A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काल मी रघुनंदन पाहिले

काल मी रघुनंदन पाहिले
श्याममनोहर रूप पाहता, पाहतची राहिले !

विसरून मंदिर विसरून पूजा
मने पूजिला तो युवराजा
अबोध कसले अश्रू माझ्या डोळ्यांतून वाहिले !

वीरवेष ते तरुण धनुर्धर
जिंकून गेले माझे अंतर
त्या नयनांचे चंद्रबाण मी हृदयी या साहिले !

रुपले शर ते अजुनी खुपती
एक दृश्य ते डोळे जपती
प्रिये मांडवी, जीवित माझे त्यांना मी वाहिले !
मांडवी - जनक राजाच्या धाकट्या भावाची मुलगी. दशरथपुत्र भरताची पत्‍नी.
रुपणे - रुतणे, बोचणे.
शर - बाण.
'सुहासिनी' सिनेमाची गाणी करणे चालू होते. त्यावेळी मी सुधीर फडके यांच्याकडे सहाय्यक, वादक म्हणून काम करत होतो. पेटीवर गाण्याचा कागद दिसला. शब्द लिहिले होते, 'काल मी रघुनंदन पाहिले'. चालीवर विचार करू लागलो.

थोड्या वेळाने फडकेसाहेबांनी विचारले, "काय, सुचते आहे का काही चाल?"

मी "हो" म्हंटले व म्हणून दाखवले. ती चाल, आत्ता जी गाण्याची आहे तशीच होती. पण 'काल मी रघुनंदन पाहिले' हे चारही शब्द एकसारखे, एकाच वजनाचे होते.

फडकेसाहेब म्हणाले, "वा, फारच छान. पण यात आपण एक छोटासा बदल करू. या ओळीतला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो 'काल' हा शब्द. मी नुसतं रघुनंदनांना पाहिलं नाही तर ते 'काल'च.. नुकतंच.. पाहिलं. तेवढी आपण 'काल' या शब्दाला treatment देऊ आणि बाकीचं सगळं तसंच ठेऊ."

फडकेसाहेब हे खरोखरीच अतिशय विचारपूर्वक चाली बांधायचे.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.