A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन सुद्ध तुझं गोस्त

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.

झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बी खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ विजयाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर- मास्टर परशुराम
चित्रपट - कुंकू
ताल-दादरा
गीत प्रकार - चित्रगीत, मना तुझे मनोगत
'देवदास' या चित्रपटातील सायगल-जमुना यांची भावपूर्ण कामे, पोषक संगीत, सरळ अंत:करणाला भिडणारे चित्रण, हृद्य संवाद आणि कुशल दिग्दर्शन या गुणसमुच्चयामुळे तो त्या काळात फारच लोकप्रिय होऊन गाजला होता. विशेषत: उच्च शिक्षण घेणारे कॉलेजकुमार तर या चित्रपटावर इतके फिदा झाले होते की, त्यातले कित्येक भग्‍नहृदयी तरुण देवदासाप्रमाणेच पोशाख करून भंगटासारखे रस्‍त्‍याने सैरावैरा हिंडू लागले होते. प्रेमनाश झाला की जीवितांत दुसरे जगण्यासारखे उरलेच काय, असा भ्रामक समज निर्माण होऊन पसरणे, ही एक राष्ट्रीय आपत्तीच त्या स्वातंत्र्यपूर्व काळात आली म्हणायची !

'देवदास'चा हा विपरीत परिणाम पाहून प्रभातचे दिग्दर्शक शांतारामबापू यांना अतिशय खेद झाला. कर्तबगार तरुणांनी प्रेमभंगाने हतबल व्हावे, आपल्या देशाविषयीच्या, स्वत:विषयीच्या कर्तव्यास साफ विसरावे, हा देखावा त्यांच्याच्याने बघवेना. वास्तविक 'देवदास'च्या लेखकाने आपल्या कादंबरीच्या अखेरीस पुढील स्पष्ट इशारा दिला आहे. "देवदासप्रमाणे अत्यंत हतभागी, असंयमी, पापी माणसाशी तुमची जर कधी गाठ पडली तर त्यासाठी थोडी प्रार्थना करा ! आणखी काहीही होवो पण असा मृत्यू कोणालाही न येवो !"
इतका स्पष्ट इशारा लेखकाने दिला खरा, पण चित्रकथालेखकाने व दिग्दर्शकाने लेखकाचा हा शेवटचा महत्त्वाचा इशारा आपल्या पटकथेत न आणल्याने लेखकाच्या ईप्सितापेक्षा विपरीतच परिणाम झाला. देवदासप्रमाणे 'दुखके अब दिन बीतत नाही, सैया बिन नाही आवत चैन' अशा प्रकारचे नुसते विलाप तरुण पिढीने करीत बसण्याऐवजी,
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
हे जाणून घेऊन झुंजार वृत्तीने जीवन जगावे, असा दिव्य संदेश प्रभातने देण्याचे ठरविले. (त्याचेच पर्यवसान म्हणजे 'कुंकू', 'माझा मुलगा' व 'माणूस' हे एकामागून एक निघालेले प्रभातचे चित्रपट.)

त्या अनुषंगाने झुंजार जीवन जगणार्‍या 'कुंकू' या चित्रपटातील नायिकेच्या तोंडून प्रख्यात अमेरिकन कवि Henry Wadsworth Longfellow यांच्या 'A Psalm of Life' या कवितेचे पुढील चरण समरसतेने वदवले आहेत-
In the world's broad field of battle,
In the bivouac of Life,
Be not like dumb, driven cattle !
Be a hero in the strife !

मुकी बिचारीं कुणी हका
अशी मेंढरें बनूं नका
सुखदुखु:खाचे भोग भोगणे
हा मुळि 'जीवितहेतु' नसे
उद्यां आजच्यापेक्षां काही
पुढेचि जाऊं करा असें
(भाषांतर- कै. हरि नारायण आपटे)

'मन सुद्ध तुझं' हे गाणं म्हणणारा पोरगा परशुराम असा अवचित एके सकाळी शांतारामबापूंच्या घरी येऊन नोकरीकरतां धरणे धरून बसला. शांतारामबापूंनी त्याला "जा, नोकरी नाही." म्हणून कितीतरी वेळा सांगितले पण तो जागचा हलेना. "निदान माझं गाणं तरी ऐकाल का?" असे त्याने विचारले. तेव्हा "म्हण" म्हणून शांतारामबापूंनी आपले काम सुरू केले. परशुरामाने 'अंधे की लाठी' हे अंधगायक कॄष्णचंद्र देव यांचे त्याकाळचे लोकप्रिय गाणे अशा ठसक्यात म्हंटले की शांतारामबापू त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागले. ते आगाऊ पोरगं मग चिकटलेच त्यांना ! दहा वाजतां त्यांनी संगीतविभागात या पोर्‍याला आणून मला ऐकविला. त्याची ढंगदार स्वच्छ वाणी ऐकून मी त्याला 'मन सुद्ध तुझं' गाणे शिकवू लागलो. हे पोरगं उपजतच नट होते. परशुरामाने या गाण्याचा छोटा पण महत्त्वाचा प्रसंग असा गहिरा रंगविला की त्याला चित्रपटाच्या इतिहासात तोड नाही.

तो उत्तम नकलाकार होता. मुंबईपुण्यात भिकारी लोक फिल्मी गाणी कशी म्हणतात याची नक्कल तो आम्हाला करून दाखवित असे. त्यांतील म्हणण्याच्या चित्रपटांत शोभतील काही लकबी आम्ही या गाण्याच्या म्हणण्यात व हावभावात घेतल्या. हा भिकारी कथेत एकदमच उपटसुंभ वाटू नये म्हणून कथेत आधी त्याला नीरा, अक्का बागेचे काम करीत आहेत त्या प्रसंगी रस्‍त्‍यावरून गाणे म्हणत जात असताना दाखविला. म्हणजे त्या गावातला तो नेहमीचा एक भिकारी आहे, हे चिकित्‍सक प्रेक्षकांच्या लक्षात आलेच.

या गाण्याच्या साथीची वाद्ये म्हणजे गाणारे भिकारी घेतात तीच. एक फुटकी हातपेटी आणि तालाकरिता दिमडी. ही वास्तवता संपूर्णपणे पटणारी होती. संपूर्ण ऑर्केस्‍ट्रा साथीला ठेवण्याचा अवास्तव व न पटणारा प्रकार (उदाहरणार्थ फणी मुझुमदार यांचा 'स्ट्रीटसींगर'.) आम्ही केला नाही. कारण पडद्यावर वाद्येंही दाखवायची होती गाणारे पात्र खरोखरीच भिकारी होते. ग्रामोफोन रेकॉर्डमध्येही आम्ही तीच आणि तेवढीच वाद्ये ठेवली आहेत.
हे गाणे सर्व प्रेक्षकांच्या दृष्टीने पहिल्या दर्जाचे झाले.
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.