A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
केशवा माधवा तुझ्या नामात

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा
कवी रमेश अणावकर यांचं सर्वात प्रसिद्ध गीत म्हणजे, 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा'. या गाण्याच्या निर्मितीबद्दल थोडंसं सांगतो.

या गाण्याला मी चार-पाच चाली लावल्या होत्या, त्याही निरनिराळ्या रागांमध्ये. भैरवीतही चाल केली होती. पण मी विचार केला की भैरवी, खमाज, तिलंग, सारंग हे सर्व राग आधी खूप येऊन गेले आहेत. कुठल्याही संगीतकाराने हे राग सोडलेले नाहीत. त्याच रागांवर आपण चाल करायची तर हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं असं व्हायला नको; म्हणून निराळं काहीतरी करायचं असा विचार केला. मग बिलावल अंगाचा दुर्गा राग मी मनामध्ये ठरवला. ठरवणं सोपं असतं पण प्रत्यक्षात येणं व चांगलं होणं म्हणजे, "वाचा बरी परि करणे कठीण"

दुर्गा रागात अगदी सोपं गीत करण्याचा हा मी प्रयत्‍न केला आहे. त्यावेळी मी दादरला प्रभादेवीच्या देवळामागे राहात होतो. त्या जागेतच रात्री तीन वाजता ही चाल सुचली. त्याआधी कित्येक रात्री उशिरापर्यंत विचार करून निरनिराळ्या रागात चाली लावण्याचा प्रयत्‍न केला होता पण मनाला ते पटत नव्हतं. ही चाल अगदी सोपी होती. यात मी काहीही लयकारीचा प्रकार दाखवला नाही. अगदी सरळ असं गाणं घेतलेलं आहे.

म प ध ऽ म रे प । ध ध पध पध प म रे सारे
ध ध पध पध पम रे सा सा

या मध्ये 'सा' ला महत्त्व आहे. यात मध्यम आला व धैवत पण ! सर्व गाण्यात ध्रुपदात व अंतर्‍यात षड्‌ज, मध्यम धैवत प्रत्येकवेळी प्रामुख्याने दिसतात व तेही विशेष शब्दांवर मांडलेले आहेत. 'केशवा' म्हणताना मध्यमापासून सुरुवात झालेली आहे व धैवत घेऊन षड्‌जावर ती ओळ संपत आहे. त्यामुळे चांगलं वाटतं.

केशवाय नम: । माधवाय नम: । नारायणाय नम: । हे आपण देवासमोर पूजा करताना सुरुवातीला म्हणतो. म्हणून कवीने 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा' अशी अगदी सोपी रचना या गीतात केली. तशीच चालही साधी. सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं इतकं गोड व भावपूर्ण म्हटलेलं आहे की असं वाटतं, त्यांनी ते गाणं गातच राहावं ! आम्ही ऐकत राहावं ! देव किती गोड आहे, किती सुंदर आहे हे नुसत्या शब्दाने वर्णन न करता सुरेल स्वरांत जाणवलं पाहिजे.

मला बरेच जण विचारतात की हे गाणं तुमच्या चालीमुळेच लोकप्रिय झालं का?" तर मी त्यांना सांगतो, "निव्वळ माझ्या चालीमुळेच हे गाणं लोकांना आवडते असे नाही तर यात कवी, संगीतकार व गायिका या तिघांचा वाटा अहे. अणावकरांनी मांडलेल्या 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा' या ओळीतच एवढी धमाल आहे की असं वाटतं या नामाशिवाय जगात दुसर्‍या कशातही हा गोडवा अनुभवायला मिळणार नाही. सुमनताईंनी आपल्या गोड गळ्याने गायलेलं आहे. ऐकताना असं जाणवतं की चांगली चाल, चांगले शब्द व तितक्याच भक्तिभावाने त्या परमेश्वराच्या नावाचं उच्चारण यात आहे. त्यामुळेच ते गाणं खूप लोकप्रिय होऊ शकलं.

सोपी चाल करण्याचा फायदा म्हणजे ते गाणं कुणालाही गुणगुणता येतं. वयस्कर माणसं, तसंच लहान मुलांना पण ते म्हणायला अवघड वाटत नाही. याकरता मी एक प्रयोग करून पाहिला. त्यावेळी माझी मुलगी मला वाटतं पाच-सहा वर्षांची असावी. मी तिला म्हंटलं, "म्हण बघू ग, केशवा माधवा" तर तिने ते चटकन्‌ म्हणून दाखवलं. तिला काही त्रास झाला नाही, अगदी सहज गायली. नंतर अंतरा पण गायला व सहजपणे पालुपदावर आली. मी मनात म्हंटलं इतकी लहान मुलगी हे कसं गाऊ शकली? तिने तर गाण्याच्या परीक्षा वगैरे काही दिलेल्या नाहीत. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे गाणं सगळ्यांना गाता येईल इतकं सोपं झालं आहे. एवढंच काय पण रेल्वेच्या डब्यांतून अंध, अपंग, भिकारी, टाळ-चिपळ्यांच्या साथीने हे गाणं गात भिक्षा मागताना दिसतात आणि लोक त्यांच्या झोळीत ऐपतीप्रमाणे पैसे टाकतात. भले त्यांचे गाण्याचे शब्दोच्चार कसेही असोत. दीनदुबळ्या लोकांच्या पोटापाण्याची सोय या गाण्याने होते आहे, यातच मला समाधान वाटतं.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख