A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जीवनात ही घडी अशीच

जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचु दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्‍न खेळणे
स्वप्‍नातील चांदवा जिवास लाभु दे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्शातून अंग अंग धुंद होउ दे

पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होउ दे
गीत - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - कामापुरता मामा
राग - यमन
गीत प्रकार - चित्रगीत
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
माझ्या स्वतःच्या स्वररचनांकडे आता त्रयस्थ वृत्तीने पाहिल्यास त्यात पुष्कळ चुका राहून गेल्या असे मानावे लागते. माझ्या बर्‍याचशा रचना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ध्वनिक्षेपित झाल्या. त्यांतल्या काही थोड्याच रचना रेकॉर्डस्च्या रूपाने बाजारात आल्या. त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेमध्ये केवळ चांगली चालच नव्हे तर उत्तम कविता आणि उत्तम गायन यांचाही फार मोठा वाटा आहे. केवळ गायनाच्या दृष्टीने पाहिले तर माझ्या स्वरयोजनेत मलाच फार कृत्रिमता, आडवळण म्हणा हवे तर, जाणवते.

माझ्या बर्‍याचशा स्वरयोजना तपासल्या तर असे आढळेल की, गीतातील शब्द काढून टाकले तर राहिलेले स्वर कुठलेही प्रस्थापित वळण घेत नाहीत. त्यामुळे नुसते सूर गुणगुणायचे म्हटले तर जमणे कठीण होते. कारण माझ्या स्वरचनेतील स्वरांचा ओघ शब्दांच्या शब्दातील अक्षरांच्या वळणाप्रमाणे जातो, जो आत्यंतिक अर्थानुसारी राखण्याचा माझा प्रयत्‍न असतो. आणि अशा प्रयत्‍नांमुळेच मला वाटते की स्वरांची सोपी, ओघवती बंदिश मला कधीच जोपासता आली नाही. जिथे मी सोपेपणा राखण्याचा प्रयत्‍न केला तिथे तिथे आडवळणेच उभी राहिली. त्यामुळेच 'दादाचं घर बाई उन्हात' किंवा 'कोण येणार ग पाहुणे' यासारख्या गीताला सरळ वळणाची, चटपटीत अशी चाल देताना अवघडल्यासारखे झाले.

अर्थप्रधान स्वररचना करण्याच्या आत्यंतिक हव्यासामुळे, ज्यात केवळ स्वरलालित्य आहे, स्वरांचा अतूट असा ओघ आहे, अशा स्वराकृती माझ्या जाणिवेतून निघून जात आहेत की काय असे वाटते.

'कामापुरता मामा' या चित्रपटातील लावणीच्या धाटणीच्या स्वरयोजना फारच कृत्रिम झाल्या आहेत, असे मला वाटते. सजवून स्वर मांडणे हे मला कधीच जमले नाही. त्यामुळेच शब्दावाचून मधुर स्वरसंगीताचा आनंद मला स्वतःला कधीच घेता आला नाही, कधीच देताही आला नाही. संगीत-नियोजन किंवा स्वररचना हा एक आविष्कार आहे, स्वरांचा आणि शब्दांचा. ती एक बंदिश आहे. तरी पण त्यात खुलण्या, खुलवण्याला जागा हवी.

दोन सूर जवळ येण्याने, तिसर्‍या योग्य सुराच्या स्वागताची तयारी होत असते. मी या तिसर्‍या सुराकडे केवळ संगीताच्या दृष्टीने कधी पाहूच शकलो नाही, असे मला वाटते. म्हणूनच रंजकतेसाठी लागणारी सुरांची व्यापक बैठक मी जमवू शकलो नाही की तिचा उपयोगही करू शकलो नाही.

म्हणूनच नेहमी मला मनापासून वाटते की, माझ्या संगीतरचनेचा प्राण हा गीतकाराच्या समर्पक शब्दसौष्ठवाच्या आधारावर उभा आहे आणि गायकाच्या तळमळयुक्त म्हणण्यानेच आविष्कृत झाला आहे. माझ्या यशस्वी रचनांचे वाटेकरी म्हणजे गायक आणि कवी ह्या दोन व्यक्ती; मात्र अयशस्वी ठरलेल्या रचनांचे कारण माझी स्वतःची आकुंचित स्वरसृष्टी, हे मोकळेपणाने कबूल करावेसे वाटते.

शब्दप्रधान गायकीमध्ये शब्दाला प्राधान्य हवेच. आणि ते मी टिकविण्याचा प्रयत्‍न केला आहेच. पण त्याबरोबर विस्तारित गायकीची शक्यता निर्माण व्हायला हवी असेल तर ते मला कितपत जमले असेल, याची मात्र शंका आहे.
(संपादित)

यशवंत देव
शब्दप्रधान गायकी
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.