A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळीं रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता, दिसे पैलतीर

जन्ममरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडिवार

चराचरा पार न्या हो, जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग', मन करा थोर
ऐहिक - इहलोक संबंधी, सांसारिक / क्षणभंगूर.
कैवल्य - मोक्ष, मुक्ती.
चकोर - चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी.
बडिवार - प्रतिष्ठा / मोठेपणा.
येरझार - खेप.
कधीकधी बाळपणातल्या गोष्टी आठवतात. हरिपूरचं ते शिवमंदिर, तो घाट. सारीकडं माझं शैशव सांडलं आहे. अजूनही ते सारे अत्यंत सजीव क्षण मी उपभोगतो. तिथली ती हरिकीर्तने झांज-पखावाजाच्या आवाजात कानी यायला लागतात. बुबांनी गोरा कुंभार चरित्र लावलं आहे. बायकामुलं समरस झाली आहेत. गोरोबा आपले हात तोडतात तो प्रसंग कथेकरी जशाचा तसा उभा करतात आणि मंदिराची चीप नि चीप एक आर्त दुःखोद्गार काढते. हे सारं मूर्तिमंत माझ्या दिठीपुढे उभं राहातं. त्या वयापासून 'गोरा कुंभार' माझ्या मनाच्या राऊळात उभा होता. तो रंगमंदिरात यायला १९७८ साल यावे लागले. सकलसंत गाथा, अजगांवकर यांनी गोरोबाचे रूप मनात अधिक रेखीय केले.

तरीही मनात प्रश्न उभे होते. बायकोनं शपथ घातली आणि गोरोबा जन्मभर स्वस्त्रीपासून दूर राहिले? मूल पायी तुडवलं ! ग्रामस्थांनी काही शासन केलं नाही? आणि मग विचार करता करता आढळून आलं की पराकोटीची निवृत्ती येत असतानाच हे प्रसंग या संतश्रेष्ठाच्या जीवनात घडून आले. मूळातच भूमिका अशी की स्त्रीविषय, धन, धान्य हे मायेचे बिढार. स्वस्त्रीनं शपथ घातली. 'एका परीनं मोहातून सुटलो' ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली. 'अंतरीचे धावे, स्वभावें बाहेरी' आपोआप गोरोबा संसारपाशातून दूर व्हायला निघाले. बरं मूल तुडवले त्याचं काय? तर यादवकालीन महाराष्ट्राचा इतिहास पाहिला आणि कोडे सुटले. त्या वेळी ग्रामसंस्था अस्तित्वात होत्या. गावकीत 'पंचकारूका'ना महत्त्वाचं स्थान होतं. सुतार, लोहार, कुंभार, चांभार, सोनार यांना लोकप्रतिनिधींचा मान मिळत असे. निश्चितच गोरोबासारख्या महात्म्याला गावातल्या या मंडळींचा पाठिंबा असला पाहिजे. आणि ही हत्या केवळ अपघाताने घडलीय याची जाणीव गावकीतल्या अधिकारी मंडळींना असली पाहिजे. म्हणूनच नाटकात 'गावकी' सतत पार्श्वभूमिसाठी आहे.

संत यशवंत सद्गुणीच्या गाथेत उल्लेख मिळाला की गोरोबांचे हात आले. आणि सावकारपुत्राचे हात तुटले. 'दोन्ही हाती कडी सत्वर । पाहूनिया सावकार । तपासून पाहतो हस्ताला । पंजे कडी जाऊन थोटका झाला ॥' (ओवी ॥ ६६ ॥ (यशवंत सद्गुणी गाथा)) हा उल्लेख उगाच आला असे नाही. दुर्जनांना आपोआप शासन व्हावे, अशी त्यावेळची 'समाजधारणा' होती. गोरोबांना कोणत्या ना कोणत्या प्रकाराने सावकाराने छळले असले पाहिजे. हे मनात पक्के झाले आणि गोरोबा रिणकरी आणि सावकार काही लाचार आश्रितांकरवी त्याला छळतो आहे- असे कथानक उभे करून मी 'नाट्यसंघर्ष' उभा केला आहे.

मात्र गोरोबा सदैव शांत आणि मितभाषीच असला पाहिजे. तो मूळ प्रासादिक कवि आहे. तो क्षूद्र कलह टाळणाराच असला पाहिजे, अशी माझी पूर्ण श्रद्धा अवस्थाने आणि गोरोबांच्याच 'एकत्व पाहतां अवघे लटिके । जे पाहे तितुके रूप तुझे ।' या वचनात तशी ग्वाही मिळाल्याने मी गोरोबा हे पात्र अत्यंत संयमी ठेवले आहे. काहींच्या मते गोरोबा, चिंतु, सावकार यांची खडाजंगी व्हायला हवी. मला हे सारे गोरोबावर अन्याय करणारे वाटले. बाकीची पात्रे मूळकथेने दिली. किंबुहना, केशा आणि मार्तंड हे मी कल्पनेने त्यात उभे केले आहेत. कर्मठता विरुद्ध निरागस भक्ती, असा हा झगडा आहे, हे वाचकांनी ध्यानी घ्यावे.

