A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मागता न आले म्हणुनी

मागता न आले म्हणुनी
राहिलो भिकारी !
लागली न वरणी माझी
कोणत्याच दारी !

भाग्यवान लाचारांना
दिसे मीच नंगा
घेउनी न झोळी आलो
म्हणुन मी लफंगा !

तशी जरी दातारांची
मानतो भलाई
फाटक्या खिशाला माझ्या
बोचते कमाई !

आसवांत माझी अर्धी
भाकरी बुडाली;
सोसण्यात उरलीसुरली
भूक शांत झाली !
गीत - सुरेश भट
संगीत - सी. रामचंद्र
स्वर- सी. रामचंद्र
गीत प्रकार - भावगीत
वरणी - क्रमाक्रमाने येणारी देवाची विधिवत पूजा करण्याची पाळी.
सुरेश भटांना गझलेचे फार मोठे आकर्षण आहे. कारण 'गझल' हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडणार्‍याला आपण चुकीने प्रवृत्ती मानीत आलो आहो. क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खर्‍या प्रवृत्तीची गोडीच कळत नाही. जीवनात नुसत्याच उंदीर-उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे. निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण त्या धावपळीचा अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात. असा एखादा क्षणच कवितेला जन्म देऊन जातो. त्यातूनच मग आजूबाजूच्या दगडाधोंड्यांच्या पलीकडे दिसायला लागते. नकळत ते पाहत राहण्याचा, शोधत राहण्याचा छंद जडतो. आणि मग आपले नाते निराळ्याच ठिकाणी जडते. बिलंदरपणे जगणार्‍या माणसांत असा माणूस कलंदर ठरतो. ही कलंदरी सहज साध्य नसते किंवा तिचे सोंग आणून भागत नाही. ती अनुभूती कवितेतून उमटते, त्यावेळी तिचा अस्सलपणा आणि नकलीपणा बरोबर ओळखता येतो. सुरेश भट जेव्हा-
मागता मागता न आले म्हणुनी राहिलो भिकारी !
म्हणतात, त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे, हे उमजते.

लाचारांचा आचारधर्म पाळला नाही म्हणून त्यांना दु:ख नाही, तर अपार आनंद आहे. सुरेश भटांशी ज्यांचा चांगला परिचय आहे त्यांना त्यांच्या फाटक्या खिशाचा हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती आहे. कवीचे काव्य आणि त्याचे खाजगी जीवन यांची सांगड घालायचा कुणी आग्रह धरू नये. माणूस चोवीस तास एकच भाववृत्ती घेऊन जगत नसतो. काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदचा ध्यास प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो एवढेच. निखळ साहित्यसमिक्षेत 'सुरेश भटांची कविता' एवढाच चर्चेचा विषय असावा. माझ्या सुदैवाने मला सुरेश भटांचा स्‍नेह लाभला. त्यामुळे त्यांची कविता ऐकताना किंवा वाचताना सुरेश भट नावाचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा असावी.
(संपादित)

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
'रंग माझा वेगळा' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.