माझे दुःख न जाणे कोणी !
आर्ताची गत आर्ता ठावी
कळ ज्या अंतःकरणी
स्थिती सतीची सतीच जाणे
जिती चढे जी सरणी !
शूळावरती शेज आमुची
कुठले मीलन सजणी?
गगनमंडळी नाथ झोपती
अमुच्या दैवी धरणी !
दुखणाईत मी फिरते वणवण
वैद्य मिळेना कोणी
या मीरेचा धन्वंतरी हरी
श्यामल पंकजपाणि !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सुवासिनी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
धन्वंतरी | - | वैद्य. |
पंकजपाणि | - | विष्णू. |
शेज | - | अंथरूण. |
शूल (सूळ, शूळ) | - | वेदना / सूळ. अपराध्यास शासन करण्यासाठी उभा केलेला तीक्ष्ण टोकाचा लोखंडाचा स्तंभ. |
मीरेनं तसं विष प्यायलं आहे. आनंदानं प्यायलं आहे. आणि आत्मनाशाच्या वाटेवर स्वत:ला झोकून दिलं आहे. पण मीरेइतका मधुर आत्मनाशही क्वचितच कुणाचा असेल. एका अविनाशी परमपुरुषाशी एकरूप होण्यासाठी एका देहानं नाशवंत असलेल्या स्त्रीनं स्वाभाविकपणे स्वीकारलेला आत्मनाश.
मीरेची वाट प्रेमभक्तीच्या बेहोषीची आहे. नाचण्याची आणि गाण्याची आहे..
पग घुंगरू बाँध मीरा नाची रे
लोग कहे मीरा हो गयी बावरी..
सास कहे कुलनासी रे
जहरका प्याला राणाजीने भेजा
पीकर मीरा हासी रे
मैं तो अपने नारायण की
हो गई आपही दासी रे
मीराके प्रभु गिरिधर नागर
सहज मिला अविनाशी रे..
मराठी मातीतली कुणीही संत स्त्री अशी धुंद होऊन नाचली-गायली नाही. अगदी नाच-गाण्याचा पेशा असलेली कान्होपात्राही नाही. कान्होपात्रेची आठवण व्हावी असा मीरेचा या जगातला शेवट आहे खरा; पण एकूणच मीरेची उन्मन भक्ती इथल्या संत-स्त्रियांच्या.. नव्हे, संत पुरुषांच्याही कुळातली नव्हे. मधुराभक्तीचं बीज रुजणारी इथली मातीच नव्हे.
नृत्य आणि संगीत मीरेच्या शब्दांमध्ये मात्र मिसळून गेलं आहे. शब्दांत न मावणारे भक्तिप्रेमाचे कितीतरी अस्फुट भाव त्यामुळेच ती सहज जागे करत जाते. तिची भक्ती घरंदाज बाईनं प्रतिष्ठितपणे करावी तशी तिच्यापुरती एकान्तभक्ती नाही. साधूंच्या मेळ्यात मनसोक्त नाचण्याची-गाण्याची अगदी खुली भक्ती आहे. ती खुली आहे, नि:संकोच आहे म्हणून तिचं अविकृत, निष्पाप आणि निष्कलंक असणंही सहज मनात भरणारं आहे. तिनं गोविंद मोले घेतला आहे आणि तो अगदी वाजत-गाजत, मिरवत घेतला आहे.
माई री मैं तो गोविंद ले लियो मोल
कोई कहे छानी, कोई कहे चोरी
लियो है बजंता ढोल..
'बाई मी विकत घेतला श्याम..' ग. दि. माडगूळकरांनी 'जगाच्या पाठीवर'मधल्या या गाण्यात मीरेचा सूर कसा अलगद मिळवून घेतला आहे ! आणि 'सुवासिनी' चित्रपटातल्या त्या प्रसिद्ध गीताला तर थेट मीरेच्या अनुवादाचंच नाव द्यावं लागेल..
मी तर प्रेमदिवाणी
माझे दु:ख न जाणे कोणी
हे री मैं तो दर्द-दिवानी
मेरा दर्द न जाणे कोय..
काही पदांमध्ये मीरा 'दर्द-दिवानी' आहे आणि काही ठिकाणी त्या शब्दाचा पाठभेद 'प्रेमदिवानी' असा आहे. पण दोन्हींचा अर्थ एकच- कारण मीरेसाठी प्रेमाचंच दुसरं नाव 'दु:ख' असं आहे. आणि हे दु:ख कुणाला सहजी कळणारं नाही. सांगून कळणारं तर ते नाहीच. प्रेमानं ज्याचं हृदय जखमी केलं आहे, त्यालाच ते कळू शकतं.
आर्ताची गत आर्ता ठावी
कळ ज्या अंत:करणी
स्थिती सतीची सतीच जाणे
जिती चढे जी सरणी..
मीरा आयुष्यभर ज्या अनुभवांमधून गेली, त्या अनुभवांचे बोल ती बोलली आहे. काही माणसांचं नातं दु:खाशी कायमचंच जुळलेलं असतं. सुखाच्या गाभ्यातही त्यांना दु:ख भेटत राहतं.
मीरेला काय कमी होतं? माहेर-सासर दोन्ही बाजूंनी ती राजघराण्याच्या ऐश्वर्यात आणि प्रतिष्ठेत वावरत होती. सुख मिळत नव्हतं म्हणून किंवा संसाराच्या व्याप-तापांनी जीव पोळला होता म्हणून तिनं कृष्णाकडे धाव घेतली, असं तर काही नव्हतं. तिचा कृष्णवेध अगदी बाळपणापासूनच होता. लौकिक सुखांना सहज दूर सारणं तिला त्यामुळे सहज शक्य झालं. नव्हे, ते तिच्यासाठी स्वाभाविकच झालं. त्यासाठी तिला स्वत:शी संघर्ष करावा लागला नाही. किंबहुना मीरेच्या आंतरचरित्रात असा संघर्ष बहुधा कुठे दिसतच नाही. दिसतो तो विरह. गोपालाची लागलेली एक जीवघेणी ओढ. त्यातून निर्माण होणारी मर्मातिक अशी वेदना. आणि त्या वेदनेचं, त्या व्याकुळपणाचं विलक्षण वेड लावणारं सौंदर्य.
विरहाची व्याकुळता ही मीरेची शक्तीही होती आणि ओळखही होती. 'आर्ताची गत आर्ता ठावी' असं ती म्हणते, तेव्हा कमालीच्या उत्कट इच्छेतून उफाळून सर्वभर झालेल्या त्याच व्याकुळतेविषयी ती बोलत असते. स्वत:ला सती म्हणवते मीरा.. आणि ती सतीच होती. ज्या मातीत ती जन्माला आली, त्या मातीची अजूनही ज्या प्राचीन परंपरेशी नाळ आहे; त्या सतीचा उच्चार मीरेच्या कवितेत येणं जितकं स्वाभाविक, तितकंच समर्पकही आहे. फक्त मीरा तिच्या लौकिकातल्या पतीसाठी सती गेली नाही. लौकिकाला न रुचणार्या, न पचणार्या आणि न समजणार्या एका अशरीरी पुरुषाच्या प्रेमापायी ती रोज जिवंतपणी सती जात राहिली.
शूळावरती शेज आमुची
कुठले मीलन सजणी?
गगनमंडळी नाथ झोपती
अमुच्या दैवी धरणी !
मीरेची शेज खरोखरच सुळावर अंथरलेली होती. अर्थात मीरा ज्या सुळांबद्दल बोलते ते सूळ म्हणजे तिला या लौकिक जगाशी, या जगाच्या व्यवहाराशी, इथल्या मर्त्य संबंधांशी खिळवून ठेवणारे पाश. नश्वरतेशी, जडतेशी तिला टोचून ठेवणारे ते सूळ. आणि तिचा प्रियतम तर आभाळाच्या शेजेवर निजणारा. आकाश-मातीचं अंतर मीरेच्या आक्रंदणानं भरून गेलेलं अंतर आहे. या अंतरानं कितीतरी प्रतिभावंतांना, प्रज्ञावंतांना, ऋषी-मनीषींना आणि कवी-कलावंतांना बेचैन केलं आहे. स्वर्ग-धरेचं मीलन पाहण्यासाठी केशवसुतांना लागलेली तळमळ आठवते.
