A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मित्रा एका जागी नाही

मित्रा, एका जागी नाही असे फार थांबायचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक
तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक
रक्त इमानी तयाने असे नाही भुलायाचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल
जन्मगाठ जीवघेणी तुला तोडावी लागेल
निरोपाचे खारे पाणी, कुणा दिसू न द्यायचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

होय कबूल; तुलाही हवा कधीचा निवारा
गर्द झाडांची सावली आणि चंदनाचा वारा
पण पोरक्या उन्हात सांग कुणी पोळायचे?
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे
गीत - सुधीर मोघे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- शौनक अभिषेकी
गीत प्रकार - कविता

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.