A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधु मीलनांत या

मधु मीलनांत । या । विलोपले ।
स्मरभाव काय विलोल हे? ॥

सखि बोल जी हो कामना ।
करूं सार्थ त्यासह यौवना ।
प्रणयान्विता । दे धन्यता ॥
गीत - विश्राम बेडेकर
संगीत - मास्टर दीनानाथ
स्वराविष्कार- सुरेश वाडकर
प्रभाकर कारेकर
आशा भोसले
पं. वसंतराव देशपांडे
मास्टर दीनानाथ
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - ब्रह्मकुमारी
राग - शंकरा, मांड
ताल-कवाली
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अन्वित - युक्त.
विलोप - लुटणे / नाश, विध्वंस.
विलोल - चंचल.
प्रसिद्ध पंचकन्यांपैकीं पहिली ब्रह्मकुमारी अहल्या; तिची कथा या नाटकांत मुख्यतः रंगविली आहे. अहल्येच्या कथेचा उल्लेख ऋग्वेदापासून तों थेट पद्म, ब्रह्म, गणेश इत्यादि पुराणांतून आणि महाभारत रामायणादि काव्यें यांतून असा सात-आठ ठिकाणीं आढळतो. या सर्व ठिकाणीं मूळ कथेंतल्या मुख्य घटना बहुधा त्याच आहेत, तरी गौतमाचा व अहल्येचा पूर्वपरिचय, गौतमानें दिलेला शाप इत्यादि बाबतींत निरनिराळीं वर्णनें आढळून येतात. त्यांपैकी महत्त्वाच्या एका फरकाचा उल्लेख केला पाहिजे. कांही ठिकाणी इंद्र वेषांतरित असतांहि अहल्येनें त्याला ओळखले आणि तरीहि ती त्याला विलासलालसेमुळें वश झाली, असा उल्लेख आहे. उलट लोकविश्रुत कथेमध्यें अहल्या पूर्ण निरपराधी मानली आहे. हा फरक निरनिराळ्या ग्रंथांतच आढळतो असें नव्हे. वाल्मीकिरामायणांत या कथेचा उल्लेख बालकांड आणि उत्तरकांड यांतून आला आहे. त्यांत या बाबतींत परस्परविरुद्ध वर्णन आढळतें. कथेच्या या दोन स्वरूपांचे कारण काय असावें, ऋग्वेदांत इंद्राचा जो 'अहल्यायै जार: ' असा गौरवपर उल्लेख आहे, तेथपासून तों प्रचलित कथेंत त्याला दिलेल्या हिडिस शापापर्यंत जे निरनिराळें फरक ग्रंथांतून आढळतात तें त्या त्या लेखकांच्या आणि पर्यायानें त्या काळच्या समाजाच्या स्त्रीपुरुषविषयक नीतितत्त्वांसंबंधींच्या मनोवृत्तींत पडत गेलेल्या फरकाचे कितपत घोतक आहेत, याचें विवेचन करण्याचा या प्रस्तावनेचा उद्देश नव्हे. येथें इतकेंच सुचवावयाचें आहे कीं, पुराणांचे लेखक करीत असलेल्या या महत्वाच्या फरकावरून अध:पतनाच्या वेळीं अहल्येच्या मानलेल्या भिन्‍न वृत्तींमुळे उत्पन्‍न होणारे नीतिविषयक प्रश्न अत्यंत निकटचे असल्याचें त्यांनाहि जाणवलें होतें.

प्रस्तुत नाटकांत अहल्येच्या बाबतींत ती लौकिक समजुतीप्रमाणें पूर्ण निरपराध होती हेंच कथेचें स्वरूप स्वीकारलें आहे. पण कथेच्या दुसर्‍या स्वरूपांत आढळणारा प्रश्नहि महत्त्वाचा असल्यामुळें, त्याचीहि मांडणी बृहस्पतीची पत्‍नी तारा, हिच्या कथेच्या द्वारें केली आहे. अर्थातच नाटकांत रंगविलेल्या तारेच्या जीवनाचें चित्र केवळ वर लिहिल्याप्रमाणेंच एकेरी आहे, असे म्हणण्याचा उद्देश नाहीं. पंचकन्यांच्या श्लोकांतली 'तारा' कोणती, हा प्रश्न येथें अप्रस्तुत आहे. अहल्या आणि तारा यांच्या विवाहजीवनांत उत्पन्‍न झालेले प्रश्न एकमेकांना पूरक असल्याचें, किंबहुना एकांतून दुसरा उत्क्रांत होणारा असल्याचें, सूक्ष्म विचाराअंती आढळून येईल. या दोन कथांच्या द्वारें, कलेला आवश्यक असणारें बरवरचें वैचित्र्य साधून मुळांतल्या एकसूत्रीपणाला बाध न येतां, विषयाला पूर्णता आणतां येत असल्यामुळें, त्यांची नाटकांत गुंफण केली आहे.

