A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशि केलीस माझी दैना

कशि केलीस माझी दैना
रे मला तुझ्या बिगर करमेना !
घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना
रे मला तुझ्या बिगर करमेना !

तू राघु तुझी मी मैना
माझं रूप बिलोरी ऐना
अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमति होई ना
चैन पडेना, रे मला तुझ्या बिगर करमेना !

तू हकीम हो‍उनि यावे
एकान्‍ती औषध द्यावे
दे चुंबन साखरपाक, मिठीचा लेप, मजसि साजणा
मनमोहना, रे मला तुझ्या बिगर करमेना !
असाहि आशीर्वाद द्या !

​सार्वजनिक कार्य हा माझा आजवरचा मुख्य छंद. नाटक, त्यांतहि संगीत नाटक, हा दुसरा छंद. व्यवसायाने मी पत्रकार.

आमच्या व्यवसायांत सुट्या फार कमी. रजाहि मुष्किलीनेच घेता येते. गेल्या ३ वर्षांत या व्यवसायाचे नि सार्वजनिक कार्याचे व्याप खूपच वाढले. म्हणूनच नाटय-लेखनाचे अनेक मनोरथ मनांतच राहिले.

​आज मात्र बहुत दिवसांपूर्वी सोडलेला एक संकल्प सिद्धीस जाऊन, 'स्वरसम्राज्ञी' हे माझे १२ वे नाटक मी रसिकांच्या सेवेसी सादर करीत आहे. मग मी आनंदित होणे साहजिकच नाही का ?

माझे एक ज्येष्ठ स्‍नेही श्री. पांडुरंगराव शिरोडकर ह्यांनी सुमारे ७ वर्षांपूर्वी एक विख्यात इंग्रजी नाटक मला वाचायला दिले होते. मला ते खूप आवडले. त्यांतील जिद्दी, सुविद्य नायक नि अशिक्षित गावंढळ पण चुणचुणीत नायिका, अनुक्रमे गायक-गायिका होऊन आपल्या संगीत क्षेत्रांत वावरल्यास काय होईल ? असा विचार मी करू लागलो अन् हे नाटक मनोभूमींत केव्हांच सिद्ध झाले. त्याचा आराखडा कै. केशवराव दाते, श्री. माधव मनोहर, डॉ. श्री. श्रीमाळ इत्यादींना आवडला. त्यांनी उत्तेजनहि दिले. पण नाटक कागदावर प्रकट होऊन रंगभूमीवर यायला इतका उशीर झाला.

आणि कदाचित् याहून अधिक उशीर झाला असता, श्री. जयराम शिलेदार नि सौ. जयमाला शिलेदार ह्या प्रेमळ दांपत्याने नाट्य-लेखनाचा ससेमिरा मागे लावला नसता तर ! त्यांनी त्यांचे मित्र अनंतराव कुलकर्णी ह्यांना मला वेठीस धरण्याच्या कामगिरीवरच नियुक्त केले. पण तेवढ्याने हि कार्यभाग साधला नसता ! 'स्वयंवर', 'मानापमान', 'सौभद्र', 'संशयकल्लोळ' इत्यादि नाटकांच्या द्वारा अलिकडेच रसिकांच्या निर्व्याज कौतुकास पात्र झालेल्या, शिलेदार कुलदीपिका कीर्ति नि लता ह्यांची नाट्य-गान निपुणता पाहून मला हुरूप आला नाटक लिहून झाले. विशेषतः कीर्ति शिलेदारला डोळघापुडे ठेवूनच हे नाटक लिहिले आहे !

कीर्ति-लता-विश्वनाथ बागुल इत्यादि शिलेदारांच्या 'मराठी रंगभूमी'चे गुणी कलाकार घनांधकारातील दीपदर्शनाप्रमाणे वाटले, म्हणूनच मी उत्साहित झालो.

ह्या नवीन मंडळीसाठी लिहिलेल्या नवीन नाटकासाठी मला ताज्या दमाचा, कल्पक संगीत रचनाकार हवा होता. तो माझे मित्र नीलकंठ अभ्यंकर ह्यांच्या रूपाने मला मिळाला. दुधांत साखर पडली. सरळ नि सरस स्वभावाचा हा गुणी कलाकार. श्री. अण्णासाहेब चितळकर (सी. रामचंद्र ) ह्यांच्या हाताखाली संगीत रचनेचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला. शिवाय चांगला गायक. अनेक गानपंडितांकडून मधु-मक्षिका-न्यायाने संगीत विद्या संपादन केलेला, पण आजवर प्रसिद्धीच्या झगमगाटापासून प्रायः दूरच राहिलेला ! अशा या नीळकंठबुवांनी भावानुसारी प्रसंगानुकूल सुरेख संगीत-साज ह्या 'स्वरसम्राज्ञी'ला बहाल केला आहे !

