सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?
जवळ मने पण दूर शरीरे
नयन लाजरे चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे
रंग गालीचा छपेल का?
क्षणांत हसणे, क्षणांत रुसणे
उन्हात पाऊस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणेघेणे
घडल्यावाचुन चुकेल का?
पुरे बहाणे गंभिर होणे
चोरा तुझिया मनी चांदणे
चोरही जाणे, चंद्रही जाणे
केली चोरी छपेल का?
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
मुळात हे गीत 'लाखाची गोष्ट' चित्रपटाकरिता ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलं होते. पण तो प्रसंगच पटकथेतून काढून टाकल्याने ते गीत बाजूला पडले होते. मी जेव्हा ते वाचलं होतं तेव्हाच ते मला खूप आवडलं होतं. माडगूळकरांचे शब्दच इतके भावपूर्ण आणि बोलके असतात की जणू तेच स्वर घेऊन येतात. त्यामुळे माझ्याकडून त्याला फार छान चाल लागून गेली.
प्रथमत: हे गीत माझी पत्नी, कुसुम हिने आकाशवाणीवरून सादर केले. त्याला श्रोत्यांची मिळालेली दाद पाहून आकाशवाणीने ते मालती पांडे या गुणी, गोड गळ्याच्या गायिकेकडून गाऊन घेऊन 'मासगीत' (song of the month) कार्यक्रमात मला ध्वनिमुद्रित करायला सांगितले.
त्या काळी एच.एम.व्ही. ही एकुलती एक ग्रामोफोन कंपनी भारतात होती. या हिरव्या चाफ्याचा सुगंध त्यांचेपर्यंत गेलाच. त्यांनी 'कशी मी सांगू वडिलांपुढे', 'लपविलास तू हिरवा चाफा', 'सत्यात नाही आले, स्वप्नात येऊ का?' आणि 'सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग' अशा ४ गीतांची एक रेकॉर्ड काढली. ही चारही गीतं त्याकाळी श्रोत्यांना फारच आवडली.
गदिमांनी पहिल्यांदा जेव्हा हे गीत आकाशवाणीवर ऐकलं तेव्हा मी भेटल्यावर मला म्हणाले,
"अरे जोगा, मी टाकून दिलेल्या गाण्याचं सोनं की रे केलंस."
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.