हे सगळें विस्तारानें सांगण्याचें वास्तविक फारसें कारण नव्हतें, पण पुढारलों आहों असें म्हणविणार्‍या या विसाव्या शतकाच्या ऐन पंचविशी-तिशी मधेंहि या नाटकाला तारेच्या उपकथेमुळे रंगभूमीवर मज्जाव झाल्यासारखा झाला आणि आजहि तें रंगभूमीवर येते आहे तें या पुस्तकांतला तिसर्‍या अंकातला तिसरा प्रवेश रंगभूमीवर गाळण्याची संमति दिल्यानंतरच ! मराठी रंगभूमीवरची नाटकें अजूनहि स्त्रीपुरुषविषयक आकर्षणावरच आधारलेली असतात हें, अगदी समतावादी तत्त्वाचा पुरस्कार करण्यासाठी कामकर्‍यांच्या बाजूनें लिहिल्या गेलेल्या सुप्रसिद्ध नाटककारांच्या लिहिण्यावरूनहि दिसून येतें. प्रस्तुत नाटकांतहि याच तर्‍हेच्या आकर्षणामुळें उत्पन्‍न होणार्‍या विवाहविषयक प्रश्नांचें स्वरूप तर्कशुद्ध पद्धतीनें मांडण्याचा प्रयत्‍न केला असतांहि तें रंगभूमीवर आणतांना नाटक मंडळ्यांना लोकाभिरुचीची पुष्कळ अंशी सकारण भीति वाटते ! मात्र यावरून नवीन नाटककारांना नाटकाचें स्वरूप कसें असावें, यासंबंधी कोणता धडा घ्यावा लागत असेल, त्याचा टीकाकारांनीं विचार करण्यासारखा आहे !

बरें, विषयप्रतिपादनाच्या दृष्टीनें या नाटकांत कांहीं नवीन, क्रांतिकारक आहे, अर्सेहि नाहीं. कळत नकळत इंद्राकडून भ्रष्ट झालेल्या अहल्येचा गौतमानें स्वीकार केला आणि चंद्रापासून मुलगा झाला असतांहि पत्‍नीला पुन्हां स्वीकारण्यास बृहस्पतीची तयारी होती, या शेंकडों वर्षें चालत आलेल्या पौराणिक कथांना आधुनिक नाटकाचें स्वरूप देण्यापलीकडे यांत अधिक कांही केलेलें नाहीं. विवाहसंबंधात स्त्रीपुरुषविषयक नीतीच्या कसोठ्या पुरुषांना निराळ्या आणि स्त्रियांना निराळया कां असाव्या, निदान त्या तत्त्वांच्या भंगाबद्दल होणारे दंड इतक्या तीव्रतम फरकाचे असावे कीं काय, हा प्रश्न आजचेच विचारवंत विचारत आहेत, असें नव्हे पूर्वीपासून हे प्रश्न उपस्थित होत आले असतांना त्या त्या काळच्या समाजधुरीणांनीं त्यांचा निकाल लावतांना त्यांविषयींचे तत्त्वज्ञान वेळोवेळीं सांगून ठेवलेलें आढळतें. पतित स्त्रियांच्या उद्धाराच्या या प्रश्नाबद्दल जुन्या ग्रंथकारांच्या मनावर गौतम-अहल्येच्या या कथेने चांगलीच पकड घेतलेली स्पष्ट दिसते. इतकी कीं हींच नांवें, याच घटना घेऊन कित्येक वेळी लेखकांनीं आपल्या सांगण्याच्या पुष्ट्यर्थ असल्या कथांचा आधार दिलेला आढळतो. या दृष्टीनें योगवासिष्ठांत आलेली इंद्रद्युम्न राजाची स्त्री अहल्या, इंद्र नांवाच्या ब्राह्मणाला वश झाली, ही कथा वाचण्यासारखी आहे.

या दोन कथांच्या विणीमुळें उत्पन्‍न होणार्‍या कांही तंत्रविषयक प्रश्नांचाहि येथें उल्लेख करून ठेविला पाहिजे. पौराणिक आणि ऐतिहासिक ललितकृतींच्या बाबतींत स्थलकालविपर्यासाच्या भयाचा एक मोठा बागुलबोवा लेखकापुढें नेहमीं उभा असतो. या बाबतींत मी मनानें मानलेले संकेत वाचकांपुढें ठेवितों. नाटकांतील दोन्ही कथा रूपकात्मक असल्याचें विद्वान संशोधकांचें मतच मीहि स्वीकारलें आहे. निरनिराळ्या ग्रंथांत कथांच्या तपशिलांतलें मतभेद, स्थलांच्या बाबतीतहि आढळणारा गोंधळ, इत्यादींचा विचार करतां पौराणिक कथांतून ऐतिहासिक सत्याचे कण हातीं लागण्याची आशा मला फार थोडी वाटते आणि म्हणूनच या कथांना पौराणिक कालक्रमांत पुढें-मागें असें कांहीं विशिष्ट स्थान असेल, असें मी मानलेलें नाहीं. वास्तविक नाटकासारख्या ग्रंथाचा आस्वाद या विदारक चिकित्सेशिवाय सहज घेतां यावा, असेंच मलाहि वाटतें. पण हस्तलिखित प्रत वाचून माझ्या एका विद्वान स्‍नेह्यांनी जेव्हां वृत्रवधाच्या प्रसंगानंतर आठदहा दिवसांनी गौतम व अहल्या यांचा विवाह झाल्याचें नाटकांत दाखविलें आहे, त्याला अनुलक्षून वृत्रवधाची मिति लो. टिळकांनी १० ऑक्टोबर ठरविण्याचा प्रयत्‍न केला आहे त्याच्या आधारावर त्यानंतरच्या आठदहा दिवसांत विवाहमुहूर्त सांपडतात कीं नाहीं हें पहाण्यासाठी पंचांग पहाण्यास सुरुवात केली तेव्हां या बाबतींत कांही तरी लिहिणें जरूरीचें आहे, असें मीं ठरविलें. इतक्या उपरहि कोणाचा आग्रहच असेल, तर त्यांना इतकेंच सांगतां येण्यासारखें आहे कीं जुन्या ग्रंथांत अनेक गौतमांचा आणि सोमांचा उल्लेख सांपडतो. त्यांपैकी सप्तर्षींपैकी एक असलेला आणि अहल्येचा पति गौतम, वैवस्वत मन्वंतरांत होऊन गेला आणि त्याच मन्वंतरांत धर्मप्रजापतीचा मुलगा, अष्टवसूंपैकी एक, सोम (यानें तारेला पळवून आणल्याचा उल्लेख आढळतो.) हाहि होऊन गेला. एवढ्यानें कोणाचें समाधान होणार असल्यास खुशाल होवो !

मूळ कथांतल्या अनेक बारीकसारीक तपशिलाच्या बाबतींत नाट्यानुकूलता आणि रंगभूमीची बंधने यांच्या धोरणानें मी बरेच स्वातंत्र्य घेतलें आहे. मुख्य घटनांसंबंधी मात्र जाणूनबुजून कोणच्याहि कथेला दुखविलेलें नाही. पण तपशिलाच्य बाबतींत कोणचाहि एक ग्रंथ असा प्रमाण मानलेला नाहीं, तर जें नाट्याच्या दृष्टीनें उपयुक्त आणि उचित वाटलें त्याचा उपयोग केला आहे. अर्थातच कोणत्याहि एका कथेचा आधार घेऊन नाटक पारखूं गेल्यास फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ, गौतमाचा आश्रम रामायणांत मिथिला आणि अयोध्या यांच्या मार्गावर असल्याचें दाखविलें आहे. इतरत्र तोच आजच्या भूगोलाप्रमाणे राजपुतान्यांतल्या पारियात्र पर्वतावर किंवा ब्रह्मगिरीवर असल्याचा उल्लेख आहे. टागोरांनी बसविलेल्या सुंदर रूपकांत तर अहल्येची कथा दक्षिण भारतांतील आर्यांच्या वसाहतीसंबंधीं असावी, असें मानले आहे ! प्रस्तुत नाटकांत तो आश्रम हिमालयात आजच्या झेलमच्या कांठी असल्याचें दाखविलें आहे. इतर तपशिलांतहि कांही आवश्यक फेरबदल करणें महत्त्वाचें वाटलें तेथें केलेला आहे.

