गीतात न्हाली तुजमुळे,
साधीसुधी संभाषणे
तू पाहता फुलल्या कळ्या
बागेतल्या हृदयातल्या
झाली निराळी स्पंदने
कळले मला दिसताच तू
माझीच तू माझीच तू
माझेतुझे नाते जुने
ना योजिता नजरेतुनी
मन जाय पुरते वाहुनी
आता कशाची बंधने?
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
राग | - | गोरख कल्याण |
गीत प्रकार | - | भावगीत, मना तुझे मनोगत |
स्पंदन | - | कंपन, आंदोलन. |
एका फार मोठ्या विद्वान गायकाचे आणि विशेषतः एका मातबर संगीतकाराचे हे शब्द मला खूप सुखावून गेले. माझ्या इतर कामामुळे मध्यंतरी थोडा काळ लोटला. त्यांच्याशी संपर्क साधला गेला नव्हता. एक दिवस मी दादर पोर्तुगीज चर्च जवळच्या ८७ नंबरच्या बसकरिता उभा होतो. मागून हाक आली "रामभाऊ”. मी वळून पाहिलं तर प्रत्यक्ष बुवा. त्यांना बरेच दिवसांत न भेटल्याने मी जरा खजील झालो. बुवा म्हणाले, "आपल्या कामाचं काय झालं?" माझ्याकडून झालेल्या दिरंगाईबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून म्हटलं "उद्या येतो, बसू या.”
दुसरे दिवशी बुवांकडे गेलो. दहा-बारा अभंग ऐकवले. बुवांनी त्यांतले सहा निवडले, एल. पी. करिता. एच. एम. व्ही शी ज्यावेळी बोलणी झाली त्यावेळी असा बूट निघाला की चार अभंगांची एल. पी. करावी आणि दोन भावगीतं करावी इ. पी. वर. त्यानुसार सुधीर मोघे यांची दोन दर्जेदार गीतं स्वरबद्ध केली- "तपत्या झळा उन्हाच्या" आणि "मन लोभले मनमोहने." बुवांनी ह्या सहाही रचना उत्तम गायल्या आहेत. त्यांच्या मैफलींत ह्यांपैकी काहींचा समावेश असतो. "आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण" किंवा "संत भार पंढरीत" हे अभंग आणि "मन लोभले मनमोहने" हे गीत. ते बुवा फार बहारीने म्हणतात.
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.