A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काल रात सारी मजसी

काल रात सारी मजसी झोप नाही आली
जीव झाला थोडा थोडा ऊर वरखाली !

पती दूरदेशी माझे
रूप माझे मजसी ओझे
मध्यान्हीच्या पारी दारी एक थाप आली !

कशी आत घेऊ चोरा?
कशी उघडू मी दारा?
पांचमाळ्यावरती माझी कोपर्‍यात खोली !

कोण आसुसला पापा
पुन्हा पुन्हा मारी थापा
कलंडले मंचकी मी, मूर्च्छनाच आली !

काच कवाडाची होती
पतंगास कळली ना ती
भरारून तोचि होता येत हो महाली !

काचेवरी त्याची झेप
तीच मला वाटे थाप
अशी तुझी मैत्रिण बाई पांखरास भ्याली !
कवाड - दरवाजाची फळी, दरवाजा.
पतंग - दिव्यावर झडप घालणारा पाखरू.
मूर्च्छना - मूर्च्छा / घेरी / चक्कर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.