A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कळीदार कपूरी पान

कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा

बारीक सुपारी निमचिकनी घालुन
जायपत्री वेलची लवंग वरि दाबुन
बांधले तसे या कुडीत पंचप्राण
घ्या रंगत करि मर्दुनी चतुर्दशगुणी सख्या सजणा

कंबरेचा झुलता झोक, नूर बिनधोक उरी मावेना
काजळी नजर छिनिमिनी चांदणी रैना
छेडिता लालडी मुलाम, तुमची गुलाम झाले सजणा
पायिं पैंजण छुन्‍नक छैना
गीत - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- सुलोचना चव्हाण
गीत प्रकार - लावणी
रंगत - मौज.
प्रसिद्ध लावणीगायिका सुलोचना चव्हाण यांच्या ठसकेबाज आवाजातील कविवर्य बढे यांची 'कळीदार कपुरी पान' ही लावणी नभोवाणीवरून वारंवार ऐकू येते. सुप्रसिद्ध संगीतकार श्री. श्रीनिवास खळे यांनी ती स्वरबद्ध केलेली आहे.

ज्यांना ज्यांना कविवर्य बढ्यांचा सहवास लाभलेला आहे, त्यांना त्यांना त्यांच्या विड्याच्या खास रामटेकी पानांच्या आस्वादप्रेमाची कल्पना आहे. मला स्वतःलाही त्यांनी आपल्या संग्रहातील अशी पाने खिलविली आहेत. कविवर्यांच्या वरील रामटेकी पानांप्रमाणेच त्यांच्या कवितांच्या पानांतून उतरलेली आणि रसिकांच्या मनात सतत अवतरणारी 'कळीदार कपुरी पान' ही लावणी माझ्याही लेखी एक यादगार बनून राहिली आहे. सुलोचना चव्हाण यांनी ध्वनिमुद्रित केलेली ही लावणी उत्तमच आहे. परंतु, अनेक रसिक श्रोत्यांना हे माहीत नाही की, सर्वप्रथम जाहीर कार्यक्रमातून याच चालीवर ही लावणी म्हणण्याचा बहुमान कुमुदिनी पेडणेकर या गायिकेला मिळाला होता.

या 'कळीदार कपूरी पान'ची जन्मकथा स्वतः संगीतकार श्रीनिवास खळे यांनी 'अक्षर दिवाळी १९९१' च्या अंकासाठी 'गानगोष्टी' लेख तयार करताना माधव चिरमुले यांना सांगितली, ती खळे यांच्याच शब्दांत,
ती फार मोठी हिस्ट्री आहे. कविवर्य राजा बढे मुंबईला ऑल इंडिया रेडिओवर होते एकदा त्यांनी मला बोलावणं पाठवलं. मी लगेचच गेलो. दुपारचे अडीच वाजले असतील गेल्यापासून मी नुसता बसून होतो. राजाभाऊ अस्वस्थ होते. पण माझ्याशी बोलत नव्हते अखेर पावणेपाच वाजता मी त्यांना विचारलं, "कशाकरता बोलावलंय तुम्ही मला?"
"खळे, जरा गडबड आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता स्काऊट पॅव्हेलियनवर कार्यक्रम आहे. मोरारजी देसाई येणार आहेत. या कार्यक्रमात करण्यासाठी एक गाणं मी शंकरराव कुलकर्णीना दिलं आहे. पण अजून त्यांचा पत्ता नाही. गाणं व्हायलाच हवं. कार्यक्रमाचं लाईव्ह ब्रॉडकास्ट आहे. आता हे गाणं तुम्ही करा."
"अडीच वाजल्यापासून मी इथे नुसता बसलोय; तेव्हाच गाणं दिलं असतं तर मी चाल तरी बांधली असती. आता मी चाल बांधणार केव्हा आणि ती बसवून घेणार केव्हा? बरं, गाणं कोण गाणार आहे?"
"कुमुदिनी पेडणेकर, त्या येऊन बसल्या आहेत वरती." मी कुमुदिनीबाईंना भेटलो. म्हटलं, "गाणं करता-करता बसवून घ्या."
"काय, आता गाणं शिकायचं? साडेसात वाजता कार्यक्रम म्हणजे मला घरी जाऊन तयार होऊन यायला थोडा तरी वेळ नको का? एवढ्या थोड्या वेळात गाणं बसवणार तुम्ही?" त्यांनी विचारलं.
"तुम्ही गाणार का?" मी त्यांनाच विचारलं.
"मी तर गाईन." त्या म्हणाल्या.

वीस मिनिटांत मी गाणं कंपोझ केलं, म्हटलं, "आता टेंशन देत नाही. शिकवत जातो." त्यांनीही गाणं झटपट पिकअप केलं, हा त्यांचा मोठेपणा. फोन करून कार्यक्रमाच्या ठिकाणी सात वाजेपर्यंत पोचतील अशा बेताने २-३ तबले, फ्लूट्स, पेटी ही वाद्यं पाठवायला सांगितली, जास्त वाद्यं घेऊन मधले तुकडे बसवायला वेळच नव्हता.

कार्यक्रम सुरू झाला. अनाऊन्समेंट झाली. संगीत दिग्दर्शक म्हणून शंकरराव कुलकर्णीच नाव घोषित झाल, कारण कॉन्टॅक्ट त्यांच्या नावावर झालं होतं. नंतर मानधन त्यांनाच दिलं गेलं आणि त्यांनी ते घेतलंही.."
(संपादित)

गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.