग्रज
संगीत - वसंत प्रभु
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १६ फेब्रुवारी १९३४.
क्षुब्ध - अशांत.
कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' हा काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत 'पाचोळा' या कवितेवर मी थोडेसे लिहिले होते. 'विशाखा' प्रसिद्ध झाल्यावर सुप्रसिद्ध कवी मायदेव यांनी आपल्या परीक्षणात या कवितेचे मी केलेले विवेचन चूक आहे, असे सांगून आपण स्वत: लावलेला तिचा अर्थ विशद केला. तो अर्थ मला न पटल्यामुळे मी खुद्द कवींनाच याबाबतीत कौल लावायचे ठरविले. कवींचा निकाल माझ्या बाजूनेच होणार, अशी मला खात्री होती ! पण..

कवींनी मला ती कविता कशी स्‍फुरली हे सांगितले, तेव्हा या परीक्षेत मी व मायदेव दोघेही नापास झालो आहोत, हे मला कळून चुकले. हा गमतीदार गोंधळ वाचकांच्या लक्षात यावा, म्हणून आधी ती कविता देऊन मग आमचे तिघांचे तीन अर्थ सांगतो.

आडवाटेला दूर एक माळ । तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगुनिया पदास । जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपीत जीवनासी । निशा काळोखी दडवुं द्या जगासी
सूर्य गगनांतुनि ओतुं द्या निखारा । मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने । हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात । परि पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत । येइ धावत चौफेर क्षुब्धवात
दिसे पाचोळा, घेरुनी तयाते । नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी । पुन्हां पडण्या वरतून पर्णराशी !

कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांत दलितवर्गाविषयी जी गाढ सहनुभूती प्रकट झाली आहे, तिचा मनावर परिणाम झाल्यामुळे असेल, किंवा मी म्हणतो ती कल्पना या कवनात नकळत आविष्कृत झाल्यामुळे असेल, ही कविता मी पहिल्यांदा वाचली, त्यावेळी तिच्यातला 'पाचोळा' हे दलितवर्गाच्या जीवनाचे प्रतीक आहे, या जाणिवेने मी तिचा बौद्धिक आनंद उपभोगला. अर्थात या कवितेचे रसग्रहण करताना 'दलिताच्या पोटी जन्माला आलेल्या गुणी माणसालाही दलितच व्हावे लागते. आर्थिक, बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा एकसुद्धा मार्ग आम्ही त्यांना मोकळा ठेवलेला नसतो. पहिला पाचोळा उडून गेला, की पुन्हा तुथे जसा पाचोळा साठतो, तसे त्यांचे जीवन आहे', असे मी लिहून गेलो.

या कवितेतली 'आडवाटेला दूर एक माळ' ही पहिली ओळ वाचताच जे चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले, ते समाजाने दूर लोटलेल्या दलितांच्या वस्तीचे होते. कवीच्या प्रतिभेची प्रकृती या चित्राला पोषक अशीच असल्यामुळे, रसग्रहण करताना वाट चुकून आपण भलतीकडे जात आहो, अशी मला त्यावेली पुसटसुद्धा शंका आली नाही. मायदेवांनी जेव्हा माझ्या विवेचनावर आक्षेप घेतला, तेव्हा कुठे मी जागा झालो.

त्यांच्या दृष्टीने ही कविता मी पुन्हा वाचून पाहिली. पण त्यांनी तिच्यावर बसविलेला अर्थ काही केल्या पटेना. 'पाचोळया'त नेहमी दिसणार्‍या सृष्टिक्रमाचे सरळ वर्णन आहे, असा त्यांच्या म्हणण्याचा आशय होता. हिवाळ्यात पिकलेली पाने झाडावरून गळून पडायची, उन्‍हाळ्यात झाडांवर नवी पालवी यायची, हळूहळू तिचे पानांत रूपांतर व्हायचे. पावसाळ्याअखेर वादळी वार्‍याने खाली पडलेला पाचोळा दूर उडून जायचा आणि पुन्हा पुढच्या हिवाळ्यात वरची पाने पिकून खाली गळून पडायची, हे निसर्गाचे रहाटगाडगे कुणाला माहीत नाही? पण केवळ त्याचे चित्र रेखाटण्याकरता कवीने ही कविता लिहिली असावी, असे मला मुळीच पटेना.

सृष्टिसौंदर्याने मोहित होऊन 'अरुण', 'संध्यातारक', 'श्रावणमास' इत्यादी कविता बालकवींनी लिहिल्या आहेत. सौंदर्याची विलक्षण मोहिनी हीच तिथे कवीची प्रेरकशक्‍ती आहे. 'पाचोळा' ही कविता वाचून जी उदासीनपणाची छाया मनावर पसरते, तिचा सौंदर्याच्या साक्षात्‍काराशी मुळीच संबंध नाही. म्हणून कविमनाला शल्याप्रमाणे बोचणार्‍या जीवनातल्या कुठल्यातरी दृश्याचे ते आलंकारिक चित्रण असले पाहिजे, असा माझ्या विचारसरणीचा रोख होता.

आचार्‍यांच्या गर्दीत जसा स्वयंपाक बिघडतो, तसा टीकाकारांच्या कोलाहालात काव्यरस बेचव होण्याचा संभव असतो. म्हणून मी माझी शंका खुद्द कवीपुढेच मांडली. मी कवितेचा केलेला अर्थ अयोग्य वाटत नाही, असे ते म्हणाले; पण कविता लिहिण्याच्या वेळी त्यांच्या मनात जी कल्पना घोळत होती, ती मात्र सर्वस्वी निराळी होती, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मूळ कल्पनेतला वृक्ष म्हणजे संसार ! जुनी पिढी हा या वृक्षाच्या खाली पडलेला पाचोळा. पाचोळ्याला हसणारी झाडावरची पाने म्हणजे तरुण पिढी. आता कवितेतला चौफेर धावत येणरा क्षुब्ध वारा कोण, हे सांगायलाच हवे का? त्याचे नाव मृत्यू. तो वारा झाडाखालचा पाचोळा भराभर उडवून नेतो. पण खालची रिकामी झालेली जागा वरून गळून पडणार्‍या पानांनी पुन्‍हा भरून निघते.

कुसुमाग्रजांच्या या स्‍पष्टीकरणाचा फायदा घेऊन ललित​वाङ्मयाच्या निर्मितीविषयी विद्वान टीकाकार पुष्कळ काथ्याकूट करू शकतील. त्या क्षेत्रात शिरण्याचा माझा अधिकार नसल्यामुळे या कवितेपासून मी फक्त एक धडा शिकलो. तो म्हणजे, उत्कृष्ट ललित​वाङ्मयातली सूचकता कलेच्या दृष्टीने सौंदर्यपोषक असली, तरी ती दुर्बोध होऊ शकते. अशा वाङ्मयाचे रसग्रहण करणार्‍या विवेचनामुळे मूळ सौंदर्याच्या नाजूकपणाला थोडा धक्का पोचण्याचा संभव असला, तरी ते करणे आवश्यक आहे.
अंधुक सौंदर्यदर्शनापेक्षा सुबोध रसग्रहणानेच सामान्य वाचक त्या कलाकृतीचा उत्कृष्ट उपभोग घेऊ शकेल.
(संपादित)

वि. स. खांडेकर
सुवर्णकण
सौजन्य- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.