A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करां!

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या!
स्वार्थपरायणपरा.

उपकाराची कुणा आठवण?
'शितें तोंवरी भूते' अशी म्हण;
जगांत भरलें तोंडपुजेपण
धरी पाठिवर शरा!

असक्त परि तूं केलिस वणवण,
दिलेंस जीवन, हे नारायण,
मनीं न धरिलें सानथोरपण
समदर्शी तूं खरा!
गीत- भा. रा. तांबे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
राग- मारवा
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- ३ ऑक्टोबर १९३५.
• 'धरी पाठीवर शरा' - तोंड वळवताच वाग्बाण पाठीवर टाकलाच, या अर्थाने.
अर्घ्य - पूजा / सन्मान.
असक्त - उदासीन.
परा - वाणी, भाषा.
परायण - तत्पर / आतूर.
शरा - शस्‍त्र.
सविता - सूर्य.
सान - लहान.