दल दल उघडित नवनवलाने
कमलवृंद पाहतो
नील जलावर धवल विहग तो
जलवलयांसह खेळ खेळतो
श्रीरामांच्या वक्षस्थळी जणू
मौक्तिकमणी डोलतो
दिवास्वप्न की भास म्हणू हा
वनवासाचा ध्यास जणू हा
मनी वसे ते नयनांपुढती
सजिवपणे रेखितो
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | भूमिकन्या सीता |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत |
टीप - • नाटकाच्या मूळ संहितेत पदे नाहीत. रंगमंचीय सादरीकरणाच्या वेळेस त्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता. |
विहंग | - | विहग, पक्षी. |
'भूमिकन्या सीता' आम्ही बसवावे व त्यात ज्योत्स्नाबाईंनी सीतेची भूमिका करावी, ही मामा वरेरकरांची बर्याच दिवसांची इच्छा होती. "मी मरण्यापूर्वी मला हे नाटक रंगभूमीवर आलेले पाहू दे", असे ते नेहमी म्हणत. पण ते नाटक प्रोज होते. म्हणून श्री. ग. दि. माडगूळकरांकडून योग्य जागी गाणी तयार करून घेतली आणि स्नेहल भाटकर चालीच्या मागे लागले. राहता राहिला राम. ज्योत्स्नाबाईंना शोभेल असा व दिसेल असा नट हुडकून काढणे जरूर होते. अशा वेळी राम, कृष्ण वगैरे देवांचे चित्रपटसृष्टीत ठेके घेणारा नट शाहू मोडक हा डोळ्यासमोर उभा राहिला. माझी व शाहू मोडकांची १९३३ सालापासून ओळख होती. त्यावेळी सरस्वती सिनेटोनसाठी मी 'औट घटकेचा राजा' हे कथानक लिहिले होते व त्यात राजपुत्राची आणि भिकार्याच्या मुलाची, अशी दुहेरी भूमिका त्यावेळच्या ९-१० वर्षाच्या शाहूने केली होती. मी त्याला भेटून नाटकाबद्दल विचारताच त्याने आनंदाने रामाची भूमिका करण्याचे मान्य केले व ज्योत्स्ना भोळे आणि शाहू मोडक या जोडीमुळे या नाटकाबद्दलच्या आमच्या व प्रेक्षकांच्याही अपेक्षा खूप उंचावल्या.
शाहू मोडक तालमीला येऊ लागले, पण तालमीपेक्षा नाटकांतील प्रसंगांवर खडाजंगी चर्चा करण्यातच जास्त वेळ जाऊ लागला. शाहू मोडकांच्या रामाबद्दल वेगळ्या कल्पना होत्या आणि वरेरकरांनी नाटकात रंगवलेला राम काहीसा वेगळा होता. पण स्वतःच्या मर्जीप्रमाणे शाहू मोडक संवादांत बदल करून घेऊ लागले. 'हे नाटक वरेरकरांचे आहे' याची त्यांना वारंवार जाणीव करून द्यावी लागे, पण वरेरकरांनी रंगवलेला राम त्यांना पटत नसे. वरेरकरांनी त्याच्यासारख्या 'मर्यादा पुरुषोत्तमा'ला अन्याय केला आहे, हे मोडकांचे म्हणणे. वादाला केव्हा केव्हा भांडणाचे स्वरूप येई, पण ते निघून गेले तर दुसरा राम कुठून आणावयाचा, हा प्रश्न उभा राही. शिवाय, महोत्सव सुरू व्हावयासही थोडा अवधी उरला होता. वस्त्रे, अलंकार, नेपथ्य व आसने तयार करण्यासाठी बराच खर्च होत होता. हा महोत्सव यशस्वी झाला, तर बरेच कर्ज भागवता येणार होते. म्हणून संयमाचा अवलंब करून 'सीते'च्या तालमी चालू ठेवण्यात आल्या होत्या. नाटकाचा पहिला अंक रंगत नव्हता, वनवासातून अयोध्येला आल्यावर राम-सीतेचा पहिलाच मीलनाचा प्रसंग खूप रंगला पाहिजे, असे ज्योत्स्नाबाईंचे म्हणणे होते. वरेरकरांनाही आम्ही हे सांगून पाहिले, पण त्यांना त्यात काही फेरफार करणे सुचत नव्हते. त्यामुळे आहे त्याच स्वरूपात पहिला अंक करण्यात आला.
