पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे
गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | पूरिया धनाश्री, श्री |
गीत प्रकार | - | भावगीत |
पाचोळा | - | वाळून खाली पडलेली झाडांची पाने. |
सुमन | - | फूल. |
सराई | - | धर्मशाळा / विश्रांतीस्थळ. |
पण शेवटी आपल्या अनुभवांची पण एक चाकोरी बनून जाते, नाही का? या चाकोरीबाहेर नेऊन, संगीताच्या विश्वातला सर्वस्वी नवा अनुभव मला एका संगीतकारानंच दिला. एका परदेशी संगीतकारानं ! आणि त्यानं लावलेल्या स्वरांच्या आणि स्वररचनेच्या त्या अर्थानं मी अक्षरश: थरारून गेलो. त्याची कथा अशी-
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. पुणे आकाशवाणीवर संगीत संयोजक म्हणून मी काम पहात होतो. त्यावेळी 'जिवलगा'ची ध्वनिमुद्रिका नुकतीच रसिकांसमोर आली होती.
शान्ता शेळके यांची सुमधुर भावपूर्ण कविता, आशाताईंचा भावव्याकूळ स्वर आणि बाळासाहेबांची कल्पक स्वररचना असा सुरेख मेळ जमून गेला होता. पूरिया धनाशी, श्रीगौरी इत्यादी सायंकालीन रागांची छाया सार्या गीतावर उदासीनतेचा रंग गहिरा करीत होती. मोजक्याच वाद्यांचा वापर गाण्याच्या वातावरणाला मोठा पोषक होता. या गीतानं आल्याआल्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
अर्थात या गीतालाही नावं ठेवणारे, नाकं मुरडणारे काही महाभाग होतेच. पण सगळं काही छुपकेछुपके ! सरळ टीका करायची कुणाचीच हिंमत नव्हती. कारण बाळासाहेब म्हणजे सुगम संगीतातल्या राजघराण्यातील राजकुमार होते. अनभिषिक्त राण्यांचे लाडके बंधू ! त्यांच्यावर टीका करून त्या राजघराण्याचा आणि त्या राण्यांचा रोष ओढवून घ्यायला कोणीच तयार नव्हतं.
खासगीत मात्र खालच्या आवाजात हेच लोक कुजबुजायचे, "ती सरगम नसती तर बरं झालं असतं. मोठा रसभंग होतो त्यामुळं." किंवा एखादा म्हणायचा, " ते स्वरमंडल कशाला वापरलंय? हल्ली फॅशनच झाली आहे स्वरमंडल घ्यायची." असे आक्षेप ऐकायला मिळायचे. मला स्वत:ला ते गाणं खूप आवडलं होतं आणि मी ते अगणित वेळा ऐकलं होतं. प्रत्येक वेळी मला त्यात वेगळी सौंदर्यस्थळं जाणवत होती. मोकळा वेळ मिळाला की त्या गाण्याचे स्वर आठवून त्यांचा आनंद मनात घोळवायचो.
माझ्याप्रमाणेच हे गाणं असंख्य श्रोत्यांना अमाप आवडलं होतं. याचा पुरावाच होता माझ्याजवळ. 'आपली आवड' या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाचं नवीन बोधसंगीत तयार करून तो कार्यक्रम मी सादर करीत होतो, तेव्हा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. असंख्य पत्रं आली आणि या पत्रांतून 'जिवलगा'ची मागणी आग्रहानं येत होती.
एके दिवशी मी माझं काम करीत बसलो असताना एक प्रतिष्ठित आणि मान्यवर गॄहस्थ एका परदेशी पाहुण्यांना घेऊन मला भेटायला आले. तो परदेशी गृहस्थ दिसायला अगदी साधा होता. थोडासा बुटकाच ! चष्मा लावलेला. भावपूर्ण डोळे. किंचित पिंगट केस. कपाळ पुढे आलेलं. अत्यंत शांत मुद्रा.
