गुलाब जाईजुई मोगरा फुलवीत
दादाच्या मळ्यामंदी मोटचं मोटं पानी
पाजिते रान सारं मायेची वयनी
हसत डुलत मोत्याचं पीक येतं
लाडकी लेक राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं
सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई
गोजिरी शिरपा-हौसा म्हायेरी माज्या हाई
वाटंनं म्हयेराच्या धावत मन जातं
गडनी सजनी गडनी सजनी गडनी ग
राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी जिवाचं लिंबलोण
मायेला पूर येतो, पारुचं मन गातं
गीत | - | योगेश |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | साधी माणसं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
तरुवर | - | तरू / झाड. |
पुढे भालजी पेंढारकरांनी 'योगेश' हे नाव कवी म्हणून स्वीकारलं ते माझ्या मुलाच्या (योगेश खडीकर) नावावरून.
'राम राम पाव्हणं' मध्ये दीदीनं संगीतकार म्हणून लता मंगेशकर हेच नाव लावलं होतं. संगीतकार म्हणून वेगळी प्रसिद्धी तिला नकोच होती. मग बाबांच्या चित्रपटांचं संगीत तिनं 'आनंदघन' या टोपणनावानं दिलं. हे नाव कसं सुचलं ते आधी सांगितलंच, पण पुढे तिच्या या नावामुळे एक गंमत झाली.
सुरुवातीला 'आनंदघन' म्हणजेच लता मंगेशकर हे चित्रपट वर्तुळातली मोजकी माणसं सोडली, तर कुणाला फारसं माहीत नव्हतं. 'मोहित्यांची मंजुळा' आणि 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटांचं संगीत गाजल्यावर हा 'आनंदघन' नावाचा नवीन संगीतकार कोण याचा शोध सुरू झाला. नावावरून काहीच बोध होत नव्हता. अर्थात दीदीलाही हेच हवं होतं. नंतर 'साधी माणसं' साठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीतकार हा पुरस्कार 'आनंदघन'ला जाहीर झाला. हा पुरस्कार घ्यायला दीदी स्टेजवर गेली आणि रसिकांना खरा उलगडा झाला.
(संपादित)
मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' या पुस्तकातून.
शब्दांकन- प्रवीण जोशी
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.