नाटकांत स्वीकारलेली रचनेची आणि निरनिराळ्या अंकांतल्या नाट्याविष्काराची पद्धति, आजकाल नाट्यतंत्राच्या नांवाखालीं अस्पृश्य होत चाललेलीं स्वगत भाषणें आणि त्यांसंबंधीं मीं मनाशीं मानलेले संकेत, पौराणिक पात्रांचें आधुनिक तर स्वभावरेखन, नाटक लिहिते वेळीं मनावर होत असलेले विशिष्ट वाचनाचे संस्कार इत्यादि अनेक गोष्टींविषयीं त्रोटक कां होईना पण खुलासा करावयास पाहिजे होता. पण आतां त्याला अवकाश नाहीं.

मात्र महत्त्वाच्या एका गोष्टीचा येथें अवश्य उल्लेख केला पाहिजे. ती म्हणजे रंगभूमीवर येतांना नाटकावर झालेला रंगभूमीच्या अनुभवाचा परिणाम. ओळख किंवा इतर साधनें यांचा माझ्याजवळ पूर्ण अभाव असल्यामुळें दुर्दैवानें मला कोणच्याहि नाटकाच्या रंगकक्षेंतल्या आयुष्याचा अभ्यास करण्याची संधि पूर्वी मिळाली नाहीं. नाटक रंगभूमीवर आणतांना या अनुभवाची अत्यंत जरूर असल्याचें मला आढळून आलें. वाङ्मयाच्या बाबतीत थोडीफार शिक्षित झालेली रुचि असणार्‍या नटांच्या सल्याप्रमाणें नाटकाला बाळसें आणण्याच्या प्रयत्‍नांत होणार्‍या अनुपम आनंदाचा आस्वाद जसा या अनुभवांत मला मिळाला, तशीच, पद्यरचनेच्या बाबतींत माझ्या असमर्थतेमुळें, आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीमुळें दडपण पडत जाऊन रंगभूमीवर निर्माण झालेल्या कांहीं अनैसर्गिक चालींमुळें पुष्कळदां कुचंबणाहि सहन करावी लागली. पण या सर्व प्रसंगी बलवंत संगीत मंडळांचे चालक रा. चिंतामण गणेश कोल्हटकर आणि मास्तर दिनानाथ यांनीं आपुलकीनें मला संभाळून घेतलें त्याचा येथें मीं कृतज्ञतेनें उल्लेख करतों. पद्यरचनेचें काम माझ्या विनंतीवरून माझ्या एका स्‍नेह्यांनीं पत्करलें होतें. पण त्यांच्या आजारामुळे कांहीं पदें झाल्यावर त्यांना तें शक्य झालें नाहीं. त्यामुळें नमनाच्या हृदयंगम पदांसारख्या कांहीं पदांना माझें नाटक मुकलें याचें वाईट वाटतें. याहि गोष्टीचा येथें उल्लेख करावयास पाहिजे.

