A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मना तुझे मनोगत

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?
तुझ्यापरी गूढ-सोपे होणे मला जुळेल का?

कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला
आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला
तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का?

कळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श
तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश
तुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का?

कशासाठी कासाविशी, कशासाठी आटापिटी?
खुळा ध्यास-आभासांचा पाठलाग कोणासाठी?
तुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का?
आर्त - दु:ख, पीडा.
"अमित, तू कोणत्या दिशेला चालला आहेस.. मला आनंद (मोडक) कडे जायचंय.. वाटेत जवळपास सोडतोस का?" सुधीर मोघे सरांच्या घरून मी निघताना सर विचारते झाले. अश्या प्रस्तावानंतर मी उरलेल्या नऊ दिशांपैकी कोणत्याही दिशेला जाणे शक्यच नव्हते. मी म्हणलो, "वाटेत कशाला, त्यांच्या घरीच सोडतो की !" आणि अगदी सहज, मित्राच्या पाठीवर हात ठेऊन टांग टाकावी तसे सर माझ्या बाईकवर मागे बसले देखील. वाटेत अर्थात सुधीर मोघे आणि आनंद मोडक द्वयीच्या गाण्यांचाच विषय..

"सर तुमच्या दोघांचे मला सगळ्यात जास्त आवडणारे गाणे म्हणजे, 'मना तुझे मनोगत'.. किती सुंदर साधे पण अर्थपूर्ण शब्द आणि त्याला तितकीच सुंदर दिलेली म्युझीकल ट्रीटमेंट. अगदी कमीत-कमी वाद्यमेळ आणि प्रत्येक शब्दाला योग्य न्याय देणारा आशाताईंचा आवाज.."

"कळत-नकळत साठी स्मिताला (तळवलकर) 'मन' या विषयावर एखादे गाणे हवे होते. काही वर्षांपूर्वीच माझे 'मन मनास उमगत नाही..' लिहून झाले होते.. पण त्याच्यावर श्रीधरने (फडके) आधीच काम केले होते. आता नवीन गाणे लिहिणे आले. मी म्हणालो, हरकत नाही.. नवीन तर नवीन !!

आणि मग हे गाणे लिहिले.. 'मना तुझे मनोगत..' आणि लिहिल्या-लिहिल्या माझी मलाच गंमत वाटली. एक कवी म्हणून काही वर्षांपूर्वी माझ्यासाठी मन म्हणजे 'आधार कसा शोधावा.. काळोखाची गुंफा.. रानभूल आणि चकवा'
तर आज त्याच मनाला मी सरळसरळ भिडून विचारता झालेलो की 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?'.. एकेकाळी अनाकलनीय वाटणार्‍या मनाला समोरासमोर बसून प्रश्‍न विचारण्याइतपत झालेला माझ्यातल्या कवीचा प्रवास मलाच सुखावून गेला."

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.