A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मोहुनिया तुजसंगें नयन

मोहुनिया तुजसंगें नयन खेळले जुगार

ओठावरले हासे
फेकियले रे फासे
खेळाचा होय निकर, हो जिवलग जादुगार

सहज पडे तुजसि दान
लागले पणास प्राण
मीपणांत मन हरलें- येई रे गळ्यांत हार

सारिलेस मोहरें
सहज अडविलेस चिरे
बंद जाहली घरें- खेळ संपणार पार

पळभर जरि जुग जुळलें
कटिवरुनी वरि सरले
एकुलती एक नरद पोटघरी होय ठार

पटावरुन लाजरे
पळे घरांत मोहरे
बाजू बिनतोड मला देई चतुर हा खिलार
गीत - राजा बढे
संगीत - गजानन वाटवे
स्वराविष्कार- गजानन वाटवे
रवींद्र साठे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - शिवरंजनी
गीत प्रकार - भावगीत, नयनांच्या कोंदणी
जूग - दोन किंवा अधिक सोंगट्या पटाच्या एका घरात एकदम येणे.
नरद - सोंगटी.
निकर - जोर / अतिरेक / पराकाष्ठा.
पोटघर - सोंगट्यांच्या पटावरचे एक घर.
आजची गोष्ट संगीत क्षेत्रातल्या दोन असामान्य व्यक्तींविषयीची आहे. दोघांचे संगीतातले प्रांत वेगळे पण स्थान अव्वल. एक म्हणजे सुगम संगीत क्षेत्राचे युगनिर्माते गायक–संगीतकार गजानन वाटवे आणि दुसरे भारतीय शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे महान गायक भारतरत्‍न पंडित भीमसेन जोशी. गोष्ट अगदी छोटी, आठवण स्वरुपात मोडणारीही असेल कदाचित पण भारतीय शास्त्रीय आणि सुगम संगीतावर निर्व्याज, निर्मळ प्रेम करणार्‍या तुमच्या–माझ्यासारख्या रसिकांसाठी खूपच हृद्य अशी !

१९७० च्या मध्यावरच्या काळातली ही आठवण मला सांगितली माझे परमस्‍नेही, प्रसिद्ध तबलावादक संजय पंडित यांनी.

१९५२ साली पुण्यात एक संगीत महोत्सव सुरु झाला, 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव'. आज प्रचंड लोकप्रिय असलेल्या या महोत्सवाची सुरवात शनिवार पेठेतल्या रा. स्व. संघाच्या 'मोतीबाग' या कार्यालयात झाली. कालांतराने जशी जागा पुरेनाशी झाली तशी या प्रतिष्ठेच्या महोत्सवाची सदशिव पेठेतील रेणुकास्वरूप विद्यालय आणि सध्या पुन्हा शनिवार पेठेतील रमणबाग प्रशालेचं भव्य पटांगण अशी ठिकाणे बदलत गेली. 'आर्य संगीत प्रसारक मंडळ' ही संस्था या महोत्सवाचं आयोजन करत असते ज्याचे सर्वेसर्वा पं. भीमसेन जोशी होते. आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा महोत्सव पंडितजींनी अतिशय श्रद्धेने सुरू केला होता. आपली आजची गोष्ट १९७० च्या दशकातील आहे जेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रेणुकास्वरूप प्रशालेत तीन सलग, पूर्ण रात्री चालायचा. मंडळाच्या प्रथेनुसार महोत्सव संपल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडळातर्फे एक श्रमपरिहाराचं भोजन आयोजित केलं जायचं. एके वर्षी असं श्रमपरिहाराचं स्‍नेहभोजन शनिवार पेठेतल्या विष्णुकृपा कार्यालयात आयोजित केलं होतं. भोजनाआधी एक सुगम संगीताची मैफल आयोजित केली होती आणि ती होती आद्य भावगीत गायक–संगीतकार गजानराव वाटवे यांची. त्या काळात अण्णांची म्हणजे वाटव्यांची मैफल म्हणजे हुकुमाचा एक्काच असायचा. तुडुंब गर्दीच्या अनेक मैफली अण्णांनी केवळ तबला–पेटीच्या साथीत जिंकल्या आहेत. पेटी ते स्वतःच वाजवायचे, कारण मैफलीत त्यांच्याच स्वतःच्या संगीत रचना वाजवणारा आणि पेटीवर उत्तम हात असणारा दुसरा कोण असणार ! याही मैफलीत ते स्वतः पेटीवर आणि तबल्याला संजय पंडित होते. मैफल अर्थातच खूप रंगली. अण्णांची सर्व लोकप्रिय गाणी झाली आणि मैफलीच्या सांगतेचे संकेत अण्णांनी दिले. तबल्याची साथ करणार्‍या संजय पंडीतांच्या थोड्याच अंतरावर रंगमंचावर श्रोत्याच्या भूमिकेत बसलेल्या खुद्द पंडितजींनी आपल्या भारदस्त आवाजात आग्रही मागणी केली, 'मोहुनिया तुजसंगे राहिलंय, ते घ्या.' खुद्द स्वरभास्कराची फर्माईश होती ती. ती पूर्ण केली तेव्हाच मैफलीची सांगता झाली.

'मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार' हे सारीपटाचं रूपक असलेलं कविवर्य राजा बढे यांचं अतिशय वेगळं, अप्रतिम असं प्रेमगीत आहे. सारीपटातल्या परिभाषेतले शब्द पाच कडव्यांच्या गीतात सर्वत्र खेळवले गेले आहेत. शब्दांची पारख असलेल्या अण्णांनी या सुंदर शब्दांना शिवरंजनी रागावर आधारलेल्या सुरांत इतकं अप्रतिम बांधलंय की गाणं ऐकताना स्तब्ध व्हायला होतं. उत्तम संगीतकार जेव्हा उत्तम गायकही असतो तेव्हा त्या रचनेवर त्याची पूर्ण हुकुमत असते. गाण्याच्या प्रेमात पडून दुसरा गायक ते गाणं गायला जातो खरा पण संगीतकार–गायकाच्या मूळ कलाकृतीपुढे खूप थिटा पडतो. 'मोहुनिया तुजसंगे..' च्या बाबतीत आणि अण्णांच्या इतर गाण्यांच्या बाबतीत असंच होतं. बरोब्बर हीच गोष्ट भीमसेनजींना जाणवली होती आणि म्हणूनच एका शास्त्रीय संगीतातल्या दिग्गजाने सुगम संगीतातल्या दिग्गजाची मैफल आयोजित केली. त्या महान कलावंताला दाद दिली आणि त्याचा मनापासून सन्मान केला.
पंडितजींनी अण्णांच्या साठीचा सत्कारही त्या वर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवात केला होता जेव्हा अण्णा. 'जगत मी आलो असा..' ही सुरेश भटांची गजल गायले होते. अशाच प्रकारची दाद, मान दुसरे दिग्गज पं. कुमार गंधर्व यांनीही वाटवेसाहेबांना दिला होता जेव्हा त्यांनी अण्णांच्या गाण्याची मैफल एके वर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या गावी, देवास येथे आयोजित केली होती. त्याही मैफिलीत संजय पंडितांनी अण्णांना तबल्यावर साथ केली होती.

संगीताच्या इतिहासात काही घट्ट जुळण्या आहेत. 'ऐ मोहब्बत तेरे अंजामपे रोना आया' म्हणजे बेगमसाहेबा अख्तर, 'याद पियाकी आये' म्हणजे बडे गुलाम आली खानसाहेब. 'चतुर सुगरा बालमवा' म्हणजे पं. भीमसेन जोशी अशा या काही प्रसिध्द जुळण्या आहेत. तशीच 'मोहुनिया तुजसंगे' म्हणजे गजानन वाटवे ! ही जुळणी तुम्हा–आम्हा रसिकांसारखीच भीमसेनजींनाही ओळखीची होती, प्रिय होती हे विशेष आहे. संगीत ही श्रेष्ठ कला आहे मग शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय वा सुगम. संगीतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या या मोठया कलाकारांनी जी एकमेकांना खुली दाद दिली, त्यातून सगळ्या कलाकारांनी खूप शिकण्यासारखं आहे. खरंच, हे सगळे महान कलाकार म्हणजे मानवरूपी दंतकथाच आहेत, आपल्याला प्रेरणा देणार्‍या, अपरंपार आनंद देणार्‍या, आपलं आयुष्य समृद्ध करणार्‍या !

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

  गजानन वाटवे
  रवींद्र साठे