A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झाली पहांट झाली पहांट

झाली पहांट, झाली पहांट

विरे काळोखाचा वेढा
चांद वळला वांकडा
वाजे राउळीं चौघडा, डुले दारीचा केवडा
भवती जंगल दाट

साद घालितो कोंबडा
'उठा नयन उघडा'
पहा उजळल्या कडा, पडे प्राजक्ताचा सडा
खचली पाऊलवाट

घरघर घरोघरीं
सूर मंजुळ लहरी
तरंगत वार्‍यावरी जाती पहिल्या प्रहरी
गाती सृष्टीचे भाट

जातां गुंजती गौळणी
मंद पैंजणपावलीं
कटि कुंभ आंदोलती, गानीं गुंग भृंगावली
बोले पाणियाचा घाट

झोपडींत मायलेकीं
दळताती सासूसूना
तुझे पाऊल पडूं दे अंगणांत नारायणा
उजळित पुढली वाट
कटि - कंबर.
भाट - स्तुतिपाठक.
राऊळ - देऊळ.
राजा बढे यांच्या माहेराच्या पहिल्या गाण्याला - 'माझिया माहेत्रा जा' - पु. ल. देशपांडे यांनी फारच रसानुकूल चाल लावली आहे. त्यांचेच प्रात:कालचे वर्णन ज्या कवितेत आहे - 'झाली पहाट झाली पहाट' - तिची चाल अशीच देशपांड्यांनी लावली होती. ती अर्धवटच राहिली होती. ती त्यांनी ज्योत्‍स्‍नाबाईंना शिकवली पण होती. मी ती पुरी केली ती त्याच अंगाने. 'जातां गुंगती गौळणी' या ओळीपासून माझी चाल सुरू होते. या ओळीच्या आधी काही नुसते स्वर मी घातले.. 'गुंगती' या शब्दाशी जमविण्याकरिता आणि एक मधुर आलाप होकारावर 'मंद पैंजणपावलीं' ह्या पुढील ओळीच्या आधी घातला.. आणखी सौंदर्य निर्माण करण्या करता !
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.