A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कांदा-मुळा-भाजी

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता ह्मणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥
मोट - विहिरीतून पाणी काढण्याचे मोठे पात्र.
सांवत्याने केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥

आज आषाढ कृष्ण चतुर्दशी, श्रीसंत सांवता महाराजांची ७२३ वी पुण्यतिथी.

श्रीभगवंतांना वैविध्याचे प्रचंड प्रेम आहे. म्हणूनच तर त्यांनी आपल्या प्राप्तीचे असंख्य मार्ग सांगून ठेवलेले आहेत. या सर्व मार्गांचे दिग्दर्शन करण्यासाठी श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने, एकेका महात्म्यांनी अवतरून तो तो मार्ग स्वत: अवलंबून त्याविषयी इतरांना मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हाच जगाचा नियम असल्याने, प्रत्येकाच्या प्रकृतीला अनुकूल होईल, असा उद्धाराचा मार्गही भगवंतांनी निर्माण करून ठेवलेला आहेच. श्रीसंत सांवता माळी महाराज हे श्रीपांडुरंगांचे अनन्य भक्तोत्तम होतेच, पण ते श्रीमाउलींच्या 'कर्मे ईशु भजावा ।' या सिद्धांताचे पालन करणारे होते. त्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारातूनच श्रीपांडुरंगांची उपासना केली. पंढरपुराच्या जवळच असणार्‍या अरण या गावी राहणारे श्री सांवता महाराज, आयुष्यात कधीच पंढरीला दर्शनासाठी गेले नाहीत, असे सांगितले जाते. कारण त्यांचा पांडुरंग त्यांना सदैव समोरच दिसत होता. आपला स्वानुभव सांगताना ते म्हणतात,
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळां ॥४॥

माळियाची जात असल्याने सांवतोबा आपल्या मळ्यातच पंढरीचा अनुभव घेत होते. श्रीगुरुकृपेने त्यांच्या दृष्टीला सर्वत्र ते सावळे परब्रह्मच प्रतीत होत होते. म्हणूनच तर, मळ्यात लावलेला कांदा, मुळा, कोथिंबीर, मिरची ही झाडेही त्यांच्यासाठी विठ्ठलरूपच होती. त्या झाडांची निगा राखण्याची साधने असणारी मोट, मोटेचा नाडा, विहीर हे सर्वच त्यांना पंढरीरूप वाटत होते. सांवता महाराज म्हणतात की, मी असा मळा केला व त्याद्वारेच माझा गळा विठ्ठलपायी गोविला.

गळा हे त्यांच्या सर्वस्वाचे द्योतक आहे इथे. त्यांनी आपले सर्वस्वच विठ्ठलपायी सर्वभावे समर्पिले व त्यामुळे तेही अंतर्बाह्य विठ्ठलरूपच होऊन ठाकले होते. स्वत:च विठ्ठलरूप झाल्यावर, त्या परमात्म्याचा अद्वैताने पूर्णानुभव घेतल्यावर, पुन्हा पंढरीतील विटेवरचा सगुण परमात्मा वेगळा पाहिला काय नि नाही पाहिला काय? काय फरक पडतो? याच भूमिकेने ते कधी पंढरीला गेलेच नसावेत. अर्थात् या गोष्टीला तसा स्पष्ट आधार नाही कुठे. पण म्हणतात की, सांवतोबा कधीच पंढरीला गेले नाहीत, पांडुरंग परमात्माच त्यांच्या भेटीला अरणला येत असे.

"ते पंढरीला कधी गेलेच नाहीत" ही केवळ लोकवदंताच असण्याची जास्त शक्यता आहे. कारण त्याकाळातल्या संतांच्या अभंगांमधून स्पष्ट उल्लेख येतात पंढरीतल्या कार्यक्रमांमधील श्री सांवता महाराजांच्याही उपस्थितीचे. इतर संतांबरोबर तेही सहभागी होत असत पंढरीतल्या उत्सवांमध्ये. श्री सांवता महाराजांच्या ठायी अद्वैताधिष्ठित कर्मयोग पूर्ण बहरलेला होता, हे सांगण्यासाठीच केवळ अतिशयोक्तीने तसे म्हटले जात असावे.

सांवता महाराज सद्गुरु श्री माउलींबरोबर झालेल्या तीर्थयात्रेत सहभागी झाले होते. सर्व संतांसोबत तेही आनंदाने हरिभजनात दंग होत असत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी रचलेल्या 'श्रीज्ञानदेव विजय' या महाकाव्यात त्यांनी सांवता महाराजांचे मनमोहक वर्णन केले आहे. सांवता महाराजांचे रूपवर्णन करताना ते म्हणतात, 'जाडे गोरे उंच विशाल । चंदनचर्चित भव्य कपाळ । स्वर जयांचा अतिकोमल ।' (१२.२९). शरीराने जाड, उंच व विशाल अशा सांवता महाराजांचा रंग गोरा होता पण आवाज मात्र अतिशय सुकोमल होता. अहो, ज्यांच्या हृदयी राजस सुकुमार मदनाचा पुतळा कायमचा विराजमान झालाय, त्यांचा आवाजही सुकोमलच असणार ना ! 'श्रीसद्गुरुकृपेने ज्ञानोत्तराभक्तीची परिपूर्ण प्राप्ती झाल्यावर त्या भक्ताचे अंतर्बाह्य विश्वच प्रेममय होते, मधुरातिमधुर होऊन जाते, त्याचा आवाज अतीव गोड होतो, शरीर लोण्यासारखे मऊ होते', असे प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी 'की भक्तिसुखालागी' या ओवीवरील आपल्या प्रवचनात सांगितलेले आहे.

श्रीसंत सांवता महाराजांनी आपल्या निर्याणाचा अभंगच रचलेला आहे. त्यानुसार मन्मथ नाम संवत्सरात, शके १२१७ म्हणजेच इ.स.१२९५ मधील आषाढ कृष्ण चतुर्दशीला सूर्योदयसमयी वायू निरोधन करून कुंभक साधून त्यांनी आपले प्राण स्वरूपी मिसळून टाकले. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेण्याच्या एक वर्ष आधी श्री सांवता महाराजांचे निर्याण झाले. त्यांची समाधी अरण गावी असून आज तेथे मोठा उत्सव संपन्‍न होतो.

सांवता महाराजांचे समग्र चरित्र हा सद्गुरु श्री माउलींच्या 'तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥' (ज्ञाने.१८.४६.९१७॥) या ओवीचे साक्षात् आदर्श उदाहरणच आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या दिव्य चरित्राचे रोजच्या कर्मांमध्ये मननपूर्वक अनुसंधान ठेवले पाहिजे. म्हणजे मग आपली ती बंधनकारक कर्मेच आपल्या मोक्षाला कारण होतील.

आजच्या पावन दिनी, प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथांनाही आपल्या पोटात लपवून ठेवणा-या परमभागवत श्रीसंत सांवता महाराजांच्या श्रीचरणीं, त्यांचे पावन नामस्मरण करीत प्रेमभावे दंडवत घालू या व त्यांच्या उपदेशानुसार समयाला सदैव सादर होऊन देवांच्याच इच्छेत आपली इच्छा मिळवून राहण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करून आपल्याही आयुष्याचे सोने करू या !
(संपादित)

रोहन विजय उपळेकर
सौजन्य- rohanupalekar.blogspot.in
(Referenced page was accessed on 7 February 2023)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.