A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लखलख चंदेरी (१)

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हां हां हां

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुम छुम झुम झुम, हां हां

झोत रुपेरी भूमीवरी गगनात
ढवळली सारी सृष्टी नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हां हां

आनंदून रंगून विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेंळवून
एक होऊ या, हां हां
गीत - शांताराम आठवले
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- जयश्री, वसंत देसाई
चित्रपट - शेजारी
ताल-केरवा
गीत प्रकार - चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे
  
टीप -
• सहस्वर- प्रभात फिल्म कंपनीच्या कोरस विभागातील कलाकार- मा. छोटु, बालकराम, मा. परशुराम, जयश्री, माणिक दादरकर (वर्मा), कुमुदिनी पेडणेकर, प्रभा फुलंब्रीकर (वीणा चिटको), वसंत देसाई.
चुडी - मशाल.
सरिता - नदी.
'लखलख चंदेरी तेजाची, न्यारी दुनिया'.. संगीतकलानिधी मा. कृष्णराव यांची ही काळाच्याही पुढे जाऊन केलेली अद्वितीय व अनन्य स्वररचना, आज सुमारे ७० वर्षांनीही सर्वत्र लखलखत आहे. शांताराम आठवले यांनी मास्तरांच्या स्वररचनेवर शब्द रचलेत. हे गीत, चित्रपट संगीत क्षेत्रातील आकाशात एक झळाळणारे नक्षत्र झाले आहे. अनेक माध्यमातून झळकण्याचे भाग्य या गीताला लाभले. त्यामुळे ते 'ब्रँड साँग' झाले आहे. दिवाळीच्या रात्री लखलखत जातात. परंतु एक उत्तर-रात्र अजून लखलखत आहे. ती म्हणजे 'लखलख चंदेरी तेजाची, न्यारी दुनिया' या गीताचा लखलखाट ! माझे वडील - संगीतकलानिधी मा. कृष्णराव, पुढील काळात येणारे संगीत ते आधीच पाहत असत. ते द्रष्टेपण त्यांच्यात होते.

या गीताची निर्मिती व ध्वनिमुद्रण १९४० सालचे व हे गीत असलेला चित्रपट 'शेजारी' प्रकाशित झाला १९४१ साली. (हिंदीमध्ये चित्रपट 'पडोसी' व गीत 'कैसा छाया है' कवि श्री. मुन्शि अजीज) मराठी व हिंदी, दोन्ही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन मास्तरांचेच. मराठी गीतात श्रीमती जयश्री व श्री. वसंत देसाई प्रमुख गायक व हिंदीमध्ये श्रीमती अनीस खातून व श्री. बलबीर, खान मस्ताना हे प्रमुख गायक होते. कोरसमध्येही हे प्रमुख गायक व इतर वादक मंडळीही गात असत. प्रभात फिल्म कंपनीच्या कोरस गायन विभागात श्रीमती माणिक दादरकर (वर्मा), कुमुदिनी पेडणेकर, तुळजा (गायक बालकरामची बहीण), प्रभा (म्हणजे मी) वगैरे आणि श्री. वसंत देसाई, बालकराम, मा. छोटु, मा. परशुराम वगैरे असत. आश्चर्य म्हणजे आवाज कमी पडला तर स्वत: मास्तरही कोरसमध्ये येऊन गात असत. ('माणूस' चित्रपटातील 'कशाला उद्याची बात' व 'गुलजार नार न्यारी' या गीतांमध्ये मास्तरांचा आवाज ओळखता येतो.) मास्तर गीतांच्या चित्रीकरणप्रसंगी आवर्जून उपस्थित राहत.

या गीताच्या चित्रीकरणास मास्तरांनी माझी आई, माझा भाऊ व मला नेले होते. मास्तरांचे वैशिष्ट्य असे की, गीताची स्वररचना, वाद्यवृंद मेळरचना (अरेंजर), वाद्यांवरचे स्वर-समूह (म्युझिक पीसेस) व संपूर्ण ध्वनी संयोजन (सॉफ्ट किंवा लाऊड) हे सर्व तंत्र एकटे मास्तरच सांभाळीत. म्हणून मास्तर हे एकमेव 'परिपूर्ण संगीतकार !', असे आजच्या पाचव्या पिढीतील संगीतकार अनंत अमेम्बल म्हणतात. या गीतातील एक म्युझिक पीस, अरोरा ते खोदादाद सर्कलच्या ट्रॅम प्रवासात भेटणार्‍या कल्याणजीभाईंनी त्यांच्या 'मेरे देशकी धरती' (उपकार) या गीतात वापरलाय. या गीतात वाद्यमेळाच्या लयीत 'क्लॅप्स'चा (टाळ्यांचा) वापर प्रथम मास्तरांनी केला व नंतर पुढे मी केला, असे संगीतकार ओ.पी. नय्यर मला म्हणाले होते. या गीतातील कोरसचे वैशिष्ट्य हे, की तो स्त्रियांच्या 'गळी आवाजात' अतितार सप्तकात गायलाय. पुढील काळात स्त्री-पार्श्वगायनात असा 'गळी आवाज' प्रचलित झाला. या स्त्री आवाजात जयश्रीबाईंचा आवाज सहज ओळखू येतो. या सुमारास त्या मास्तरांकडे दीड वर्षे गायन शिकत होत्या. या गीतात जास्तीत जास्त वाद्ये- विशेषत: ताल वाद्ये वापरली आहेत. मास्तरांनी त्यांच्या कारकीर्दीत वाद्यांचा मोठा संचय प्रभात कंपनीत करून ठेवला. 'शेजारी' चित्रपटातील हे व इतर गीते ऐकण्यासाठी मुंबईहून खास पुण्याला संगीतकार एस. डी. बर्मन आले होते. ते मास्तरांच्या संगीतदिग्दर्शनाचे चाहते होते. हा चित्रपट मुंबईस प्रकाशित होण्याची वाट पाहण्यास ते तयार नव्हते. संगीतकार जयदेव या जुन्या आठवणी नेहमी सांगत असत. या गीतातील वाद्यवृंदात एक स्त्री-वादक म्हणजे मँडोलीन वादक इंदिरा लाटकर, तर बासरी दिनकर अमेम्बल (मास्तरांचे पट्टशिष्य, ज्यांना मा. कृष्णराव 'द सेकंड' असे म्हणत. पुढे त्यांनी आकाशवाणीवर वनिता मंडळाची प्रसिद्ध स्वररचना केली.) तालाची बाजू रुकडीकर, मंगळवेढेकर, भोरपकर, सतार- मंगलप्रसाद, व्हायोलिन- पोरे, ऑर्गन- अष्टेकर (इतर वादकांची नावे आठवत नाहीत) वगैरे. शांतारामबापू (आमचे अण्णा) यांचा काटकसरी स्वभाव असल्याने या म्युझिक डिपार्टमेंटमधील वादक मंडळींना मेकअप करून, वेशभूषा बदलून, दाढीमिशा लावून चित्रीकरणातही सामील करून घेतले होते. बुवा निंबाळकर ढोल वाजविताना, तर वसंत देसाई यांचा बासरी वाजवितानाचा लाँग शॉट होता. या सर्व वादक मंडळींना चित्रीकरणात पाहताना मला अजूनही हसू येते. ही सर्व मंडळी चित्रीकरण पाहत असलेल्या आम्हा भावा-बहिणीकडे पाहून हात उंचावत असत. या सर्वाच्या बरोबरीने माझा भाऊ व मी जागच्या जागी टाळ्या वाजवून नाचत होतो. माझा भाऊ जयश्रीबाईंचा लाडका. त्या त्याला थोपटत असत. नृत्य कलाकारांचा एवढा मोठा जमाव आम्ही प्रथम पाहत होतो. त्यांच्या हातातील पेटत्या मशाली, त्या घेऊन रिंगण घालताना त्यांच्या दिसणार्‍या प्रकाशरेषा किंवा ज्योती, वर्तुळे हा सर्व चमत्कारच वाटला.

जयश्रीबाई व चंद्रकांत यांचा शॉट सुरू असताना, मास्तरांनी गीताचा षड्ज बदलल्यामुळे वेगळ्या स्थळकाळाच्या प्रसंगाला केवढा उठाव आला आहे, हे आजही जाणवते. तो सीनच स्वर्गलोकीचा भासला. एरवी आमच्या घरी गायन शिकायला येणार्‍या साध्या जयश्रीबाई चमचमणार्‍या काचोळी व साडीत अप्सरा वाटत होत्या. त्यांच्यावर आमचेच नव्हे, सर्वांचेच डोळे खिळले होते. जणू चांदण्याचा समूह खाली उतरलाय. त्यांच्या वस्त्रांनी मला वेडं केलं होतं; इतकं की, त्या सुमारास जत संस्थानच्या महाराणींनी मला विचारले होते की, तुझ्या फ्रॉकवर कसला कशिदा काढू? तेव्हा मी म्हटलं की, 'लखलख चंदेरी' सारखा चमचमणार्‍या टिकल्यांचा ! तो अंगात घालून मी जयश्रीबाईंसारखी त्यांच्यासमोर गिरकी मारली. वसंत देसाई म्हणत, की या गीताच्या स्वररचनेचे मास्तरांनी, शांतारामबापूंना यशाबद्दल चॅलेंज दिले होते. (पुढे असेच चॅलेंज मास्तरांनी 'धुंद मधुमती'च्या स्वररचनेवेळी सी. रामचंद्रांना दिले होते, ज्याच्या ध्वनिमुद्रणास अण्णा हजर होते.) आज, लखलख चंदेरीचा रंगमंचावरील प्रत्यक्ष आविष्कार पाहताना शब्द येतात, 'मास्तर तुमच्या शिरपेचातील मानाचा तुरा ही 'लखलख चंदेरी' स्वररचना, ७० वर्षे उलटली तरी १७ वर्षांच्या जयश्रीप्रमाणे गिरकी घेतेय ! मास्तर, ही चंद्ररमणी- स्वररचना अजून
(संपादित)

विणा चिटको
सौजन्य- दै. लोकसत्ता (२२ मार्च, २००९)
(Referenced page was accessed on 09 January 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.