A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या कानड्या मल्हारी

यळकोट यळकोट जय मल्हार

माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी

तुझ्या कानडं कानडंपणाला
बानू भाळली भाळली कोणाला
यावं भक्ताच्या भक्ताच्या वाड्याला
देवा सोडावी सोडावी जेजुरी

बानू देवाची देवाची आवडी
शेळ्या-मेंढ्यांच्या मेंढ्यांच्या परवडी
दह्या-दुधाच्या दुधाच्या कावडी
घुसळण खातील खातील मंदिरी

माझा देव हो देव हो झालाय येडा
लुटी धनगर-गावड्यांचा वाडा
असतील आपुल्या आपुल्या हो नडी
या हो पावन होईल ही पिढी

शिवराईत जागर मांडिला
वाघ्या-मुरळीनं भंडार उधळिला
दीपमाळ ही उजळावी वक्ताला
हुईल आनंद यळकोट अंतरी
कानडा - वेडावाकडा / दुर्बोध / कर्नाटकी / एक राग.
महाराष्ट्र संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे शाहिरी वाङ्मय. याच शाहिरी परंपरेने मराठी मनांचे भरणपोषण केले आहे. कधी पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण, तर कधी वर्तमानातील विसंगतीवर आसुड. कधी लोकरंजनातून प्रबोधनाचा प्रयत्‍न, अशी समाज जागा ठेवण्याची मोठी कामगिरी शाहिरी परंपरेने केली आहे. शिवपूर्व कालखंडापासून ते आजपर्यंत शाहिरांची एक संपन्‍न परंपरा मराठी मातीने अनुभवली आहे. सातारा जिल्हा तर साक्षात नररत्‍नांची खाण. राजकारण, साहित्य, संस्कृती, कला, पराक्रम अशा सर्वच क्षेत्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व या सातार्‍याच्या मातीने देशाला दिली आहेत. लोकशाहीर महाराष्ट्र भूषण पुंडलिक फरांदे हे याच परंपरेतील एक महत्त्वाचं नाव.

लोकशाहीर पुंडलिक फरांदे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे, राष्ट्रीय चळवळीच्या भारलेल्या काळाचे महत्त्वाचे साक्षीदार. प्रखर देशभक्त, हाडाचे सत्यशोधक विचारवंत, समाज परिवर्तनासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यप्रवण राहणारे कार्यकर्ते, लोकशिक्षक, ऐतिहासिक पोवाड्यांच्या जोडीला असंख्य लोकगीतांची रचना करणारे प्रतिभावंत रचनाकार, अशा अनेक विशेषणांनी नव्या पिढीला शाहिरांची ओळख करून द्यावी लागेल. भारतीय प्रबोधनाचे अग्रणी महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या कर्त्या सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये शाहिरांचा समावेश होतो. सत्यशोधक समाजाचे वर्ग चालवून समाज जागृतीची मोठी चळवळ उभी करणार्‍या, सत्यशोधक विचारवंत केशवराव विचारे गुरुजींचा सहवास शाहिरांना लाभला. त्यातूनच आपल्या शाहिरी कलेचा वापर करून परिवर्तनवादी विचारांची पेरणी करण्यासाठी शाहिरांनी महाराष्ट्र पालथा घातला. कोणत्याही स्वरूपाच्या अर्थप्राप्तीची अपेक्षा न बाळगता त्यांनी हजारोंच्या संख्येने कार्यक्रम केल्याची नोंद इतिहासात आहे.

शाहिरी ही सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी स्वतःच्या प्रतिभेला अभ्यासाची, चिंतनाची आणि समाज निरीक्षणाची जोड द्यावी लागते. शाहीर फरांदे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावर पोवाडे रचले आहेत. त्यासाठी मोठी ज्ञानसाधना त्यांना करावी लागली. प्रतापसिंह महाराजांवर पोवाडा रचताना त्यांनी आज दुर्मिळ असलेले रघुनाथराव राणे यांनी लिहिलेले प्रतापसिंह चरित्र, तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचे दैवाचा सातारा, हे छत्रपती प्रतापसिंह महाराजांवरील पुस्तक, इत्यादी बरेच साहित्य जमवून अभ्यासले होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन करताना -
क्रांतीचा डोंब पेटला । देश उठला । नेहरू आघाडीला ।
गांधीजींनी धुरा घेतली हाती । आझाद हिंद सेना जोर करती । तेव्हा स्वराज्या झाली पूर्ती ।
अशा अनेक रचना शाहिरांनी केल्या.

