A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झुलतो बाई रास-झुला

झुलतो बाई रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वार्‍याची वेणु, फांद्यांच्या टिपर्‍या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा

प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरी सावळा

गुंतलास कोठे नंदनंदना तू
राधेच्या रमणा केव्हा येशील तू
घट झरे, रात सरे, ऋतू चालला
रमणा - पती / प्रिय.
वेणु - बासरी.
'जानकी' चित्रपटात एक रासाचं गाणं हवं होतं. मराठी भावगीतविश्वात रासाचं गाणं म्हणून कविवर्य सुरेश भटांच्या 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' ह्या गीताचं स्थान काही वेगळंच आहे. त्याचं स्मरण होणं अपरिहार्य होतं. साहजिकच तोच आकृतिबंध मनात घोळू लागला आणि 'रंगला ग रास सखि, रास रंगला' अशा मुखड्याचं एक गीत लिहिलं गेलं. गीत छान जमलं होतं, हृदयनाथांनाही ते पसंत पडलं. ते चाल करण्याच्या विचारात होते.. तेवढ्यात सहज म्हणून आम्ही दोघे महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत 'जानकी'चं चित्रीकरण चाललं होतं, ते पाहायला गेलो. सगळ्यांच्या गाठीभेटी.. गप्पाटप्पा.. नृत्यदिग्‍दर्शक नायडू तिथे हजर होते. त्यांनी विचारलं, "ते रासाचं गाणं तयार झालं का?" तयार झाल्यापैकीच आहे, असं सांगितल्यावर ते "मग ठीक आहे", असं म्हणून जाऊ लागले. त्या 'मग' शब्दाने कुतुहल चाळवलं गेलं. त्यांना त्या गाण्यासंदर्भात काहीतरी सुचवायचं असावं हे ध्यानात येऊन मंगेशकरांनी त्यांना बोलतं केलं.. तेव्हा नायडू म्हणाले, "काय आहे, ही सगळी रासाची गाणी एकाच 'खेमटा' ह्या तालावर बनतात. प्रत्येक वेळी नृत्यरचना वेगळी काय करावी ते कळत नाही.. पण तालच जर वेगळा आला तर.." त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नक्कीच होतं. तिथून निघताना हृदयनाथ मला म्हणाले, "उद्या भेटा.. आपण काही वेगळं सुचतंय का ते पाहूया !" दुसर्‍या दिवशी प्रभुकुंजमध्ये गेलो. तेव्हा हृदयनाथांनी नवीच चाल ऐकवली. ती खरोखरीच वेगळी होती. मग मीही पहिलं लिहिलेलं गीत पुसून मनाची पाटी कोरी स्वच्छ केली आणि त्या स्वररचनेला नव्याने सामोरा गेलो. त्या चालीमधल्या लयीच्या हिंदोळ्यातूनच हे शब्द आले.. 'झुलतो बाई रासझुला..' गीतासाठी एक वेगळा दृष्टीकोनही सुचला.

राधेच्या आयुष्यातली एक कृष्णमय अवस्था अशी आहे की तिला कुठल्याच बाह्य साधनांची गरज उरलेली नाही. तिच्या अंतरंगात तिला जडलेल्या कृष्णछंदाचा रास अखंड चालू आहे आणि त्यात तिला साथ आहे केवळ निसर्गाची.. लख्ख पौर्णिमेची रात्र.. स्तब्ध यमुनाकाठ.. पूर्ण एकान्‍त.. पण तरीही रास रंगतच चाललाय; वार्‍याची वेणू झालीय; फांद्यांच्या टिपर्‍या ताल धरताहेत, सावल्यांचा गोफ विणला जातोय. भाळावर चंदेरी टिळा लेऊन सारी रात्रच कृष्णरूप भासतेय.. आणि तरीही कृष्णाची उणीव आहे आणि प्रतीक्षाही..

ह्या प्रसंगासाठी प्रथम लिहिलेलं गाणं आपल्या परीने चांगलंच होतं. पण 'झुलतो बाई रासझुला' लिहिताना मी त्यापेक्षाही चांगला व्यक्त झालो होतो आणि अधिक सकसही.
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख