तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥
थोर नवलाव जांला ।
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥
विंचु पाताळाशी जाय ।
शेष माथां वंदी पाय ॥३॥
माशी व्याली घार झाली ।
देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥
गीत | - | संत मुक्ताई |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव |
गीत प्रकार | - | चित्रगीत, संतवाणी |
माणसाजवळ आत्मविश्वास असायलाच हवा. तो आत्मविश्वास भक्तिमार्गाने गेल्यावर प्राप्त होतो. खर्या अर्थाने आध्यात्मिक असणारी व्यक्ती स्वतःला कधीच तुच्छ लेखणार नाही. जग भले तिला कितीही तुच्छ लेखू दे. ती मात्र स्वतःला कधीच तुच्छ लेखणार नाही. भक्तिमार्गाने गेल्यावर व्यक्तीच्या मनात केवढा आत्मविश्वास निर्माण होतो. संत मुक्ताबाईंचा काळ हा सातशे वर्षांपूर्वीचा ! त्या काळात स्त्रियांना समाजांत आणि कुटुंबात मानाचे स्थान नव्हते. त्यात संत मुक्ताबाई तर समाजाने 'सन्याशाची पोरं' म्हणून नाकारलेली होती. असे असतानाही भक्तिमार्गाने गेल्याने संत मुक्ताबाईंच्या मनात केवढा आत्मविश्वास निर्माण झाला होता, हे या अभंगातून स्पष्ट होते. काहीशा गूढरम्य पद्धतीने संत मुक्ताबाई माउलीने या अभंगात स्वतःचेच चित्रण केले आहे.
मुंगी उडाली आकाशीं ।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥
इवलीशी मुंगी आकाशात उडाली आणि तिने सूर्याला गिळिले, असे मुक्ताबाई माउली सांगते. मुंगी हे मुक्ताबाई माउलीचे स्वतःचेच प्रतीक आहे. आध्यात्माच्या क्षेत्रात गेल्याने मुंगीसारखी सामान्य असणारी मुक्ताबाई माउली उंच आकाशात गेली. म्हणजेच तिने मोठे कर्तृत्त्व गाजविले, हे मुक्ताबाई माउलीला सांगायचे आहे. मुक्ताबाई माउलीने सूर्याला गिळून टाकले, असे ती सांगते. सूर्य हे परमात्म्याचे प्रतीक आहे. मुक्ताबाई माउलीने त्या परमात्म्यालाच गिळून टाकले आहे. म्हणजेच ती परमात्म्याशी एकरूप झाली आहे. परमात्म्याइतकीच महान झाली आहे. मुंगी हे जसे मुक्ताबाई माउलीचे स्वतःचे प्रतीक आहे तसेच ते सर्वसामान्य व्यक्तीचे प्रतीक आहे. आध्यात्माच्या क्षेत्रात गेली तर कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती खूप मोठी झेप घेऊ शकते, हे मुक्ताबाई माउलीला सांगायचे आहे.
थोर नवलाव जांला ।
वांझे पुत्र प्रसवला ॥
वांझेला पुत्र होणे म्हणजेच जेथे मुळात सृजनशीलता नाही, तेथे सृजनशीलता निर्माण होणे ! मुक्ताबाई माउली स्वतःच सृजनशील झाली आहे. आध्यात्माच्या प्रांतात गेल्यावर मुळात सृजनशील नसणारी व्यक्तीही सृजनशील बनू शकते, हे तिला सांगायचे आहे ते ! संत एकनाथ माउलीच्या निर्वाणाची वेळ आली तेव्हा त्यांचे 'भावार्थ रामायण' अपुरे होते. ते पुरे कोण करणार असा प्रश्ण निर्माण झाला. मग संत एकनाथ माउलीने 'गावबा' नावाच्या अडाणी, गावंढळ शिष्याच्या माथ्यावर वरदहस्त ठेवले. गावबाने त्यांचे भावार्थ रामायण पूर्ण केले. अगदी संत एकनाथ माउलीच्या तोडीची काव्य रचना त्याने केली. आध्यात्माच्या प्रांतात गेल्यावर निर्बुद्ध मानली गेलेली व्यक्तीही अशी सृजनशील बनत असते.
डॉ. जोगेश्वर नांदुरकर
सौजन्य- दै. नवशक्ति (प्रकाशन दिनांक अनुपलब्ध.)
(Referenced page was accessed on 18 April 2017)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.