सेवा मानून घे आई
तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई
तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई
तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | शाब्बास सूनबाई |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत, या देवी सर्वभूतेषु |
अमला | - | देवता लक्ष्मीचे एक नाव / शुद्ध. |
दुरित | - | पाप. |
नायिकेच्या त्या नऊवारी टोपपदरी शालू आणि नथकुंकवापेक्षा तिच्या प्रार्थनेतला हा आंतरिक आर्त पण कणखर भाव तिला तिचं ईप्सित साध्य करूने देतो, हे या गीतातून मी सूचित केलं आहे. ती प्रेमपूर्तीसाठी व्याकूळ आहे पण असुरक्षित नाही. त्यामुळे ती या प्रार्थनेत स्वत:साठी काहीही मागत नाही. तिचं मागणंच असं आहे की ते पुरवल्यावर तिला हवं असलेलं तिचं प्रेय आपसूक तिच्या पदरांत पडेल.
मीनाताईंनी या प्रार्थनेला अत्यंत साधी आणि तरीही किंवा त्यामुळेच अतिशय हृद्य वाटणारी नितांतसुंदर चाल लावली आहे.. गायली आहे अर्थातच लताबाईंनी. 'लता' नावाचा स्वर काहीही मुष्किल पेलू आणि लीलया झेलू शकतो हा तर अगणित वेळेस घेतलेला अनुभव आहे. पण ह्याउलट कसलाही आविर्भाव नसलेले; कसलीही कोडी न घालणारे अत्यंत साधेसरळ शब्द आणि स्वर समोर आले की तोच सूर प्राणांनाही भेदून जातो.
याच्या रेकॉर्डिंगचं एक स्मरण माझ्या डोळ्यांसमोर सचित्र उभं आहे. सामान्यत: रेकॉर्ड झालेलं गाणं ऐकण्यासाठी सहसा कधीही लताबाई थांबल्याचं मी पाहिलं नव्हतं, पण त्या दिवशी त्या आवर्जून थांबल्या. म्हणाल्या, "एकदा ऐकवा बरं !" गाणं ऐकायला ध्वनिमुद्रणकक्षातही त्या आल्या नाहीत. होत्या तिथेच गायिकेच्या जागी उभ्या राहिल्या..
दोन्ही हात तिथल्या एका पार्टीशनवर टेकवून त्यांच्या आधाराने.. आम्हाला पाठमोर्या.. तो रिकामा मोठा स्टुडिओ.. त्यामध्ये त्यांची ती पाठमोरी एकाकी आकृती.. खांद्यावरून लपेटून घेतलेला पदर.. आणि पदराखालून डोकावणार्या दोन लांबलचक वेण्या.. मागे या गाण्याचे घुमणारे सूर.. एखाद्या पोर्ट्रेटसारखं ते नादचित्र माझ्या अंत:करणावर उमटलेलं आहे,
कायमचं..
(संपादित)
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे
सौजन्य- शुभदा मोघे