A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधुर वचना मी मुकलें

मधुर वचना मी मुकलें कां जगीं ।
सुखमय जीवन नकळे कधिं का । येईल भाळीं ॥

आखिल जन्म शिणवुनि ही काया ।
मधुर बोल श्रवणीं नच येती ।
केवि अभागी ललनाजाती ॥
'अलंकार' नाटकाची ही दुसरी आवृत्ती. पहिल्या आवृत्तीत बराच फेरफार करून प्रसिद्ध होत आहे. मूळ आवृत्तींतील सबंध दुसरा अंक यांत वगळला असून, त्याऐवजी एक नवीन अंक समाविष्ट केला आहे.

पहिल्या आवृत्तीतील बाराव्या अंकांत दुष्काळफंडासाठी करण्यांत आलेले विविध नृत्य-गायनाचे कार्यक्रम होते, ते नाट्यकथानकाचा रसभंग करतात, असें मत ज्यांच्या मतांना मी मान देतो, अशा माझ्या कांहीं स्‍नेह्यांनी व्यक्त केले. पहिला अंक आणि तिसरा अंक, असे जरी एका लागोपाठ एक आले, तरी कथानकाचा दुवा मुळींच तुटत नाही, असें माझ्याही लक्षांत आल्यावर मी ते दोन अंक अनुक्रमे दुसरा व तिसरा असे ठरवून नवीन पहिला अंक लिहिला. अर्थात, त्या अनुषंगान दुसर्‍या व तिसर्‍या अंकांत जुजबी फेरफार करावे लागले.

हें नाटक लिहितांना एका आधुनिक विवाहित हिंदु स्त्रीचें वास्तव चित्र मला रेखाटावयाचें होतें. पण कित्येकांना वत्सला ही 'प्रति सिंधु' वाटत असल्याचें कळल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. 'पुरोगामी' म्हणून अर्धवटांची जी एक नवीन जात वळवळ करूं लागली आहे, तिला सारासार विचारबुद्धि वर्ज्यच आहे कीं काय कोण जाणें ! नवर्‍यानें जुलुम केला, म्हणजे एकदम घर सोडून जावें (कुठे?), असा ह्या पुरोगाम्यांचा एक आवडता परवल आहे. हिंदु विवाहपद्धतीप्रमाणें ज्यांची लग्‍नें झालेलीं असतात, त्या स्त्रियांना नवर्‍याचे अनन्वित जुलुम सहन करून घरांत डांबून ठेवणारी मंगळसूत्र नांवाची एक वीतभर दोरी आहे, याची जाणीव ते विसरतात. शंभरांतील नव्याण्णव स्त्रियांना मंगळसूत्राची मातब्बरी वाटते, असें दिसून येईल. स्त्रियांची ही श्रद्धाळु भावना पुरोगामी पुरुषांना अपरिचित असते, म्हणूनच ते विवाहित स्त्रियांना घरांतून 'चले जाव' करण्यास सांगतात. पण विवाहित स्त्रीनें घर सोडून जायचें कुठें, हें पुरोगामी सांगतील काय? सगळ्याच स्त्रिया कांहीं मास्तरणी आणि नर्सिस होऊं शकत नाहीत. बरें, हिंदुपद्धतीप्रमाणें विवाह झाला असल्यामुळे त्यांना पुन्हां विवाहही करतां येत नाही. आणि शिवाय, नवर्‍याला सोडून घराबाहेर पडलेल्या विवाहित स्त्रीबद्दल जगांतले कितीसे लोक सहानुभूति दाखवितात? आणि निव्वळ त्या सहानुभूतीवरच स्त्रियांनी जगावें कीं काय?

अर्थात, ह्या सार्‍या कुचंबणेचें मूळ जे 'मंगळसूत्र' विवाहपद्धतींतून हृद्दपार व्हावें, म्हणजेच ही रूढ विवाहपद्धति रद्द व्हावी, हाच माझा वत्सलेची भूमिका निर्माण करण्याचा हेतु. मंगळसूत्राच्या फांसामुळे तिच्यासारख्या विवाहित स्त्रीला आलेली असहाय्यता इतक्या प्रखरपणें प्रेक्षकांपुढें उभी राहिल्यावर, मंगळसूत्राबद्दल जी चीड त्यांच्या मनांत उत्पन्‍न होईल, ती एरव्ही उत्पन्‍न आली नसती. आणि अशी चीड प्रेक्षकांमध्ये उत्पन्‍न करणारी स्त्रीं 'सिंधु' असूं शकेल काय? वत्सला एखाद्या पुरोगामी ज्वालेसारखी भडकत नसेल; पण तिचें धुमसणें मात्र जास्त प्रखर आहे- आणि हा तिचा संयमच जास्त प्रभावी आहे, असे मला वाटते.

वत्सलेच्या भूमिकेबद्दल माझा हा खुलासा आहे. तो टीकाकारांस पटला न पटला तरी मला तिची ही भूमिका वास्तव वाटते.
(संपादित)

मो. ग. रांगणेकर
'अलंकार' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- वि. र. बाम (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.