A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​मानवा मानवतेला मान

​मानवा मानवतेला मान
मानवतेचा मानवतेला मानूं दे अभिमान

सदा तृप्तता तृप्त असूं दे
सदा मुक्तता मुक्त राहूं दे
अंतिम विजयासाठी येऊ दे नीतिला अवसान
मानवा मानवतेला मान

रामहि गेला, गेला रावण
उरलें केवळ तें रामायण
विश्वासाठी मानवतेचा तो संदेश महान्
मानवा मानवतेला मान

सत्य अहिंसा क्षमा शांतता
हीच मानवा जीवनगाथा
शुद्ध शील हा चारित्र्याचा एकमेव सन्मान
मानवा मानवतेला मान
अर्पण
सर्व न सांपडलेल्या चोरांस.

' वार्‍यांत मिसळलें पाणी '
म्हणजे काय, तें कधींच कळलं नाहीं !
म्हणजेच बहुतेक, वार्‍यांत मिसळलें पाणी !
जणूं काय ते कधी कळलंच तर, अगदीं ' वार्‍यांत मिसळलें पाणी 'च होईल, असा काहीसा अंधुक समजलेला, समजलेला पण न उमजलेला अर्थ.

म्हणजे कांहीं कळतंय मंडळी? मला हे नाटक दिसलं, जसं दिसलं तसं पाह्यलं आणि जसं पाह्यलं तसं दाखवलं. आतां मला दिसलं कसं, तें पहायला समर्थबुद्धी गजाननाचे कुशाग्र नेत्र आहेतच. न्यायान्यायाचा झगडा मिटवणारा अंकुश आहे ! जें मी ऐकलं ते ज्याला ऐकवलं किंवा जे ज्यानं ऐकवलं तेच मी त्याला ऐकवलं, मग तें ऐकायला सगळ्या जगाचीं गार्‍हाणी ऐकणारे गजाननाचे सुकर्ण आहेत !

गजानन हा मिस्किल बुद्धीचा माणूस आहे ! माफ करावं त्यानं मला, मी त्याला, आमच्यांत आणून बसवलं ! पण मला मात्र वाटतं त्यानं आमच्याकडं यावं, आमच्यांत बसावं, मिस्किल खोड्या कराव्यात. कृष्णासारख्या लबाड माणसाला त्यानं धरला ना त्या 'जांबुवंती'च्या प्रकरणांत? गणेशचतुर्थीच्या दिवशीं चंद्र बघितला, तेवढं निमित्त करून ! अशा आणिक कैक असतील ! मला तर केव्हां केव्हां वाटतं लहानपणीं वाकडतोंड्या (वक्रतुंड), ढेरपोट्या (तुंदिलतनु) वगैरे कांहीं तरी म्हटलं असेन कृष्णानं. यानं काढलान् असेल काटा ! महा मिस्किल ! नाहीं तर मोदक चोरले असतील याचे गणेशचतुर्थीच्या दिवशीं ! तो बरोब्बर वस्ताद असावा ! हा माझा तर्क हो, नाहींतर कोणी दाखले मागील. आपल्याजवळ नाहींत !

अहो, वाचनच कमी ! सुचेल तें लिहितों, वाचून कधीं लिहीत नाहीं ! माझा अंदाज आहे गणपती, स्वतःची आरती देखील तुमच्या आमच्याकडनं म्हणवून घेतों, अगदी अद्ययावत् विनोदी बुद्धीनं.
'सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्‍नाची', असं आपण म्हणतों. दरवर्षी न चुकतां, भक्तीनं ! यांत विनोद कसला? कुणी विचारील ! शोधा म्हणजे सापडेल !
'सुखकर्ता दुःखहर्ता' हा गजानन, ही काय विघ्‍नाची वार्ता आहे?​ ​ते 'नुरवी' राह्यलेय​ इथे. ​म्हणण्यापेक्षां ते गेलंय पुढच्या ओळींत.
'सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्‍नाची नुरवी- पुरवी प्रेम, कृपा जयाचीं' ही खरी पहिली ओळ !
'नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाचीं' हा दुसरा विनोद. ज्याची कृपा प्रेम उरवतही नाही नि पुरवतही नाही, ही काय त्याची स्तुति झाली? पण बुद्धि देणारा तोच ना ! म्हणून म्हटलं विनोद तर त्याच्या डोक्यांत. या वेळी मला विनोदी नाटक लिहायला बसवून, विनोद करायचा आलेला दिसतोय !

नाही ! बघा ! म्हणजे ! मारुती हें 'वार्‍यांत मिसळलें पाणी' या नाटकांतलं आद्य दैवत आहे ! आणि हे नाटक शक्तीची महती गाणारं आहे ! आणि त्यांतला विनोदाचा भाग, तें मी लिहिलंय ! माझा शक्तीशी काय संबंध, हे एखादा पहिलवान सुद्धां सांगू शकेल ! बजरंग-गजानन हीं दोन्ही गणेशाचीं रूपं मानली जातात ! दिल्ली पंजाब प्रांतात- मंगळवार हा मारुतीचा वार म्हणून पूजला जातो ! असं मी ऐकलं. जे ऐकलं तें सांगितलं, खरं खोटं निवाडा करणारा तर्क, तो 'फरशु नीती भेदु अंकुशू, वेदान्तु तो महारसु, मोदक मिरवे'. या मोदकांतला महारस कोणचा? ज्याचा मोह भगवद्गीता सांगणार्‍या कृष्णालाही व्हावा ! तर जगांत जन्माला आलेली सगळीं तीर्थ जशी शेवटीं समुद्राला जाऊन मिळतात, तसेच साहित्यांत उत्पन्‍न होणारे सर्व रस अमृताचा आस्वाद घेण्यासाठी ज्या महारसांत उतरतात, तसल्या महारसांतला हा मोदक ! हे वर्णन- हें ज्ञानेश्वरींतलं आहे, पुढच्या नाटकासाठी राखून ठेवूं ! बाकी साठा आहे भरपूर ! समुद्रांतून ओंजळभर पाणी आणल्यासारख्या भाराभर कल्पना आम्ही व्याव्यात. तिथं कांहींच कमी नाहीं ! तर त्या बुद्धीनं सुचवलं आणि या शक्तीनं सामर्थ्य दिलं म्हणूनच- वार्‍यांत मिसळलें पाणी !