"हे हंगेरियन गृहस्थ आहेत. नामवंत संगीत रचनाकार, संगीततज्ज्ञ आणि देशोदेशींच्या संगीताचे अभ्यासक. त्यांना हंगेरियन शिवाय दुसरी कुठलीच भाषा येत नाही. मी त्यांचा दुभाषी आहे." त्या भारतीय गृहस्थांनी मला इंग्रजीत सांगितलं. माझी पण त्याच्याशी ओळख करून दिली. त्या हंगेरियन माणसाच्या चेहर्यावर आदरभाव पसरलेला पाहून मला बरं वाटलं. माझ्याविषयी बरंचसं बरं सांगितलं गेलं असावं हे मी ताडलं.
"तुम्हाला वेळ असेल तर एक विनंती आहे. हे आजच रात्री परत जाणार आहेत. तुम्ही तासभर वेळ काढून त्यांना आपल्या काही संगीतकारांचं गायन, वादन आणि संगीतरचना ऐकवल्या तर ते कृतज्ञ होतील." ते दुभाषी म्हणाले. "हो. हो. अवश्य. वेळ नसला तरीही हे काम मी आनंदानं केलं असतं. सुदैवानं मला वेळ आहे. चला. स्टुडिओत जाऊ या." मी उठत म्हणालो.
प्रथम मी त्याला काही लोकप्रिय गायक, वादकांच्या रेकॉर्डस् ऐकवल्या. तो ज्या पद्धतीने ऐकत होता आणि प्रश्न विचारत होता, त्यावरून त्यानं भारतीय संगीताविषयी बरीच माहिती आत्मसात केली होती, हे स्पष्ट दिसत होतं. प्रचारातला कोणताही राग ऐकवला की तो कोणत्या वेळेला गायला जातो हे तो अचूक सांगायचा. एवढंच नव्हे तर दरबारी कानडा हा राग तानसेन नावाच्या 'ग्रेट' संगीतकारानं निर्माण केला. त्यातले गांधार आणि धैवत हे स्वर विशिष्ट प्रकारे आंदोलीत करूनच लावतात, हे पण त्यानं सागितलं. यावरून त्यानं भारतीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता, हे स्पष्टपणे कळत होतं. त्याला मी ज्या ध्वनिमुद्रिका ऐकवल्या, त्यापैकी पं. ओंकारनाथांची तोडी आणि मालकंस या ध्वनिमुद्रिका त्याला फार आवडल्या. ओंकारनाथांचा आवाज म्हणजे लाखातला एक आहे, असं तो म्हणाला. उस्ताद करीमखां यांचा आवाज उदास पण रोमॅंटिक आहे, असं त्याचं मत पडलं. सूरश्री केसरबाई केरकर याचं गाणं गंभीर आणि निर्मळ आहे. हरिद्वारच्या गंगेसारखं आहे असं म्हंटल्यावर मी चकितच झालो. त्यानं प्रवास पण केला होता आणि डोळसपणे केला होता, हे त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होतं. पं. रविशंकर यांची सतार, उस्ताद अलि अकबर यांचं सरोद, उस्ताद बिस्मिल्लाह यांची सनई, हे सारं त्याला आवडलं. ऐकताऐकता तो आपल्या डायरीत काहीतरी टिपट होता.
"आता थोडं भावसंगीत किंवा शब्दसंगीत ऐकू या. कवितेचा भाव किंवा सारांश सांगितला तरी पुरे." तो म्हणाला.
"ठीक आहे." मी म्हणालो.
मग मी त्याला काही ठुमर्या ऐकवल्या. बडे गुलाम अलीखां यांची 'याद पिया की आये" ही ठुमरी त्याला फार आवडली. लताच्या आवाजातल्या मदनमोहनच्या रचना पण त्याला खूप आवडल्या. आमची मैफल संपतच आली होती. जाण्यापूर्वी सहज म्हणून मी आशाची 'जिवलगा' ही रेकॉर्ड लावली. ती ऐकताना त्याची तंद्रीच लागली होती. रेकॉर्ड संपली आणि तो तंद्रीतून जागा झाला.
"पुन्हा लावा ! प्लीज !" तो म्हणाला. तो पुन्हा तन्मयतेनं ऐकू लागला, असं चार-पाच वेळा झालं.
"कोण आहे या गीताचा संगीतकार?" त्यानं विचारलं.
"हृदयनाथ ! हृदयनाथ मंगेशकर !"
"थोर आहे. फार थोर आहे." तो मान हलवीत म्हणाला.
