A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
क्षितिजीं आलें भरतें ग

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

क्षितिजीं आलें भरतें ग
घनांत कुंकुंम खिरतें ग
झालें अंबर
झुलतें झुंबर
हवेंत अत्तर तरतें ग

लाजण झाली धरती ग
साजण कांठावरतीं ग
उन्हांत पान
मनांत गान
ओलावुन थरथरतें ग

नातें अपुलें न्हातें ग
हो‍उनि ऋतुरस गातें ग
तृणांत मोती
जळांत ज्योती
लावित आलें परतें ग.

सरिंवर सरी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग.
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - श्रीधर फडके
स्वर- पद्मजा फेणाणी-जोगळेकर
गीत प्रकार - ऋतू बरवा, भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- ४ ऑक्‍टोबर १९५९.
अनिल - वायु, वारा.
खिरते - गळते, पाझरते.
परते - परत / पलीकडे.
सचैल - अंगावरील वस्‍त्रसुद्धा.
पृथक्‌
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

या बा. भ. बोरकर यांच्या 'जलद भरुनि आले' या कवितेच्या पहिल्या दोन ओळी आहेत.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.