एकच आहे, 'अगा अघटित हें घडले', हा दृष्टिकोन नाटकाकडे प्रेक्षकांचा रहावा. हा एक मानस, हें नांव देतांना डोळ्यापुढं होताच ! शिवाय कविता आपोआप झाली ! तसं माझ्या या नाटकाचं खरं नांव 'विश्वास असावा चोरांचा !'
पुढं काय झालं कुणाला ठाऊक ! आम्हांलाच नावाचा विश्वास राह्यला नसेल ! 'वाप्यांत मिसळलें पाणी !' म्हणजे तरी काय? शेवटीं 'विश्वास​ ​असावा चोरांचा ! '. 'वाहतो ही दुर्वांची जुडी' सारखाच 'वार्‍यांत मिसळलें पाणी' हा एखादा मंत्र असावा, अशी हल्ली मला एक विनोदी शंका येऊ लागलीय ! हे नाटक लिहायला लागल्यापासून मला अलीकडे मधून मधून कांही तरी विनोदी होत असतं ! पण खरं सांगतों, भल्या भल्या मांत्रिकांना साधत नाहींत, अशा गोष्टी या नाटकाच्या बाबतींत होत गेल्या.

आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक ! बोलावल्याबरोबर 'हो' म्हणाले, त्यात कांही नवल नाहीं ! नंतर नाहीं म्हणले, त्यांतही कांहीं नवल नाहीं ! तीं कामाची माणसं-येणं म्हणजेच.. मी वहिनींना बोलवतों, असं म्हटल्याबरोबर "जा सांगा", असं म्हणाले. त्यातही कांहीं विशेष नाहीं ! कारण तीं मुळीं रसिकच मंडळी आहेत ! अस्सल वहाडी ! आम्हा नाटकवाल्यांचे जुने आश्रयदाते. अगदी सहकुटुंब.

पण सगळ्यांत म्हणजे, आम्हांला 'सौदागर' पावला ! हनुमंताची कृपा. मला वाटतं मध्यंतरीं मी शिवलीलामृतांतला ११ वा अध्याय वाचला होता, कांहीं सोमवारी. म्हणून हा भोळा शंकर मला प्रसन्‍न झाला ! सौदागर म्हणजे छोटा गंधर्व. आतां 'छोटा' या शब्दाचं बहुवचन करतां येत नाहीं, म्हणून एकेरी बोलायचं ! अद्भुत गृहस्थ ! पूना गेस्ट हाउसच्या खाली फुटपाथवर, 'आमच्या नाटकांतली गाणी म्हणाल का?', असं मी विचारलं. तेव्हां जितक्या सहज ते 'हो' म्हणून गेले, तितक्या सहज ते गाणी म्हणून गेले.

गेले नाही राहिले- राह्यले हे वर्‍हाडी क्रियापद इथें ठीक आहे ! मी कुणाची स्तुति करावी म्हणून बोलत नाही, पण ही वर्‍हाडी भाषा बेटी मोठी प्रेमळ ! 'जाऊन राह्यले' म्हणतात. 'पावने' म्हणजे 'पाव्हणा' जावा वाटत नाहीं ! नाटककार म्हणून प्रेक्षकांच्या नजरेपुढं मला प्रथम उभं केले वर्‍हाडी रसिकांनीं ! आज या नाटकाच्या निमित्तानं 'दुर्वाची जुडी' ही संस्था सुरू करताना ऋण कबूल करण्यासाठी दोन शब्द खर्च केले, तर 'आमी काय केले बाप्पा! तुझा गूण होता. तू यश घेऊन राह्यला !', असं म्हणतील.
म्हणून हळूच आधीच त्यांचे आशीर्वाद मागून ठेवतों !
शक्तीशील नाटकं रुजायला बन्हाडी, माती सुपीक ! सकच्छ विनोदाला सकस खतपाणी तिथं हमखास ! मात्र ह्ये बेनं मूळ पुणे, सातारा, कोल्हापुरी ह्ये खरं ! 'हे बेनं' प्रकरण नाटकभर आहेच. उगीच ऊहापोह नको ! तर सांगत होतों मी, नवलाची गोष्ट- सौदागरांनीं गाणीं म्हटलीं. म्हणजेच, 'वार्‍यांत मिसळलें पाणी !'
त्यांचा आवाज गोड आहे, असं मी म्हणणं, म्हणजे मी त्या आवाजाशी इतकी जवळीक करणं म्हणजे खडीसाखर गोड आहे पण ती जगाला कळावी म्हणून कडू कारल्यानं स्वतःला खडीसाखरेला घासून घेतल्यासारखं आहे ! तिकडचे गुण इकडं येतील, की इकडचे तिकडे जातील, हे समजणें म्हणजे अगदी, 'वार्‍यांत मिसळलें पाणी !'
(संपादित)

बाळ कोल्हटकर
दि. १६ ऑगस्‍ट १९६६
'वार्‍यांत मिसळलें पाणी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव वामन जोशी (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.