अनेकांचे असे साहाय्य नि सदिच्छा लाभलेली ही माझी सामाजिक संगीत नाट्यकृति, रसिकांची हृदय सम्राज्ञी होवो, अशी श्रीनटेश्वराला प्रार्थना. ज्या रसिकवर्गाने आजवर माझ्या 'पंडितराज', 'सुवर्णतुला', 'मंदारमाला' इत्यादि अपत्यांचे खूप कोडकौतुक केले, त्याच रसिकवर्गाला..

पण हा संगीत नाटकांचा रसिकवर्गच दिवसेंदिवस क्षीण होत चाललाय, असे वाटते. गेल्या १२ वर्षात मी ९ संगीत नाटके लिहिली; कांही संगीत नाटक संस्थांचे कार्य निरपेक्ष बुद्धीने केले; संगीत रंगभूमीवर नवे नवे कलाकार आणण्याचा प्रयत्‍न यथाशक्ति केला. पण अनुभव फारसा उत्तेजक नाही. म्हणूनच माझ्या कांही नाटकांचे शेकडो प्रयोग होऊनहि माझ्या मनाची मरगळ दूर होत नाही ! कारण आता वैयक्तिक यशस्वितेची नि लाभाची ओढच उरली नाही. पण ज्या किर्लोस्कर-देवल-खाडिलकरांची उच्छिष्टे भक्षण करून आम्ही सुखेनैव गुजराण केली, त्यांची गौरवशाली संगीत-नाट्य परंपरा, काळानुरूप नवे रूप धारण करून, (पण मूळचे स्वत्व न सोडतां) वर्धमान होण्याबाबत साशंकता वाटते ! शतक महोत्सवाची मर्यादा उल्लंघिणारी अवघी १२ च संगीत नाटके गेल्या १२ वर्षांत रंगभूमीवर यावीत; नवनवीन नटनटींचा त्यांना फारसा पुरवठा होऊ नये आणि आपल्या मोठेपणाचा डिंडिम पिटणार्‍या नाट्य संस्थांनी व सरकार दरबारांतील महाभागांनी दुय्यम दर्जाचे नागरिकत्व संगीत नाटकांना द्यावे, ह्याचे दुःख होते.

​आज 'सुशिक्षितां'च्या गुणज्ञतेला नि अभिरुचीला उठवळ उल्लूपणाची अशी काही कीड लागत चालली आहे की घरंदाज संगीत रंगभूमीच्या सेवकांना अकबर इलाहाबादीचे उद्गार आठवतात,

कदरनोंकी ​तबीयतका अजब रंग है आज ।
बुलबुलोंको है ये हसरत कि वे उल्लू न हुए ॥

​(गुणज्ञांची मनःस्थिती आजकाल बिलकुल अजब झाली आहे, पालटून गेली आहे. त्यामुळे बुलबुलांना खंत वाटत आहे की 'आपण व्यर्थ उच्च द्विजकुळांत जन्म घेतला. त्यापेक्षा घुवड म्हणून जन्मलो असतो तर जास्त कौतुक झाले असते !')

​​आज ‘स्वरसम्राज्ञी' सेवेसी सादर करताना रसिक मायबापाना हे दुःख सांगायचे नाही, तर कोणाला ?

​मायबापांनो, आपण ह्या नाट्यकृतीला तर आशीर्वाद द्याच, पण असाहि आशीर्वाद द्या की,

​​संगीत नाटक हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे एक अन्यन्य साधारण वैशिष्ट्य आहे. ते जतन करणे व वाढविणे हे माझे ध्येय आहे, धंदा नव्हे. त्यासाठी मी तनमनधनपूर्वक स्वतःला वाहून घेईन' अशी प्रतिज्ञा करणारे ध्येयवादी नट, नाटककार नि नाट्यसंस्था उदयाला याव्यात !
(संपादित)

विद्याधर गोखले
'स्वरसम्राज्ञी' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- जय-किशोर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख