माझिया माहेरा जा !
देतें तुझ्या सोबतीला, आतुरलें माझें मन
वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण
मायेची माउली, सांजेची साउली
माझा ग भाईराजा
माझ्या रे भावाची उंच हवेली
वहिनी माझी नवीनवेली
भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा
अंगणांत पारिजात, तिथं घ्याहो घ्या विसांवा
दरवळे बाई गंध, चोहिंकडे गांवोगांवा
हळूच उतरा खालीं, फुलं नाजुक मोलाचीं
माझ्या मायमाउलीच्या काळजाच्या कीं तोलाचीं
'तुझी ग साळुंकी, आहे बाई सुखी'
सांगा पाखरांनो, तिचिये कानीं
एवढा निरोप माझा
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
राग | - | मिश्र पिलू |
गीत प्रकार | - | भावगीत |
सांब | - | शंकर / भोळा मनुष्य. |
'माझिया माहेरा जा' या गीताची स्वररचना मा. कृष्णरावांचा प्रभाव सामावून घेऊन आलेली आहे. ते अर्थातच केवळ अनुकरण नाही. गीतातील भाव-स्वरयोजना, मध्ये येणारे विराम, या सर्वांचा एकत्रित परिणाम निर्माण झाला आहे. तान-प्रवाहाची योग्य जागी निर्माण होणारी स्पंदने, द्रुत-विलंबित लयीचा डौल, जरूर तेथे लयबदल, कडव्यानुसार चालीत बदल वगैरे वैशिष्ट्ये चालीला 'अर्थ' मिळवून देतात. त्यातून 'बात' प्रकट होते. 'हळूच उतरा खाली'चे स्वर पायरी-पायरीनं उतरवून अर्थपरिपोष चांगला साधला आहे.
श्रीमती ज्योत्स्ना भोळे यांची योजना समर्पक आहे. कारण कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' या नाटकांना मास्तरांचं संगीत होतं. ती खास शैली बाईंच्या गळ्यावर चढली होती.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.