A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे !

काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- पं. जितेंद्र अभिषेकी
रामदास कामत
पं. राम देशपांडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - हे बंध रेशमाचे
राग - भीमपलास
गीत प्रकार - नाट्यसंगीत
आकळणे - आकलन होणे, समजणे.
वंचना - फसवणूक.
श्राप - शाप.
व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं 'तानसेन' हे माझं पहिलं नाटक; पण प्रथम प्रयोगातच ते पडलं. साफ कोसळलं. त्यानंतर माझ्या मनानं नाट्यलेखनाची भीती घेतली. 'तानसेन'नंतर मी परत नाट्यक्षेत्रात पाऊल टाकीन असं वाटलं नव्हतं; पण बेळगावच्या वरेरकर नाट्य संघाचे संस्थापक व माझे स्‍नेही बाळकृष्ण ऊर्फ बाप्पा शिरवईकर यांनी मला परत नाट्यलेखनाला प्रवृत्त केलं. वरेरकर नाट्य संघासाठी मला नाटके लिहावी लागली.

वरेरकर नाट्य संघासाठी लिहिलेल्या 'कांचनमृग' या नाटकाला महाराष्ट्र राज्याचे नाट्यलेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यानंतर 'वारसा', 'धन अपुरे', 'पांगुळगाडा' ही नाटके मी वरेरकर नाट्य संघासाठी लिहिली. या कालखंडात माझे स्‍नेही श्री. मोहन वाघ यांचा नाटकासाठी आग्रह चालू होता. त्या स्‍नेहासाठीच मी 'हे बंध रेशमाचे' नाटक लिहायला घेतले.

एका स्‍नेह्याचा तर आवर्जून उल्लेख करावयास हवा. श्री. वसंतराव देशपांडे यांनी हे नाटक निर्दोष व्हावे, म्हणून सतत परिश्रम घेतले. एवढेच नव्हे, तर या नाटकातील श्रीकांतची भूमिका त्यांनी माझ्या आग्रहाखातर आनंदाने स्वीकारली. संगीताची जबाबदारी जितेंद्र अभिषेकींसारख्या संगीत-अभ्यासू दिग्दर्शकाने उचलली. कवयित्री शांताबाई शेळके यांनी या नाटकातील गीते लिहिली. जितेंद्र अभिषेकी यांच्या मनाजोगी गीते लिहीत असता शांताबाईंना खूप कष्ट सहन करावे लागले. श्री. वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, शांताबाई शेळके, प्रा. मधुकर तोरडमल ही सारी पूर्वपरिचित मित्रमंडळी. या नाटकाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. हे नाटक यशस्वी करण्यासाठी एका भावनेने राबलो. ते दिवस आठवण्यात सुख आहे. त्या दिवसांची आठवण सदैव राहील. या नाटकाच्या यशाचा वाटा त्यांचा आहे.
(संपादित)

रणजित देसाई
दि. ३ एप्रिल १९७४
'हे बंध रेशमाचे' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीची प्रस्तावनेतून.
सौजन्य- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. जितेंद्र अभिषेकी
  रामदास कामत
  पं. राम देशपांडे