A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ललना देवता जगाची

ललना देवता जगाची,
भूषवि संसाराला !

नभीं जशि चंद्रिका,
हांसरी तारका,
स्त्री तेवि जगताला !
गीत - प्र. के. अत्रे
संगीत -
स्वर- सुरेश हळदणकर
नाटक - जग काय म्हणेल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
चंद्रिका - चांदणे.
तेवि - त्याप्रमाणे, तसे.
पहिली घंटा

हिंदुसमाजांत स्त्री ही सर्वस्वीं पराधीन आहे. धर्माच्या दृष्टीनें, कायद्याच्या दृष्टीने, आणि व्यवहाराच्या दृष्टीनें. आर्थिकदृष्ट्या स्त्री स्वावलंबी झाल्यावांचून ती कोणत्याहि अर्थानें स्वतंत्र होणार नाहीं. गेल्या शतकाच्या अखेरीस पाश्चात्य देशामधली स्त्री पूर्णपणें 'स्वतंत्र' झालेली आहे. पहिलें महायुद्ध संपल्यानंतर या देशामधली स्त्री जागी झाली आणि स्वतंत्र होण्याची तिची धडपड तेव्हांपासून एकसारखी सुरूच आहे. विवाह, पति, सौभाग्य, आणि पातिव्रत्य या गोष्टींना रूढ धर्मानें जीं भावनात्मक स्वरूपें देऊन ठेवलेलीं आहेत, त्यामुळें स्त्री-स्वातंत्र्याचा प्रश्न हिंदु समाजांत तर अत्यंत बिकट होऊन एक भला मोठा अडथळाच होऊन बसलेला आहे. या सर्व प्रश्नांचा विचार स्त्रियांच्या हिताच्या दृष्टीनें व्हायला पाहिजे. पुरुषांनीं आपल्या कपोलकल्पित समजुतींचें जोखड स्त्रियांच्या मानेवर लादण्याचें आतां थांबविलें पाहिजे, पारंपरिक पातिव्रत्याच्या पोलादी पकडींत सांपडलेल्या स्त्रीचा अधःपात कोणत्या मर्यादेपर्यंत होऊं शकतो याचें अत्यंत हृदयभेदक चित्र गडकर्‍यांनी आपल्या 'एकच प्याला' नाटकांत रंगविलेलें आहे. 'एकच प्याला' ही दारूच्या दुष्परिणामाची करुण कहाणी नसून ती 'पातिव्रत्या'च्या दुष्परिणामाची शोककथा आहे, असे मला आतां वाटतें. आर्थिक स्वातंत्र्यासाठीं धडपडणार्‍या जागृत हिंदु स्त्रीच्या जीवनाचें चित्र प्रथम मीं 'घराबाहेर'मध्यें रंगविण्यास सुरवात केली. तो माझा पहिला प्रयत्‍न होता. म्हणून मी जरा बिचकतच होतों. पुढे 'उद्यांच्या संसारां'त त्या चित्राचें हृदयभेदक स्वरूप मीं अधिक धैर्यानें आणि आवेगानें रंगविलें. तें पुष्कळांना अतिशयच आवडलें. तथापि, माझ्या मनाचें मात्र त्यामुळें समाधान झालें नव्हतें, म्हणून इतक्या वर्षांनी पुन्हां हातांत लेखणी धरतांच, तेंच अपुरे राहिलेलें चित्र मनाप्रमाणें या नाटकामध्यें पुरें करावयाचें मीं ठरविलें. स्वातंत्र्यासाठी झगडणार्‍या स्त्रीचें अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिक चित्र या नाटकांत रंगविण्याचा मीं प्रयत्‍न केलेला आहे. मराठी रंगभूमीवरील जागृत स्त्रीची सिंधू, निर्मला, करुणा आणि उल्का, हीं निरनिराळीं उत्क्रान्त स्वरूपें होत असें मला वाटतें. उल्केच्या शोककथेला सद्यःकालीन राजकीय पार्श्वभूमीची जोड मिळाल्यानें तिजमधील कारुण्याला एक प्रकारचें उदात्त स्वरूप प्राप्त झालेलें आहे, असें वाटतें.

दि. २३ मार्च १९४६

दुसरी आवृत्ति
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशांत मोठमोठे बदल घडून आले. माझ्यासारख्या पुरोगामी लेकाकाला आपली राजकीय भूमिका तर आमूलाग्र बदलावी लागली. त्या भूमिकेशीं सुसंगति राखण्यासाठीं म्हणून कांहीं थोडासा शाब्दिक फेरफार मला मूळ आवृत्तीमध्यें करावा लागला एवढेंच काय तें.

दि. १७ मार्च १९५१

(संपादित)

प्रल्हाद केशव अत्रे
'जग काय म्हणेल' या नाटकाच्या पुस्तकाच्या तृतीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.