जीव ओढतो वर वर जाया चैतन्यापाठी
हाय सुटेना जड देहाची परि बसली गाठी
असं म्हणणारे बालकवी आठवतात. क्षितिजापर्यंत पसरलेल्या त्या उंच, विराट, अविनाशी आभाळाला स्पर्श करता येत नाही, ते हाताला लागत नाही म्हणून उदास होणारे म. म. देशपांडे आठवतात.
जड म्हणते 'माझा तू'
क्षितिज म्हणे 'नाही'
आपल्या रोजच्या जगण्यातल्या क्षुद्र दु:खांना, सामान्य खेदांना, निराशांना ओलांडून जाणारी ही भावना आहे.
गगनमंडळी नाथ झोपती
अमुच्या दैवी धरणी !
मीरा या वस्तुस्थितीचा नुसता स्वीकार करून थांबली मात्र नाही. तिनं ते अंतर पार करण्याच्या वाटेवर पाऊल टाकलं. एक प्रकारच्या प्रेमाच्या उन्मादात, प्रेमाच्या धुंद अवस्थेत पाऊल टाकलं. तशा धुंदीतच माणसं वेडं साहस करून जातात.. सीमापार होऊ शकतात.. प्रचंड झेप घेऊ शकतात. मग ते प्रेम भूमीवरचं असो, माणसावरचं असो, ध्येयावरचं असो, की स्वप्नावरचं असो. मीरेनं त्या धुंदीत आपल्या भोवतीच्या वास्तवाची वेस ओलांडली. कुलधर्म, राजधर्म, स्त्रधर्म, विधवाधर्म- तिच्या काळानं आणि तिच्याभोवतीच्या लोकसमूहानं ज्या ज्या म्हणून मर्यादा आणि रीती मानल्या होत्या, त्या त्या सगळ्या ओलांडून ती घरदार सोडून गेली.
स्थैर्याचा त्याग ही सोपी गोष्ट नाहीच. जमिनीत मुळं घट्ट पसरून वाढू पाहणार्या बाईसाठी तर स्थैर्याचा हात सोडणं फार फार अवघड. पण मीरेनं ते साहस केलं आणि तेही पुन्हा एका लौकिकात अस्तित्वच नसलेल्या, केवळ हृदयस्थ अशा गिरिधर गोपालाच्या भरवशावर केलं. अनेक साधना अजमावत तिच्या भक्तीप्रेमानं तिनं त्याला असं जिवंत केलं, की तोच तिचा अखेपर्यंत आधार झाला.. तिच्या दु:खाचं मूल कारण ओळखून ते दूर करणारा तिचा धन्वंतरी झाला.
दुखणाईत मी फिरते वणवण
वैद्य मिळेना कोणी
या मीरेचा धन्वंतरि हरी
श्यामल पंकजपाणी
स्त्रीच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली वीरांगणा, पहिली सत्याग्रही म्हणून काका कालेलकरांनी तिचा गौरव केला आहे खरा, पण मीरेला त्या रूपात पाहण्याचा अट्टहास आपण करू नये. ती तिच्या बाबतीत सहज घडून गेलेली आनुषंगिक गोष्ट आहे. आणि तसं तिच्या बाबतीत घडून गेलं, अशी मीरा काही पहिली नव्हे. मीरा तर पुष्कळ नंतरच्या काळातली आहे. तिच्या आधीच्या कितीतरी जणींनी वेगवेगळी किंमत चुकवून आपलं स्वातंत्र्य मिळवलं आणि टिकवलं आहे.
मीरा पहावी ती सुखाच्याच गाभ्यात भेटलेल्या दु:खाला माथ्यावर मिरवत, डोलवत, कधी त्याच्या पायात घुंगुर बांधून त्याला चालवत, नाचवत आणि कधी जखमी हृदयातून झिरपणार्या प्रेमभक्तीनं भिजलेल्या शब्दांमधून त्याला आळवत, जोजावत, स्त्रीच्याच नव्हे, तर एकूणच मानवी आयुष्याच्या सीमा पार करून निघालेली आणि विरक्तीच्या विलक्षण लाघवी आणि आसक्त रंगात नाहून निघालेली बैरागन म्हणून !
(संपादित)
अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (११ जुलै, २००९)
(Referenced page was accessed on 15 December 2016)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.