A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लाभले अम्हास भाग्य

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरूलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरांत राहते मराठी
गीत - सुरेश भट
संगीत - कौशल इनामदार
स्वर- आणि सहगायक
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• मराठी भाषा अभिमान गीत.
• गायकांची संपूर्ण यादी ब्लॉगमध्ये.
नग - डोंगर.
रग - ताठा / पौरुष / खुमखुमी.
लता (लतिका) - वेली.
गायकांची संपूर्ण यादी

रवींद्र साठे, आश्विनी भिडे-देशपांडे, सुरेश वाडकर, अशोक पत्की, आशा खाडीलकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, हरिहरन, आरती अंकलीकर-टिकेकर, पं. सत्यशील देशपांडे, श्रीधर फडके, साधना सरगम, शौनक अभिषेकी, संजीव चिम्मलगी, ओंकार दादरकर, सावनी शेंडे-साठ्ये, स्वप्‍नील बांदोडकर, बेला शेंडे, अवधूत गुप्ते, प्रसाद ओक, सुनील बर्वे, शैलेश दातार, सुमीत राघवन, मधुराणी गोखले-प्रभुलकर, सीमा देशमूख, स्वानंद किरकिरे, विठ्ठल उमप, देवकी पंडित, उत्तरा केळकर, रंजना पेठे-जोगळेकर, शरद जांभेकर, रवींद्र बिजूर, महेश मुतालिक, अनिरुद्ध जोशी, सलील कुलकर्णी, माधुरी करमरकर, मृदुला दाढे-जोशी, माधव भागवत, सुचित्रा भागवत, अनघा पेंडसे, वर्षा भावे, भाग्यश्री मुळे, संगीता चितळे, अनुजा वर्तक, सायली ओक, मधुरा कुंभार, आनंदी जोशी, अनघा ढोमसे, महालक्ष्मी अय्यर, मिलिंद इंगळे, अच्युत ठाकुर, अशोक हांडे, उदेश उमप, आदेश उमप, संदेश उमप, नंदेश उमप, वैशाली सामंत, अजय-अतुल, शंकर महादेवन, हंसिका अय्यर, निहिरा जोशी-देशपांडे, अजित परब, हृषिकेश कामेरकर, अमोल बावडेकर, योगिता पाठक, विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार, अमृता नातू, संजीवनी भेलांडे, मिलिंद जोशी, मनीषा जोशी, निलेश मोहरीर, योगिता चितळे, कल्याणी पांडे-साळुंखे, पं. राजा काळे, पं. राम देशपांडे, आनंद सावंत, मंदार आपटे, हृषिकेश रानडे, अभिजीत राणे, जितेंद्र अभ्यंकर, नेहा राजपाल, शिल्पा पै, जानवी प्रभु-अरोरा, स्वप्‍नजा लेले, सोनाली कर्णिक, मिथिलेश पाटणकर, विनय राजवाडे, मयुरेश पै, मनोज देसाई, प्रशांत कालुंद्रेकर, त्यागराज खाडिलकर, अमृता काळे, संदीप उबाळे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि कोरस.