A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मूर्तिमंत भीति उभी

मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली ।
वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं ॥

दाखवावयास मला तात नेत त्याकडे ।
राक्षसा रुचेल का पहावया जसा बली ॥

(तू दिलास जन्म मला, पाजलीस प्रेम सुधा
पाजुनी तरी विषास देई मरण माउली)[१]
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वराविष्कार- बालगंधर्व
लता मंगेशकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - शारदा
राग - भीमपलास
चाल-बात हाकरहीजे जबानसे
गीत प्रकार - नाट्यसंगीत, चित्रगीत
  
टीप -
• [१] - शारदा चित्रपटातील दुसरे कडवे
• स्वर- बालगंधर्व, संगीत- गो. ब. देवल.
• स्वर- लता मंगेशकर, संगीत- शंकरराव कुलकर्णी, चित्रपट- शारदा (१९५१).
'शारदा' नाटकाचा विषय आणि आजपर्यंतच्या संगीत नाटकांचे विषय हे एकमेकांपासून भिन्‍न आहेत. 'शारदा' नाटकाचा विषय लौकिकी- अर्थात् प्रचलित- विषयांपैकीं होय. तेव्हा त्याचे प्रयोग पाहून किंवा तें वाचून त्याबद्दल चर्चा सुरू होणारच होणार असें, रा. देवल यांनी कृपा करून मला आपलें लेखी पुस्तक वाचण्यास दिलें तेव्हांच वाटलें.

अशा विषयावर संगीत नाटक लिहिलें कीं, हा विषय संगीतास योग्य आहे किंवा नाहीं येथपासूनच आक्षेपांस सुरुवात होते. परंतु पक्ष्यांच्या पंखांस भरार्‍या मारण्यास केवळ आकाश मात्र उपयोगी, तशी कवीच्या प्रतिभारूप पंखांची गोष्ट नव्हे. तिला अगम्य किंवा अगाध असें कांहींच नाहीं. अमुक एक विषय कवीनें कल्पनाचित्र रेखाटण्यास योग्य आणि अमुक एक नाहीं, असें कोण म्हणेल? जें नसेल तें कल्पनेनें अस्तित्वांत आणून, त्याला चिरस्थायित्व आणणें व नांव देणें एवढेच कवीचें कार्य नव्हे; तर जें अस्तित्वांत आहे, परंतु ज्या विषयाचें महत्त्व साधारण जनांस कळत नाहीं किंवा कळलें तरी तें जाणून त्यांचें मन त्या संबंधांत जसें वळावें तसें वळत नाहीं, अशा विषयाचेंसुद्धां चित्र रेखाटून, पाहणारास थक्क करून सोडणें हेंहि कवीच्या प्रतिभेचेंच एक लक्षण होय. त्यांतहि सृष्टिसुंदरीचें रूप बरोबर प्रतिबिंबित होईल अशा रीतीनें आदर्श धरणें हें जें नाटकाचें लक्षण तें मनांत आणलें म्हणजे नाटककाराच्या प्रतिभेचा प्रदेश किती सार्वजनिक आहे, हें सहज कोणाच्याहि लक्षांत येणार आहे. नाटक लिहिण्यास अमुक एक विषय योग्य आणि अमुक अगदी अयोग्य, असें म्हणणें म्हणजे शुद्ध कोत्या बुद्धीचें लक्षण होय.

वस्तुतः पाहतां आपला हा सर्व संसार - सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, मासारंभापासून मासान्तापर्यंत, वर्षाच्या सुरुवातीपासून अखेरीपर्यंत, किंबहुना ह्या जगांत आपण प्रवेश केल्यापासून निष्क्रमण करीपर्यंत, हा आपला आयुष्यक्रम- म्हणजे एक विविध प्रसंगांनी भरलेलें अद्भुत नाटकच होय. आपल्यापुरतें पाहतां, हया नाटकांतील नायक आपण व आपल्या अनुषंगानें असणारी इतर मंडळी इतर पात्रें होत. तथापि रंगभूमीवर असतांना, चाललेल्या प्रसंगांशी तादात्म्य झाल्याकारणानें, आपलें खरें स्वरूप विसरून जाणार्‍या उत्तम नटाप्रमाणें आपली स्थिति झालेली असते. यामुळें त्या नाटकांतहि आपलें बनविलेलें रूप पाहण्यास आपल्यास आरसा लागतो. तो आरसा आपल्यापुढें धरल्यानेंच आपलें कुठे काय चुकतें, हें आपणांस समजणार आहे. हा आरसा कवि व नाटककार आपल्यापुढे धरतात.