या नाटकाबरोबर 'अमृत' हे माझे नाटकही महोत्सवासाठी तयार केले होते, पण तिकडे द्यावे तितके लक्ष दिले गेले नाही, असे आता वाटते. नाटकाचा विषय जगावेगळा असला, तरी पात्रे जास्त समर्थ असती व नाटकावर जास्त मेहनत घेतली असती, तर या नाटकांची एवढी शोचनीय अवस्था कदाचित झाली नसती. या व 'भूमिकन्या सीता' या नाटकांखेरीज रंभा, वहिनी, एक होता म्हातारा, भटाला दिली ओसरी व राणीचा बाग ही नाटके दादर येथील अमरहिंद मंडळात करण्यात आली व साहित्य संघमंदिरात लगेच पुढल्या आठवड्यांत केलेल्या महोत्सवात 'राणीचा बाग' या नाटकाऐवजी 'कुलवधू' हा बदल करण्यात आला. कारण, 'राणीचा बाग' नाटकात स्नेहप्रभा प्रधानऐवजी कु. सोहनी नावाच्या एका कॉलेजकन्येने भूमिका केली होती, ती प्रेक्षकांना पसंत पडली नव्हती. 'रंभा' नाटकातही सुधा करमरकरऐवजी कु. अंजला चिटणीस हिने भूमिका केली होती. पण एकंदर महोत्सव अपेक्षेप्रमाणे फलदायी झाला नाही.
'भूमिकन्या सीता' नाटकावर अतिशय खर्च झाला होता. त्या मानाने ते नाटक यशस्वी झाले नाही. उलट, मा. मोडक 'दिसण्यापलीकडे' रामाच्या भूमिकेत प्राण ओतू शकले नाहीत, अशीच टीका ऐकू येत होती. या दोन्ही नाट्यमहोत्सवांचे उत्पन्न पंधरा हजार सुद्धा होऊ शकले नाही.
आपल्या नाटकाचा दिल्लीत प्रयोग व्हावा, ही मामा वरेरकरांची फार इच्छा होती. तसा योग दोनच महिन्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आला. दिल्लीच्या 'साँग अँड ड्रामा डिव्हिजन'चा दर वर्षी नाट्यमहोत्सव होत असे. त्यासाठी त्यांनी आमचे 'भूमिकन्या सीता' व 'भटाला दिली ओसरी' ही दोन मराठी नाटके व 'भटाला दिली ओसरी' हे हिंदी भाषेत असे तीन प्रयोग करण्याबद्दल आमच्याशी करार केला. या एका हिंदी प्रयोगासाठी मराठी पात्रांनाच हिंदी भाषेचा सराव करावयास लावला. आणि आश्चर्य हे की, त्यांनी दिल्लीला तो प्रयोग सफाईने पार पाडला. हिंदीचे विख्यात कवी दिनकर हे तर या हिंदी प्रयोगावर एवढे काही खूष झाले की, सबंध उत्तर हिंदुस्थानात ठिकठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले तर हिंदी प्रेक्षक हे नाटक डोक्यावर घेतील, असे ते म्हणत.
'भूमिकन्या सीता' या नाटकाचा प्रयोग दिल्लीकरांना आवडला. परंतु बंदिस्त नाट्यगृहात कोणत्याही नाटकाला जी रंगत येते, तशी 'ओपन एअर' थिएटरात बहुधा येत नाही आणि दिल्लीच्या टालकटोरा गार्डनमधील 'ओपन एअर' थिएटर हे तर आणखी चमत्कारिक. म्हणजे त्याला मागे, पुढे, बाजूला अगर वर कोठेच आच्छादन नव्हते. फक्त स्टेजचा लांबलचक सिमेंटचा चौथरा ! ड्रॉप नाही- काही नाही. वर आकाश आणि खाली जमीन. अंक पडला म्हणजे स्टेजवर संपूर्ण काळोख करण्यात येई आणि दिव्याची दिशा प्रेक्षकाकडे फिरवून त्यांच्यावर प्रकाशझोत टाकण्यात येई ! पण स्टेजवर कितीही काळोख केला, तरी प्रेक्षकांकडे फिरवलेल्या दिव्यांचा प्रकाश परावर्तित होतच असे आणि शिवाय उघड्या आकाशातील चांदणेही स्टेजवर होते. त्यामुळे एक अंक पडल्यानंतर दुसर्या अंकाची मांडणी करताना प्रेक्षकांना ती दिसत असे.
सबंध १९५८ सालात त्यानंतर नवे नाटक निघाले नाही. पण बडोदा, सोलापूर, पुणे अशा काही मोठमोठ्या शहरी व काही मुंबईत 'भूमिकन्या सीता'चे प्रयोग होत होते, पण या नाटकाच्या खर्चाच्या आणि दगदगीच्या मानाने उत्पन्नाचे मान दिसून आले नाही. सातारा येथील प्रयोगात तर अवघे ३७५ रु. उत्पन्न झाले होते ! आणि शाहू मोडक यांना दर प्रयोगाला दोनशे रुपये द्यावे लागत ! शिवाय त्यांचा मोटारीचा (केव्हा केव्हा विमानाचा !) रेल्वेच्या फर्स्टक्लासचा, स्पेशल हॉटेलचा वगैरे अवांतर खर्च होत असे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग तोट्यातच जात असत. १५-२० प्रयोगांनंतर ते नाटक बंदच करण्यात आले.
(संपादित)
मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' या मो. ग. रांगणेकर यांच्या पुस्तकातून. लेखन सहकार्य जयवंत दळवी.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्, पुणे
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.