शाहिरांनी लिहिलेल्या धनगर गीताला त्या काळातील प्रसिद्ध तमाशा कलावंत लक्ष्मी मंजुळा कोल्हापूरकर यांनी त्यांच्या संगीत बारीमध्ये घेतले होते. तेव्हा ते गीत इतके गाजले होते, की त्याकाळी तब्बल एक लाख रुपये दौलत मराठी रसिकाने या गाण्यावर जादा केली होती.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह यशवंतराव मोहिते, शिवाजीराव पाटील यांच्यासारख्या राजकीय रथी-महारथींच्या बरोबरीने शाहिरांनी कॉंग्रेसची विचारधारा सर्व सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य केले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यावेळचे नेते परिवर्तनवादी विचार परंपरेचे पाईक होते. लोकशाही समाजवादाच्या स्वप्‍नाकडे समाजाला घेऊन जाण्याची धडपड ते करत होते. काळाबरोबर या सर्वच गोष्टी मागे पडत गेल्याची खंत शाहिरांना होती.

ज्या काळात महात्मा फुले यांचे साहित्य अगदीच दुर्मीळ झाले होते. त्या काळात शाहिरांनी गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या दोन पुस्तकांच्या मूळ प्रती मिळवण्यासाठी महाराष्ट्र पालथा घातला. या पुस्तकांची दुर्मिळता आणि उपयुक्तता ध्यानात घेऊन शाहिरांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडे ही पुस्तके छापण्यासाठी तगादा लावला. थोर चरित्रकार धनंजय कीर यांना घेऊन शाहीर बाळासाहेब देसाई यांच्याकडे गेले होते. पुढे या कामाला व्यापकत्व प्राप्त झाले.

सातारा भागातील वैदू, कोल्हाटी, जोशी बागडी अशा भटक्‍या समाजाच्या विकासासाठी शाहिरांनी हयात खर्ची घातली. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अघोरी प्रथा, उच्चनीचता यांवर प्रहार करणारे पोवाडे शाहिरांनी लिहिले. अक्षर ओळख नसलेल्या या समाजाला सुधारण्याचा उपाय म्हणून त्यांनी लोकरंजनातून लोकशिक्षणाचा मार्ग काढला. त्यासाठी असंख्य कार्यक्रम केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे शाहिरांच्या लोकगीत संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "शंभर व्याख्यानांनी जो प्रभाव साधला नसता तो शाहीर पुंडलीक फरांदे यांच्या एका कार्यक्रमाने साधत होता."

सातार्‍यातील ज्येष्ठ पत्रकार आणि चरित्रकार जयवंत गुजर यांनी 'शाहीर फरांदे एक वादळ' या नावाने शाहिरांचे चरित्र लिहिले आहे. त्या चरित्रात ते म्हणतात, "महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे, हे असे एक शाहीर आहेत, ज्यांची तुलना फक्त त्यांच्या स्वतःशीच होऊ शकते. आवाजातील मधाळ गोडवा, तालसुरांचा सुरेख समन्वय, यापेक्षाही काही खास वेगळेपण त्यांच्याकडे होते. ते वेगळेपण म्हणजे गोरगरिबांविषयीचा कळवळा. समाज जागरणाची मनस्वी ओढ आणि सत्यशोधकीय तत्वज्ञान हाच त्यांच्या शाहिरीचा आत्मा होता. त्यांच्या कवनात अक्षरांची धुळवड नाही तर ते सामाजिक आक्रंदन आहे. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ते शेवटचे सत्यशोधक होते. समाज दर्शन घडविण्याची अभूतपूर्व ताकद त्यांच्याकडे असल्याने त्यांनी कधी बाजारी मार्केटिंग केले नाही. लोकरंजन व लोकशिक्षणासाठी त्यांची लोकगीते होती, जी शतकानुशतके आळवली जातील.''

अर्धशतकाहून अधिक काळ लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांनी मराठी जनमानसाचे मनोरंजन आणि प्रबोधन केले. शाहिरी क्षेत्रातील अत्यंत मानाचा, शाहीर अमर शेख पुरस्कार देऊन शाहिरांचा गौरव करण्यात आला. २५ जून १९६९ या दिवशी मुंबई येथील ज्या सायन मांडवी कोळीवाडा सभागृहात, पूर्वी ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी अर्पण करण्यात आली. त्याच ठिकाणी महात्मा फुले यांच्या या सच्च्या अनुयायाला, लोकशाहीराला, मुंबईच्या माथाडी कामगारांनी व महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी एकत्र येऊन उस्फूर्तपणे 'महाराष्ट्र भूषण'ही पदवी अर्पण केली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते आणि पद्मभूषण सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हजारो लोकांच्या साक्षीने हा सोहळा झाला. वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेताना लिहिले होते,"महाराष्ट्रभरातून आलेल्या लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या चाहत्यांनी आणलेल्या हारतुर्‍यांनी एक ट्रॉयली भरली असती." एवढे प्रचंड प्रेम महाराष्ट्राने शाहिरांवर केले. मराठी समाजाने उस्फूर्तपणे निवडलेला हा पहिला आणि बहुदा शेवटचाच महाराष्ट्र भूषण होता.
(संपादित)

प्रा. निरंजन फरांदे, आनेवाडी, सातारा.
सौजन्य- दै. पुढारी (मुंबई) (६ ऑगस्ट २०२२)
(Referenced page was accessed on 13 September 2022)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख