A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मनरमणा मधुसूदना

मनरमणा । मधुसूदना ।
मुखीं राहो माझ्या ।
प्रभो हे नाम सदा ॥

आठविता रे गोकुळीच्या बाळलीला ।
आनंदें नटला जीव हा ।
येईल का रे काळ ऐसा । दिव्यतेचा ।
द्याया सौख्य पुन्हा ॥
४५ वर्षानंतर

ता. २३ अगस्ट १९४२ रोजी 'कुलवधू' या माझ्या संगीत नाटकाच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि आज ४५ वर्षांनंतर सातवी आवृत्ती निघत आहे. कादंबरी, लघुकथासंग्रह, कवितासंग्रह, आत्मचरित्रे, लघुनिबंध, प्रवासवर्णने या साहित्यातील इतर प्रकारांपेक्षा नाटक हा प्रकार अगदीच वेगळा आहे. कारण इतर प्रकारची पुस्तके आपण वाचू शकतो. नाटक मात्र वाचण्यापेक्षा पाहण्याचीच जास्त गरज असते. नाटके केवळ वाचण्यासाठी कोणी विकत घेत असेल, असे वाटत नाही. आणि असे असताही 'कुलवधू' ची सातवी आवृत्ती निघावी हे कौतुकास्पद आहे. यापूर्वी इतर नाटककारांच्या नाटकांच्या आवृत्या निघाल्या नाहीत असे नाही. विशेषतः, 'सौभद्र', 'स्वयंवर', 'मानापमान', 'मृच्छकटिक', 'सत्तेचे गुलाम' वगैरे अनेक संगीत नाटकांची पुस्तके लोक आवडीने विकत घेत; पण ती एवढचासाठीच की, ही नाटके थिएटरात पाहताना ते हातात पुस्तके घेऊन बसत व त्यातली गाणी ऐकताना स्वतःशी गुणगणत असत ! नाटकातला गद्यभाग ते फारसा पाहत नसत. 'कुलवधू' हेही संगीत नाटक आहे; पण त्यात पाच-सहाच पदे आहेत. तेव्हा इतर संगीत नाटकाप्रमाणे त्यातल्या पदांसाठीच 'कुलवधू' नाटकाच्या पुस्तकाचा एवढा खप झाला असेल, असे वाटत नाही.

हे नाटक १९४२ साली रंगभूमीवर आल्यावर रंगभूमीचा एकंदर तोंडवळा बदलला, असे म्हटले जाते ते कितपत सार्थ आहे, हे प्रेक्षकांनी व वाचकांनीच ठरवावे. पण त्यानंतर रंगभूमीवर आलेल्या नाटकातली कृत्रिमता कमी कमी होऊ लागली आणि नवीन नाटककारांचा कल स्वाभाविकतेकडे विशेष जास्त होत चालला, हे मात्र दिसून आले. अर्थात, या स्वाभाविकतेचाही नंतर काही काही नाटकांत एवढा अतिरेक होत चालला, की रंगमंचावर स्त्रीने साडी बदलणे, स्त्रीच्या साडीवर रक्ताचा एखादा डाग पडलेला दाखवणे, दाराला भोक पाडून त्यातून पलिकडच्या शय्यागृहातील स्त्रीपुरुषांच्या कामक्रीडेचे दृश्य पाहण्याचा एखादे पात्र प्रयत्‍न करीत असलेले दाखवणे वगैरे प्रकार रंगभूमीवर होऊ लागले, ते मात्र त्याज्य व निंद्य होते. स्वाभाविकतेच्या नावाखाली एवढे बेताल वर्तन काही काही नाटककारांकडून होऊ लागलेले पाहून प्रेक्षकांना अशा नवीन नाटकांची शिसारी येऊ लागली. या वृत्तीतूनच नंतर आणखी काही करंटया नाटककारांनी हॉट आणि 'हिट' नाटके रंगभूमीवर आणली आणि रंगभूमीचे संपूर्ण वस्त्रहरण केले.

आज मराठी रंगभूमीवर ज्यांची नाटके सतत येत आहेत त्यात श्री. वसंतराव कानेटकर हे सर्वश्रेष्ठ नाटककार गणले गेले आहेत. त्यांच्या नाटकांचे विषय विविध स्वरूपाचे असतात. त्यांच्या नाटकांएवढा बांधेसूदपणा इतर नाटककारात क्वचितच आढळतो. त्यांचे प्रत्येक नाटक त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन लिहिले आहे, हे प्रत्ययाला येते. कथानकात अगर नाटकाच्या एकंदर बांधणीत त्यांचा ढिलेपणा आढळून येत नाही.

या एवढ्या वर्षांत मला माझ्या काही हितचितकांनी अनेकदा आग्रह केला. “पुन्हा 'कुलवधू' सारखं एखादं नाटक लिहा ना !" पण मी त्यांचे समाधान करू शकलो नाही. कारण ‘कुलवधू' सारखेच दुसरे नाटक लिहावयाचे म्हणजे कसे? वास्तविक त्यानंतर मी १७-१८ नाटके लिहिली. त्यांपैकी एकही त्यांना 'कुलवधू' सारखे वाटले नाही. हा माझा पराभव म्हणायचा की काय? पण एकासारखेच दुसरे नाटक लिहिता येते काय? अमुक एक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणार्‍या निरनिराळ्या मालमसाल्याची मापे पाकशास्त्रावरील पुस्तकात दिली जातात; तशी काही सोय एका नाटकासारखे दुसरे नाटक लिहिण्याच्या बाबतीत झालेली नाही, तोपर्यंत असा आग्रह एखाद्या लेखकाला करण्यात अर्थ नाही ! तरी देखील मी काही जणांच्या अत्याग्रहाला बळी पडून 'कुलवधू'चा उत्तरार्ध म्हणून 'भाग्योदय' हे नाटक लिहिण्याचा मूर्खपणा केलाच- आणि तोंडघशी पडलो !
(परिणामी दंतवैद्याकडे जाऊन दातांची कवळी बसवण्याचा निरर्थक खर्च करावा लागला !)

मराठी माणसे नाटकवेडी आहेत, हे मात्र बोलपट निघाले असताही, प्रत्ययास आल्यामुळे मराठी रंगभूमी पुन्हा पूर्ववत् प्रफुल्लित व चैतन्यशील होत आहे, हे दिसून आले आहे. नाटकाला लोकाश्रय आहे, तसा राजाश्रयही मिळू लागला आहे. गेल्या वर्षापासून कै. राम गणेश गडकर्‍यांच्या नावे दरवर्षी एका प्रमुख मराठी नाटककाराला 'गडकरी पारितोषिक' मिळू लागले आहे आणि लौकरच बालगंधर्वांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्री यांनाही दरवर्षी 'बालगंधर्व पुरस्कार' मिळावा म्हणून आपले महाराष्ट्र शासन प्रयत्‍न केल्यावाचून राहणार नाही. असे झाल्यास मराठी रंगभूमी ही अखिल भारतात मोठ्या मानाने मिरवील आणि मराठी रंगभूमीवरील नट, नाटककार आणि इतर कलाकार अखिल भारतात लोकप्रिय होतील.

मला पुष्कळदा वाटते की, महाराष्ट्राप्रमाणे जर इतर भाषांतील प्रांतांत रंगभूमीची चळवळ होईल तर मराठी नाटके निरनिराळ्या अनेक भाषांत अनुवादित होऊन मराठी नाटककारांचा त्यांना परिचय होईल. मराठी नाटककारांची ख्याती महाराष्ट्राबाहेर पसरणे आवश्यक आहे. निवडक मराठी नाटके गुजराथी, हिंदी, बंगाली, तामीळ, कानडी वगैरे भाषांत अनुवादित करून त्यांचा प्रसार पुस्तकरूपाने करण्याचे कुणा तरी प्रकाशकाने मनावर घेतले, तर ही कल्पना कालांतराने प्रत्यक्षात येणे अशक्य होणार नाही. किंवा निरनिराळ्या भाषांतील कुशल नट घेऊन त्यांच्याकडून ही नाटके प्रयोगरूपाने त्या त्या प्रांतात दाखविण्याचे धाडस कुणीतरी नाट्यसंस्थेने अंगावर घेतल्यास त्यामुळेही हा कार्यभाग साध्य होईल. एरव्ही केवळ महाराष्ट्रातच मराठी नाटकांचे कोडकौतुक होईल तेवढेच. अर्थात ही नाटके निवडताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, त्यांचा अनुवाद केल्यावर ती नाटके अगर त्यांतील विषय, कथानक, वातावरण हे सर्व त्या त्या भाषेतील प्रेक्षकांना परके न वाटता आपलेच वाटले पाहिजे. त्याशिवाय त्यांना त्या नाटकांबद्दल आपुलकी वाटणार नाही. भारतातील रंगभूमीबद्दल बोलले जाते, तेव्हा बंगाली आणि मराठी या दोनच भाषांतील रंगमंच संपन्‍न आणि अग्रभागी समजले जातात. यासाठी इतर भाषांतील रंगमंचांनी त्यांना आदर्श मानणे आवश्यक आहे आणि या दोन्ही भाषांतील निवडक नाटके अनुवादित करून त्यांनी ती पाहिजेत.

नाटकांच्या विषयाबद्दल केव्हा केव्हा आपल्याकडे काही विचित्र समजुती असलेल्या आढळून येतात. 'कुलवधू' ही मध्यवर्ती कल्पना आता प्रेक्षकांना कालबाह्य झालेली वाटेल, असे काही जणांना म्हणताना मी ऐकले आहे. मला ते पदत नाही. मनुष्यस्वभाव काळाप्रमाणे बदलत असतो हे खरे नव्हे. आपली पत्‍नी आपल्यापेक्षा जास्त कीर्तिमान झाली व लोक आपल्याला तिच्यामुळे तिचा नवरा म्हणून ओळखतात, याचे शल्य १९४२ साली हे नाटक रंगभूमीवर आले त्यावेळी पुरुषांना वाटत होते आणि आता १९८७ साली ते वाटत नाही काय? आणि आणखी पचास वर्षांनी वाटल्यावाचून राहील काय? मग 'कुलवधू' नाटक आता जुने झाले, त्यातली समस्या आता उरलेली नाही, असे कोणत्या आधारावर म्हटले जाते?

काहीजणांच्या मते आता नाटकाचे तंत्र बदलले आहे. ही आणि एक भ्रामक कल्पना ! पूर्वी प्रेक्षकासमोर नट-नटी उभ्या राहत आणि आता काय त्या पडद्यामागे उभ्या राहून बोलतात? तंत्रतंत्र ते काय? वरून, मागून, कोपर्‍यातून असे दहा-बारा लाइटस् टाकले म्हणजे नवीन तंत्र झाले काय? आम्ही तर स्टेजच्या दोन बाजूस दोन गॅसबत्त्या ठेऊन 'कुलवधू' चे प्रयोग केव्हा केव्हा खेडेगावातून केले आहेत. पण त्यामुळे काहीही खटकले नाही. ज्यांच्या नाटकातच बळ नसते त्यांना दहा-बारा स्पॉटस्, डीमर्स, फ्लड्स वगैरे सरंजाम आणून प्रयोगाला शोभा आणावी लागते. तंत्राचा बडिवार मिरवण्यापेक्षा नाटकातच काही जीव आणला तर तो प्रेक्षकांना पुरेसा वाटतो. कारण प्रेक्षक नाटक पहायला येतात; तुमचे लाइट्स आणि खिडकीबाहेर तारेला अडकलेला एखादा फाटका पतंग पाहायला येत नाहीत !
(संपादित)

मो. ग. रांगणेकर
दि. १० फेब्रुवारी १९८७
'कुलवधू' या नाटकाच्या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.