तुझं चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग ऽऽऽ
कांती नवनवतिची दिसे चंद्राचि प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
तारुणपण अंगांत झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग ऽऽऽ
रूपसुर्तिचा डौल तेज अनमोल सगुण गहिना
जशी का पिंजर्यांतिल मैना
इच्यासाठिं कितिकांची जनलोकांत झालि दैना
अशी ही चंचल मृगनयना
इच्यासाठिं कितिकांची जनलोकांत झालि दैना
निर्मळ कोमळ तेज ग जैसे तुटत्या तार्याचं
चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग ऽऽऽ
गीत | - | शाहीर होनाजी बाळा |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | अमर भूपाळी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
गहिना | - | दागिना. |
झोक | - | ऐट. |
नवती | - | तरुणी / तारुण्य. |
लटपट लटपट तुझें चालणें मोठें नखर्याचें
बोलणें मंजुळ मैनाचें
वय वरुषें पंध्राचि चंद्राचि प्रभा ढवळी
आकृती लहान दिसे कवळी
दिसे नार सुकुमार मूद राखडी वेणिंत आवळी
नरम गोजरे गाल होट पवळी
रूपस्वरूपाचा झोक दिव्य नारि लोट चवळी
जशि चमके नागीन गवळी
तारुणपण अंगांत नोक मदनाचे जोराचे
बोलणें मंजुळ मैनाचें
डुलत डुलत चालणें बोलणें बहु मंजुळवाणी
नाहिं कोणि दुसरी इजवाणी
इष्कि यार सरदार कैक सोडुन केविलवाणी
हिंडताती वेड्यावाणी
न पडे नख दृष्टींत कुठें सृष्टींत इच्या वाणी
फंदी झुरती मोरावाणी
लखलखाट चकचकाट जैसें दुकान बोहोर्याचें
बोलणें मंजुळ मैनाचें
रूपसुर्तिचा डौल तेज अनमोल सगुण गहिना
जैसि का पिंजर्यांतिल मैना
इच्यासाठिं कैकांची जनलोकांत झालि दैना
अशी ही चंचळ मृगनयना
मर्जि तुटेना भिड लोटेना जाला एक महिना
कधीं ग सांपडसिल निजभुवना
निर्मळ कोमळ कांती जैसे तुटत्या तार्याचे
बोलणें मंजुळ मैनाचें
असें ऐकुनी बोध नारिनें शोध मनीं करुनी
हस्तकीं सखयाला धरुनी
जाइजुईची सेज फुलांची पलंगिं सावरुनी
भोगिला सखा कल्प हरुनी
होनाजिबाळा गुणा आगळा कवीची जडणी
तयाचे जा चरण स्मरुनी
धोंडी सटवा म्हणे बापुची बाजि हरिप वैर्याचे
बोलणें मंजुळ मैनाचें
संदर्भ-
म. वा. धोंडमर्हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई
Print option will come back soon