"मग आता मी या गीतातल्या कवितेचा अर्थ सांगत नाही. तुन्हाला स्वरातून काय जाणवलं ते सांगा." मी जणू त्याला आव्हानच दिलं होतं.
त्यानं क्षणभर डोळे मिटले आणि एक प्रकारच्या तंद्रीत जाऊन तो सांगू लागला. "मला जाणवलं ते अत्यंत विकल आणि एकाकी स्त्रीचं दु:ख ! अगदी एकाकी आहे ती. कसलं तरी ओझं घेऊन एकेक पाऊल टाकीत ती चालली आहे. हे ओझं कदाचित् गतस्मृतीचंही असेल- " तो दुभाष्यातर्फे सांगत होता.
मी चकित होऊन ऐकत होतो. एक हंगेरियन माणूस केवळ गाणं ऐकून त्या गाण्याचा, चक्क एका मराठी गाण्याचा, मथितार्थ सांगत होता. केवळ स्वर ऐकून !
"ती मधेच सरगम गाते पहा. ती कशासाठी?" मी मद्दामच विचारलं.
"हं. इथं संगीतकारानं फार मोठी कल्पकता दाखवली आहे. ती स्त्री दु:खानं इतकी भारावून गेली आहे, की तिला तिचं दु:ख व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीयेत. मग ती आधार घेते सरगमचा. निरर्थक शब्द ! पण तिचं गहिरं दु:ख व्यक्त करणारी भाववाहक अक्षरं ! शब्दार्थ नस्ल तर स्वरार्थ आहे, भावार्थ आहे." तो मान हलवीत म्हणाला.
त्याचं ते बोलणं ऐकून मी अक्षरश: अवाक् झालो. एका नव्या संवेदनेची तेजोमय शलाका माझ्या सर्वांगाला पुलकित करून गेली. इतक्या वेळा मी ते गाणं ऐकलं होतं; पण हा अर्थ माझ्या मनात कधीच आला नव्हता. जाणीवेच्या याच प्रकाशात जीव-लगा असा तोडलेला शब्द, नवा अर्थ घेऊन, भावसौंदर्याने नटून समोर आला. दु:खाच्या आवेगात कोणीही तुटकच बोलणार. दु:खाची तीव्रता भोगणारा माणूस व्याकरणाचे नियम पाऊन थोडाच बोलणार? त्याला फक्त आपली तीव्र भावना, मिळेल त्या शब्दांत व्यक्त करायची असते. त्या भरातच मग तो (शेक्सपिअरच्या शब्दांत) most unkindest cut असं सुद्धा बोलून जातो.
मी सुन्न झालो. सर्वांग रोमांचित झालं ! त्याच अवस्थेत मी त्याला विचारलं, "या गाण्याचा ठेका एकसुरी आणि कंटाळवाणा नाही वाटत तुम्हाला."
"अगदी बरोबर ! तो तसाच हवा !" तो ठासून म्हणाला. "ठेका, ताल म्हणजे जीवनाची गती. दु:खमय जीवनाची गती कशी असणार? ती कंटाळवाणीच असणार. दिवस आणि रात्र याचं रहाटगाडगंच जणू. संगीतातल्या तालातली 'सम' आणि 'खाली' ही संकलपना मला फार आवडली. दिवस व रात्र, जन्म आणि मृत्यू, तशी 'सम' आणि 'खाली'. वा ! काय कल्पना आहे. तीच कल्पना या संगीतकारानं मोठ्या समर्थपणे वापरली आहे."
"आणि मध्येच येऊन जाणारं स्वरमंडल? तारांचे ते झंकार?"
"त्या आहेत गतस्मृती ! आठवणींचे मधुर झंकार !"
मी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला. It requires a genius to appreciate a genius असं म्हणतात ते अगदी खरं होतं. त्या संगीतकाराचा व्यासंग, कल्पकता आणि संवेदनशीलता यानं मी थक्क झालो होतो. खर्या प्रतिभावंताला दाद द्यायला प्रतिभावंतच लागतो याचा थरारक अनुभव मी घेतला होता. आता जेव्हा जेव्हा मी 'जिवलगा' ऐकतो, तेव्हा तेव्हा तो हंगेरियन संगीतकार डोळ्यांसमोर येतो आणि मी त्या प्रतिभावंताला मनोमनी नमस्कार करतो.
