A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मागे उभा मंगेश

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !

जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !

जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी?
शैलसुतासंगे गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- आशा भोसले
चित्रपट - महानंदा
राग - यमनकल्याण
गीत प्रकार - भक्तीगीत, चित्रगीत
  
टीप -
• चित्रपट गीतातील स्वर- आशा भोसले, उषा मंगेशकर, राणी वर्मा, रंजना जोगळेकर.
शैल - डोंगर, पर्वत.
सुत - पुत्र.
ज्याला गीतलेखनातला एक थोडा वेगळा प्रयोग म्हणता येईल, अशी गाणी 'महानंदा' चित्रपटासाठी मी लिहिली. हृदयनाथ मंगेशकर हे एक साहसी, कल्पक आणि प्रयोगशील असे संगीत दिग्‍दर्शक आहेत, हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मी त्यांच्याबरोबर चित्रपटांसाठी, तशीच स्वतंत्र ध्वनिमुद्रिकांसाठीही अनेक गीते लिहिली आणि त्यांना खूप लोकप्रियताही लाभली.

'महानंदा' या दळवींच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारलेल्या चित्रपटाचे कथानक गोव्यात घडते. हृदयनाथांकडे त्यांच्या वडिलांच्या, म्हणजे मास्टर दीनानाथांच्या तोंडून ऐकलेल्या गोव्याच्या भाषेतल्या काही पारंपरिक चाली होत्या. आपण त्या चालींवर आधारलेली कोकणी भाषेतली गाणी का करू नयेत, असे बाळच्या, म्हणजे हृदयनाथांच्या मनात आले व त्यांनी ती गाणी मी कोकणी भाषेत लिहावीत असे मला सुचवले. मला ती भाषा मुळीच अवगत नव्हती. गोव्याला मी तीन-चार वेळेला जाऊन आले होते. त्या भाषेशी माझा थोडा परिचय झाला होता. कोकणी भाषेत लिहिलेले काही साहित्यही मी वाचलेले होते. त्या तुटपुंज्या ज्ञानाचा उपयोग करून मी 'महानंदा' चित्रपटासाठी गाणी कोकणी भाषेत लिहिली. 'माजे राणी, माजे मोगा', 'मजो लवताय्‌ डावा डोला' आणि 'माजे मुखार गर्भच्छाया' ही ती तीन गाणी. गाणी बरी झाली असावीत कारण त्यांवर प्रतिकूल टीका झाली नाही. याच चित्रपटातले 'मागे उभा मंगेश' हे गाण मात्र बरेच लोकप्रिय झाले. ते मात्र रूढ मराठी भाषेत होते.

हृदयनाथांच्या चाली अनोख्या - ज्यांना आपण इंग्रजीत exotic म्हणू - अशा असतात. स्वररचनेत नवनवे प्रयोग करून बघण्याची त्यांना फार हौस आहे. नव्हे, त्यांच्यातील कलावंताची ती एक आंतरिक गरज आहे. त्यांनीही माझ्याकडून उत्तमोत्तम गाणी लिहवून घेतली. स्वत:चे पुरेपूर समाधान होईपर्यंत ते गाणे 'पास' करत नाहीत. पण एकदा गाणे त्यांच्या पसंतीला उतरले की मग गीतकारानेही स्तिमित व्हावे, असे त्याचे रूप ते पालटून टाकतात. 'मागे उभा मंगेश' हे गाणे काव्यदृष्ट्या काही खास नाही. पण बाळनी त्याला स्वरसौंदर्याने इतके नटवले आणि आशाताईने ते इतके उत्कटतेने गायिले की त्याला आतोनात लोकप्रियता लाभली.

'निवडूंग' चित्रपटामध्ये एक नृत्यगीत होते. त्यातही एक ओळ हिंदी आणि एक ओळ मराठी असा अभिनव प्रयोग बाळनी करून पाहिला होता. 'ना मानोगे, तो दूँगी तोहे गारी, रे' हे ते रागदारीतले गाणे.
(संपादित)

शान्‍ता शेळके
'चित्रगीते' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- उत्‍कर्ष प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.