नाटकातली काही पदे गोरोबा, नामदेव यांची आहेत. बाकी सर्व मी रचिली आहेत. या नाटकाच्या यशात पं. जितेन्द्र अभिषेकीच्या संगीत दिग्दर्शनाचा मोठाच वाटा आहे. तरुण निर्देशक दिलीप कोल्हटकरांनी नाटक अत्यंत सुव्यवस्थित बसवले. श्री. नानासाहेब शिरगोपीकर, बाबा पार्सेकर यांनी नेपथ्य आणि चमत्काराची बाजू सांभाळली. फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, नारायण बोडस, अजित कडकडे यांनी रंगत वाढवली. वैशाली थिएटर्सने अनेक अडचणी सोसून हे 'संगीत नाटक' रंगमंचावर सादर केले. या सर्वांचा आणि नाटकातील लहानथोर कलावंत, तंत्रज्ञ आणि सेवकवर्ग यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तशी मत्स्यगंधेची कथावस्तू मराठी नाट्यसृष्टीला नवीन नाही. मराठी रंगभूमीच्या वैभवाच्या काळात कै. य. ना. टिपणीसांचे 'संगीत मत्स्यगंधा' नाटक गाजून गेले आहे. तरी देखील या कथाभागाने माझ्या मनाची पकड का घेतली याची कारणे, ही दोन्ही नाटके तुलनात्मकदृष्ट्या वाचणार्‍या कोणाही रसिकास सहज उमजू शकतील.

महाभारताच्या आदिपर्वात महर्षी व्यासांनी रंगवलेली 'मत्स्यगंधा' मुळातच उत्कट काव्याला, प्रखर नाट्याला आणि मूलभूत जीवनमूल्यांना आवाहन करणारी आहे. सम्राट शंतनू आणि युवराज देवव्रत यांच्या चौकटीतच आजवर ही 'मत्स्यगंधा' सर्वसामान्य वाचकांनी न्याहाळली आहे. पण मत्स्य्गंधेच्या जीवनकहाणीला प्रारंभी पराशर आणि अखेरीस अंबा, अंबिका, अंबालिका यांची जोड दिल्यानेच तिचे चित्र पुरे होऊ शकते. किंबहुना या संपूर्ण संदर्भातच युवराज देवव्रताचे आणि उत्तरार्धातील पितामह राजर्षी भीष्माचे उच्चार आणि आचार स्पष्टपणे उलगडले जातात. या नाटकाच्या एकूण बांधणीतच सम्राट शंतनूला गौणस्थान येणे त्यामुळेच क्रमप्राप्त झाले आहे. हे नाटक लिहून मी हातावेगळे केले असले तरी त्यातील विषय संपला आहे असे मला वाटत नाही. ही विशेषत: अखेरच्या अंकातील राजकन्या अंबेने माझ्या अंत:करणांत खोलवर घर केले आहे. 'मत्स्यगंधा' संपवितानाच राजकन्या अंबेच्या जगावेगळ्या प्रणयाची आणि सूडाची कहाणी सांगणारे, शरपंजरी पडलेल्या भीष्माची व्यथा आणि वैफल्य रंगविणारे 'शिखंडी' हे नाटक कधीकाळी लिहिण्याचा मी माझ्या मनाशी संकल्प सोडला आहे.

मत्स्यगंधेचा कथाभाग बव्हंशी मी महाभारतातून उचलला असला तरी त्यातील अन्वयार्थाची जबाबदारी अर्थातच माझी आहे.

मराठी रंगभूमीवरील संगीताबद्दल या पूर्वी फार लिहिले गेले आहे. 'संगीताने रंगभूमी मारली' ही हाकाटी ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. पण संगीत नाटकांचे जे अवशिष्ट रूप मी न्याहाळले त्यामुळे माझ्या मनात नाट्यसंगीताबद्दल पराकाष्ठेची प्रीतीच उपजली आहे. संगीत नाटक लिहिण्याचे माझे फारा दिवसांचे एक स्वप्‍न या नाटकाने सफल होत आहे, याचा मला आनंद वाटतो. माझ्या 'मत्स्यगंधेने' संगीताबाबतच नव्हे तर एकूण रंग, रूप आणि आकार याबाबतीत जुन्या अभिजात संस्कृत आणि मराठी नाटकांचा वारसा स्वीकारला आहे. हा वारसा पत्करून मी त्यात नव्या प्रयोगांची भर घातली आहे की नाही हे रसिकांनी ठरवायचे आहे.
(संपादित)

अशोक जी. परांजपे
चैत्र शुद्ध प्रतिपदा
'संत गोरा कुंभार' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.