A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मग माझा जीव तुझ्या

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्‍नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!

सहज कधी तू घरात
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!
गीत- सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार - लता मंगेशकर
श्रीकांत पारगांवकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
अल्बम- मैत्र जीवाचे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• श्रीकांत पारगांवकर यांच्या स्वराविष्कारातील सुरुवातीची कविता- 'पायपीट'
दु:खाच्या वाटेवर
गाव तुझे लागले;
थबकले न पाय तरी
हृदय मात्र थांबले!

वेशीपाशी उदास
हाक तुझी भेटली
अन्‌ माझी पायपीट
डोळ्यांतुन सांडली.
गात्र - शरीराचा अवयव.

 

  लता मंगेशकर
  श्रीकांत पारगांवकर