(संपादित)
पं. अरविंद गजेंद्रगडकर
'स्वरांची स्मरणयात्रा' या पं. अरविंद गजेंद्रगडकर लिखित पुस्तकातून.
सौजन्य- उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
म्हटलं तर हे गाणं स्वत:च स्वत:शी गायलेलं आहे आणि म्हटलं तर जिवलगाला उद्देशून गायलं आहे. एकाच वेळी दोन्ही गोष्टी खर्या आहेत. कारण जिवलग प्रत्यक्ष जवळ नाही. त्याला मनातल्या मनात स्वत:शीच घातलेली साद आहे ही. 'जिवलगा !'
सुरुवातच झाली आहे ती एका उत्कट हाकेनं. हाक जिव्हाळ आहे आणि मोकळीही. त्या संबोधनाच्या निर्मळपणाला कशाचाच ढका नाही. ना कोणत्या नात्याचा रंग, ना कोणत्या अपेक्षेचा बंध. नातं असेलही किंवा नसेलही. ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते 'असणं'. अस्तित्व असणं आणि त्या अस्तित्वाचं जिवलग असणं. प्रत्यक्षात सोबत आहे की नाही, हेही महत्त्वाचं नाही.
गाण्याची सुरुवात झाली आहे ती कुणा एकीच्या साद घालण्यानं. साद म्हणजे जणू दोघांमधल्या अंतरावर बांधलेला पूल. किंवा मधल्या अंतरभर पसरून दिलेला आपला जीव. असा जीव पसरला म्हणजे तो जो दुसरा आहे, तो जीवाजवळच असणार कायम. किती साधं, पण किती बोलणारं आहे हे संबोधन.
एकेकदा वाटतं की, प्रत्येक बाईच्या (किंवा खरं तर प्रत्येक माणसाच्याच) मनातळच्या मनात अशा एका जिवलगाची तहान असते. समजून घेणार्याची, आश्वस्त आणि निश्चिंत करणार्याची तहान. ज्याच्यावर निखळ विश्वास ठेवता येईल, ज्याच्यापाशी आपलं सुखदु:ख, आपली हारजीत, आपलं जगण्यामागचं जगणं नि:शंक निरवता येईल अशा अस्तित्वाची तहान. जिथे कोणतेही गैरसमज नाहीत, लपवाछपवी नाही, अहंकार नाही, अपेक्षा नाही आणि स्वार्थही नाही, अशा एका सोबतीची तहान. मग ती साथसोबत करणारं अस्तित्व एखाद्या नात्यातून भेटो किंवा नात्यापलीकडे भेटो. प्रत्यक्षात भेटो किंवा मनोमन मानून भेटो.
जनाबाईनं त्या अस्तित्वाला विठू म्हटलं; दक्षिणेतल्या आंदाळनं त्याला श्रीरंग म्हटलं आणि मीरेनं त्याला गिरीधर गोपाल म्हणून सादवलं. तो विठू, तो श्रीरंग, तो गोपाल प्रत्यक्ष देहानं या तिघींबरोबर नव्हताच. आणि तरीही तो त्यांच्यासाठी प्रत्यक्षाहूनही खरा असा त्यांचा जिवलग होता.
शांताबाईंच्या या गाण्यातला कुणा एकीचा जिवलगही बहुधा तसाच आहे. प्रत्यक्षात तिच्याबरोबर तो नाही आणि तरी ती जिवाचं बोलणं बोलते आहे ते त्याच्याचपाशी.
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
नक्कीच तो जिवलग तिच्याबरोबर नाही. तो सोबतीनं चालत असता तर सगळा भार तिच्या एकटीच्या माथ्यावर कसा आला असता? शिवाय आपलं माणूस बरोबर आहे अशी खूणगाठ मनात असते तेव्हा ओझं हे ओझं वाटतही नाही. ते जडशीळ होत नाही. मुळात ओझं उचलण्याविषयी तिची तक्रार नाहीच आहे. तिनं ते आधीच माथ्यावर घेतलं आहे. आयुष्याची वाट ते ओझं घेऊन एकटीनं चालायला तिनं सुरवात केलीच आहे. पण त्या वाटचालीचा, त्या एकटेपणाचा, त्या ओझ्याचा समंजस आणि स्वाभाविक स्वीकार केला तरी कधीतरी आपला थकवा, आपलं ओझं, आपलं दूर राहिलेलं श्रेय आणि तिथवर पोचण्याच्या वाटेवर दाटून आलेली संध्याकाळ, पायांना जाणवणारे अडथळे, दगडगोटे, काटेकुटे आणि कधीतरी एखाद्या क्षणी वाटून जाणारं अज्ञाताचं भय यांच्याविषयीही कुणाला तरी सांगावंसं वाटतं. शांताबाईंच्या गाण्यातली ती तेच तर सांगते आहे !
किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया
पाचोळा वाजे..
भोवती रान आहे. दाट झाडांची गर्दी आहे. माणसांचे चेहरे नाहीत. ओळखीच्या तर सोडाच, पण अनोळखी माणसांचीही वर्दळ नाही. आणि संध्याकाळ उतरून आली आहे. पाचोळ्यावर भीतीची पावलं वाजताहेत-
गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई
मिटले दरवाजे..
संध्याकाळची वेळ किती विलक्षण असते ! ना दिवस असतो, ना रात्र ! ना उजेड, ना अंधार ! त्यावेळेला गूढतेचा वेढा असतो. सगळ्या निश्चितावर अनिश्चिताची धूसरता पसरलेली असते. पुढे येणार्या अंधाराची एक धडधडती तीव्र जाणीव कधी कधी विकल आणि अस्वस्थ करत राहते.
ध्याकाळची ही कातरता शांताबाईंनी कमालीची चित्रमय करून टाकली आहे या गाण्यात. चित्रातली ती बहुधा अर्धी वाट चालून आली आहे. पण अजून पुष्कळ चालायचं आहे आणि तिची पावलं थकली आहेत. ओझं जडभारी झालं आहे. दिवस मावळत चालला आहे. आतापर्यंतची चालण्याची जिद्द, उमेद, हिंमत आता ओसरल्यासारखी वाटते आहे. तोपर्यंत कदाचित एखादा डोंगर ती सहज चढून-उतरून आली असेल. काट्याकुट्याची पायवाट सहज तुडवून आली असेल. गुडघाभर पाण्यातून, फसणीच्या चिखलातून कदाचित नेटानं पार झाली असेल.
पण आता सांजेच्या काठावरून दिवस बुडत चाललेला असताना दमणूक फार जाणवत असेल. ओझं कुठेतरी उतरवावं असं वाटत असेल. धमनीतलं बळ ओसरत चालल्यासारखं झालं असेल. वाट चालताचालता ओळखीचे चेहरे दिसेनासे झाले. नांदत्या घरांची गावं मागे पडली. सुरक्षितता, आश्रय आणि संवाद यांच्या शक्यता दूर गेल्या. धीर आणि दिलासे द्यायला कुणी भोवती उरलं नाही.
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या समयी
हृदयाला स्पंदविणारे
ग्रेसच्या या ओळी हे गाणं ऐकताना नेहमी माझ्या मनात गाण्यामधल्या गाण्यासारख्या वाजत राहतात.
शांताबाईंच्या या गाण्याचं शेवटचं कडवं शरण्यभावानं फार भिजलेलं आहे. 'घर दूर राहिलं आहे' असं सुरुवातीला म्हणालेली ती गाण्यातली कुणी एकटी शेवटी जिवलगाला 'घरी पोचव' म्हणतच नाहीये. तिला घरी पोचणं शक्य नाही असं लक्षात आलं असेल, किंवा त्याच्या हृदयात तिचं घर असेल, किंवा त्यानं एकदा येऊन, हृदयाशी धरून तिला उगी केल्यावर पुन्हा तिचं ओझं उचलून ती तिच्या घराची वाट एकटीनं चालणारच असेल. कोण जाणे, काय असेल ! पण तिला हवं आहे- निदान त्या निराधार क्षणी, त्या सांजावल्या विकल वेळी हवं आहे ते- त्यानं येऊन क्षणभर फक्त तिला हृदयाशी धरणं.. आणि ते तिचं हवेपण फार खळबळून टाकणारं आहे-
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी
तूच एकला नाथ अनाथा
महिमा तव गाजे..
(संपादित)
अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (२१ मार्च २००९)
(Referenced page was accessed on 9 April 2017)
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.