जिंकू किंवा मरू
लढती सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू
देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
हानी होवो कितीही भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | छोटा जवान |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
तसू | - | दोन बोटांचे माप. |
संगर | - | युद्ध. |
वसंतराव देसाई यांचं एक खूप प्रसिद्ध झालेलं त्यावेळचं समरगीत म्हणजे,
'माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू'
हे गाणं प्रथम रेडिओसाठी तयार केलं गेलं व मी त्याचा प्रमुख गायक होतो. रेडिओ रेकॉर्डिंगच्या वेळी माझ्याबरोबर इतर बरेच मान्यवर गायक-गायिका कोरस म्हणायला होते. पण नंतर त्याची रेकॉर्ड निघाली ती महेंद्र कपूर यांच्या आवाजात. पण रेकॉर्ड व्हायच्या अगोदर माझ्या अंदाजाप्रमाणे किमान ५०-६० वेळेला तरी मी सार्वजनीक ठिकाणी गायलो होतो. वल्लभभाई स्टेडियमवर पाठीमागे २००० मुलांना घेऊन सोलो गाणारा प्रमुख गायक मीच होतो. वसंतराव देसाई हुशार व कल्पक होते. व्यावसायिक वादक येऊ शकत नव्हते म्हणून पोलीसबँडच्या कलाकरांना घेऊन यायचे. त्यांना तेवढी लाईन वाजवायला लावायचे आणि तेवढ्या मोठ्या मैदानावर गाणं दणकन जोरात होई. वसंतरावांची आणखी कल्पकता म्हणजे शाळेतल्या संगीत शिक्षकांचं ते शिबीर घेत. सर्व शिक्षकांना ते गाणं स्वत: शिकवीत व मग त्यांनी आपापल्या शाळेतील सर्व मुलांना ते गाणं शिकवायचे. असं ते गाणं मुलांच्या कोरस आवाजात व्हायचं. मुलंही मोठ्या प्रेमाने म्हणायची; अगदी शिस्तबद्धतेने ! समरगीतं कशी असावीत व कशी गावीत याचा मला तो वस्तुनिष्ठ पाठ होता.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.