A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणी जाल का सांगाल का

कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला, तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळिला

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली
गीत - कवी अनिल
संगीत - यशवंत देव
स्वर- पं. वसंतराव देशपांडे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- २८ जुलै १९७०, नागपूर.
झार - (वि.) तंतूवाद्याच्या तारेस झारा लाविला असतां होणार्‍या आवाजाप्रमाणें खणखणीत; उंच आवाजी; पहाडी. (कंठ, तंतुवाद्य इ॰).

कवी अनिल यांच्या 'कुणी जाल का सांगाल का' कवितेतील 'झार' या शब्दाचा कवीला अभिप्रेत असलेला अर्थ स्वत: कवीनेच प्रा. पंडितराव पवार यांना लिहिलेल्या एका पत्रात 'दर्दभरेपणा' असा दिला आहे. ते पत्र संदर्भासाठी आणि अर्थाच्या पुष्टीकरणासाठी या गीताशी जोडलेल्या ब्लॉग विभागात वाचता येईल.

'झार' हा शब्द 'जवार' या शब्दाचा अपभ्रंश असावा.
तंतूवाद्यांमध्ये, विशेषत: तानपुरा (तंबोरा) संदर्भात 'जवार' (जवारी) काढणे याचा अर्थ छेडलेल्या तारेच्या आवाजात श्रवणरम्यता आणि तीव्रता आणणे, असा आहे. ह्याला विज्ञानाचा आधार आहे. तंबोर्‍याची जवार उत्तम असणे हे जसे वाद्य उत्तम असल्याचे लक्षण आहे, तसेच तंबोरा लावणार्‍या कलाकाराच्या कौशल्याचाही तो एक पुरावा आहे. (या माहितीच्या संकलनासाठी मदत केल्याबद्दल अरुणाताई ढेरे व विकास कात्रे यांचे मन:पूर्वक आभार.)

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.