A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कां रे ऐसी माया

कां रे ऐसी माया । कान्हा । लाविली मला ॥

क्षणभरी सोडुनी दूर तुला ।
राहिना कसा जीव पहा । कां रे सांग राजसा ॥

किती समयीं जरी झाला अबोला ।
जडतो कां तरी छंद तुझा हा ।
ना जाणे कशी वेल्हाळा । झाली वेडी राधिका ॥
जवळ्जवळ दहा वर्षे मराठी रंगभूमीवर वेगवेगळी नाटके आणून 'नाट्य-निकेतने'ने नाट्यक्षेत्रात खूपच आघाडी मारली होती. हे दशक मराठी रंगभूमीवर 'नाट्य-निकेतनचे दशक' म्हटले जात असे. त्याहीपेक्षा हे 'रांगणेकरांचे दशक' असे म्हणण्याकडे नाटय-समीक्षकांचा कल झाला होता. कारण, 'आशीर्वाद'पासून 'एक होता म्हातारा' पर्यंतची सर्व नाटके मीच लिहिली होती आणि दिग्दर्शित केली होती.

त्यानंतरचे 'कोणे एके काळी' हे माझे नाटक १९५० सालच्या जानेवारी महिन्यात रंगभूमीवर आले. त्यातही 'एक होता म्हातारा' नाटकातील ज्योत्‍स्‍ना भोळे आणि चंद्रकांत गोखले हीच जोडी मुख्य भूमिकांसाठी घेतली होती. व्ही. डी. पंडीत हे खरे पाहता या नाटकाचे सूत्रधार होते. त्यांची भाऊकाकाची भूमिका हे या नाटकाचे मुख्य आकर्षण होते. काँग्रेसच्या दैनिकाच्या एका संपादकाच्या पूर्वायुष्यातील रंगेलपणाचा किस्सा हा या नाटकाचा गाभा होता. काँग्रेसवर आणि कम्युनिस्ट पक्षावर या नाटकात केलेली खुसखुशीत उपरोधिक टीका प्रेक्षकांना खूप आवडत असे. या नाटकालाही मा. कृष्णरावांनीच संगीत दिले होते. या नाटकातील खटकेबाज संवादाची अजून काही प्रेक्षक आठवण काढतात.
(संपादित)

मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' या मो. ग. रांगणेकर यांच्या पुस्तकातून. लेखन सहकार्य जयवंत दळवी.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्‌, पुणे

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.