ग्रंथकाराला, विशेषतः नवीन ग्रंथकाराला, मूळ ग्रंथापेक्षां प्रस्तावनेचें अतिशय संकट वाटतें. आणि त्यांतहि ती पाळी माझ्यासारख्या वाङ्मयाच्या प्रांतांत सर्वस्वी अपरिचित असलेल्या लेखकावर आली म्हणजे तर त्याची त्रेधाच ! ग्रंथ रचल्यावरहि कांहीं सांगावयाचे राहून लेखकाला प्रस्तावना लिहिणें भाग पडावें हा उणेपणा तर खराच; आणि रसिकांच्या प्रथम परिचयाच्या वेळींच, विनयानें मुग्धपणा स्वीकारण्याऐवजी मीं याप्रमाणें पाल्हाळिक बोलण्याचें धाष्टर्य केलें आहे याबद्दलहि मला क्षमा मागावयास हवी. पण नाटक लिहितांना त्यांतल्या विषयासंबंधीं, रचनापद्धतीसंबंधीं जे प्रश्न मनांत उपस्थित झाले त्यांचा विचार रसिकांपुढें होऊन त्या निर्णयाचा फायदा मिळावा एवढाच या प्रस्तावनेचा मुख्य हेतु आहे. शिवाय नवीन लेखकांच्या बाबतींत असलेली एक अडचण मला टीकाकारांच्या दृष्टीस आणावयाची आहे. पुस्तक ज्या काळांत लिहिलें जातें त्यानंतर बहुधा बरीच वर्षें त्याला अंधारांत पडून राहावें लागतें. प्रस्तुत नाटकच लिहिल्यानंतर आज पांच वर्षांनीं बाहेर येत आहे. जिवंत स्वरूपाच्या म्हणून लिहिल्या जाणार्‍या नाटक, काव्य, कादंबरी यांसारख्या ग्रंथांत इतर ग्रंथांप्रमाणें मागाहून लक्ष घालणें जवळजवळ अशक्यच असतें. आपल्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेंत शॉंनीं म्हटलं आहे त्याप्रमाणें, दर आठ वर्षांनीं मनुष्याच्या शरिरांतल्या कणन्‌कणाचा पुनर्जन्म होतो हें खरें असेल तर आज नाटकाच्या कालानंतर माझा अर्धा पुनर्जन्म होऊन गेलाच आहे ! त्या काळचीं माझीं मतें, माझ्या लेखनांतल्या आवडीनिवडी यांचा परिचय आज मीं करून देणें जितकें आवश्यक आहे तितकेंच आजच्या टीकाकारांना त्यांच्या चारपांच वर्षांपूर्वीच्या स्वरूपाचीहि थोडीशी आठवण करून घेण्याविषयीं विनंति करणें हेंहि, माझ्या या कृतीविषयीं मी अपेक्षीत असलेल्या सहानुभूतीच्या दृष्टीनें, जरूरीचें आहे.

समारोप करण्यापूर्वी नाटकाच्या लेखनापासून प्रसिद्धीपर्यंत झालेल्या सर्व तर्‍हेच्या साहाय्याबद्दल आभार मानावयास पाहिजेत, नाटकाच्या कल्पनेपासून त्याची आंखणी बांधणी पूर्ण होईपर्यंत माझे स्‍नेही रा. रा. चक्रधर धरणीधर देशमुख, एम. ए., यांचें निरतिशय साहाय्य झालें. त्यांचे आभार मानतांना सुद्धां मला संकोच वाटतो आहे, इतक्या आपुलकीनें त्यांनीं मला मदत केली. नाटक लिहिलें जात असतां व नंतरहि वेळोवेळीं आपल्या सौजन्यानें आणि उत्तेजनानें मला श्री. रा. रा. तात्यासाहेव कोल्हटकर यांनीं ऋणी करून ठेवलें आहे. नाटक वाचून पाहून त्यांवर अनेकांनीं सूचना केल्या. त्यांपैकीं एका महत्त्वाच्या सूचनेबद्दल उज्जयिनीचे प्रो. ना. बा. पराडकर, एम्. ए., यांचे आभार मानावयास पाहिजेत. बेळगांवचे प्रख्यात साहित्यसेवक रा. रा. भाऊसाहेब सोमण (किरात) यांच्याहि सूचनांचा मला वेळोवेळीं उपयोग झाला. नाटक बसवितांना माझे स्‍नेही रा. रा. शं. बा. शास्त्री यांनीं मला जें उत्तेजन आणि आधार दिला त्याचाहि येथें कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणें जरूर आहे.
(संपादित)

विश्राम (विश्वनाथ चिंतामण) बेडेकर
दि. १५ जून १९३३
'ब्रह्मकुमारी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- हरि विष्णु मोटे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुरेश वाडकर
  प्रभाकर कारेकर
  आशा भोसले
  पं. वसंतराव देशपांडे
  मास्टर दीनानाथ