A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणी बाई गुणगुणले

कुणी बाई गुणगुणले
गीत माझिया हृदयी ठसले

मोदभरे उमलल्या कुमुदिनी
शांत सरोवरी तरंग उठले

मानस-मंदिर आनंदले
रम्य स्वरांनी मोहित केले

चंद्रकरांनी क्षणोक्षणी
अंबर अवघे पुलकित झाले
गीत - दत्ता डावजेकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर- आशा भोसले
राग / आधार राग - चंद्रकंस
गीत प्रकार - भावगीत
कुमुदिनी - श्वेतकमळाची वेल.
पुलकित - आनंदित.
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.
मोद - आनंद
संगीतकार दत्ता डावजेकर हे गीतकार सुद्धा होते.

कविता जन्मावी लागते. कवी प्रतिभाशाली हवा. कविता ही परमेश्वरी देणगी आहे इ. गोष्टी आपण अनेक वेळा ऐकतो. त्यावर विश्वास ठेवतो. कवी, कविता आणि कवित्व इ. गोष्टींबद्दल अनेक समज, अपसमज, गैरसमज प्रचलित आहेत. आपल्या अंगी कवित्वशक्ती आहे, असे डावजेकरांना काही वाटत नव्हते व त्यामुळे ते कविता, गीते लिहिण्याच्या फंदात ते पडत नसत. गाणे मिळाले की चाल लावणे, संगीत देणे इतकेच त्यांचे क्षेत्र.

एका घाईगर्दीच्या प्रसंगी एक गीत हवे होते. सरकारी मान्यताप्राप्त गीतकाराला हाती धरून त्वरित गीत मिळणे अशक्यप्राय गोष्ट होती. डावजेकर प्रार्थनासमाजच्या नाक्यावर असलेल्या 'रामकृष्ण बुक डेपो'त श्री. बाम ह्या आपल्या स्‍नेह्याकडे गेले. "मला कवितांची पुस्तके हवी आहेत. त्या कवितांमध्ये चांगलेचांगले शब्द हवेत. काही पुस्तके मला निवडून द्या. आपली पुस्तके मी उद्याच परत करीन." डावजेकर बाम यांना म्हणाले व घरी गेल्यावर त्या पुस्तकांमधील चांगले शब्द त्यांनी निवडले. अर्थनिर्मिती होईल अशा ओळी रचल्या आणि गीतकार दत्ता डावजेकरांचे गीत जन्माला आले. 'तुझी अंगकांती रे रंगविती रानची फुले'. मालती पांडे यांनी ते गीत मुंबई आकाशवाणी केंद्रावर गायले व ते खूप लोकप्रिय झाले.

पुढेपुढे जेव्हा प्रसंग येत गेले तेव्हा तेव्हा डावजेकरांनी गीते लिहिली. दत्ता डावजेकरांच्या वहीत जवळजवळ ३०/४० गीते लिहिलेली आहेत. त्यातील पुढील गीते लोकप्रिय ठरली आहेत.
• आली दिवाळी मंगलदायी
• भाऊबीजेला आला माझा भाऊ
• तुज स्वप्नि पाहिले रे गोपाळा
• कुणि बाई गुणगुणले
• मज सुखवितो श्याम मुरारी
(संपादित)

सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.