'शारदा' नाटक हें अशा प्रकारच्या हेतूनेंच कवीनें लिहिलें आहे. ज्यांचा विषय लौकिक नाहीं अशा शाकुंतलादि नाटकांप्रमाणें शृंगार-वीरादि नवरसांचें अत्यंत उदात्त स्वरूप किंवा अद्भुत प्रसंगांनीं खचिल्याकारणानें वाचकांची जिज्ञासा सदैव जागृत ठेवणारे प्रवेश या नाटकांत नाहींत ही गोष्ट खरी, परंतु सौंदर्याची परिसीमा उदात्तपणांत मात्र होते, आणि सौम्यपणांत होत नाहीं, उदात्त रूप तेवढेच मात्र रमणीयतेचें स्वरूप आणि सौम्य रूप तें रमणीयतेचें स्वरूप नव्हे, असें कोण म्हणेल?

अघोरघंटाच्या हातून मालतीस किंवा केशी दानवाच्या हातून उर्वशीस सोडविणार्‍या माधवाचें व पुरूरव्याचें साहस एका दृष्टीनें वीररसमय, तर अन्य दृष्टीनें पाहतां निष्ठुर व मांगहृदयी बापानें विक्रय करून प्रेताशीं आजन्म जखडून टाकण्याच्या बेतांत आणलेल्या शारदेला ऐन प्रसंगीं सोडविणार्‍या कोदंडाचेंहि साहस आमच्या तोंडून शाबास म्हणणून घेतल्याखेरीज राहतें काय? सर्वथा ज्याचा तिला द्वेष, अशा दुर्योधनाशीं आतां आपला विवाह होणार म्हणून विव्हल होऊन आपल्याशींच आक्रोश करणार्‍या सुभद्रेचा करुणामय शोक जर कंठ दाटून आणतो, तर ज्याची आपण नात

शोभूं अशा व बहात्तर रोगांनीं ग्रासल्याकारणानें एक पाय घरांत आणि दुसरा स्मशानांत पडलेल्या भुजंगनाथाशीं लग्‍न होऊन आपल्या जन्माचें मातेरें होणार असें वाटून फोडलेली शारदेची हृदयभेदक किंकाळी डोळयांतून घळघळां पाणी आणण्यास सोडील काय?

म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान । लग्‍ना अजुनि लहान ॥

असें वल्लरी आणि जान्हवी यांनी तिच्या भावी पतीचें वर्णन करून शारदेचा मर्मभेदी विनोद चालविला असतां जरी आपणांस हंसूं आलें, तरी बिचार्‍या शारदेच्या आधींच सचिंत अशा मुखावर दर शब्दागणिक अधिकाधिक येत चाललेला म्लानपणा पाहून मन अतिशय उद्विग्न झाल्याखेरीज राहतें काय? तिच्या बापाच्या मनांत असावयास पाहिजे, परंतु नाहीं, ती वत्सलता आपस्या मनांत उत्पन्‍न होत नाहीं, असें कोण म्हणेल? भुजंगनाथाचा पावलोपावलीं नजरेस येणारा मूर्खपणा,

प्रातःकाले शिवं दृष्ट्वा निशी पापं विनश्यात ।

असें म्हणून आपल्या पापास मनाआड करणार्‍या दांभिक व रुद्राक्षकुंडलधारी भद्रेश्वराची नीच स्वार्थदृष्टि.

दिल्या तरुणां तरि होती किती रंडा ।

असें म्हणून अंगावर शहारे आणणार्‍या कांचनभटाची आत्यंतिक द्रव्यलोभदृष्टि, सुवर्णशास्त्री वगैरे मंडळींचा तोंडपुजेपणा इत्यादि प्रकार पाहून केव्हां परमावधीचें हंसूं येतें, केव्हां संतापाचा अतिरेक होतो, केव्हां तिरस्काराचा कडेलोट होतो आणि शेवटीं त्या सर्वांस आपापल्या कर्माप्रमाणें फळें मिळालेलीं पाहून फार संतोष होतो, यांत तिळमात्र संदेह नाहीं. केवळ मनोरंजन हाच कांहीं नाटक-काव्य-कथा इत्यादिकांचा हेतु नव्हे, तर वस्तुस्थितीचें हुबेहुब चित्र दाखविणें व लोकमत शिक्षित करणें हा एक हेतु होय. तो हेतु एका विषयासंबंधानें 'शारदा' नाटकांत सर्वथा साधला आहे, याबद्दल मतद्वैत असण्याचा संभवच नाहीं. हया नाटकांतील कथानक रोजच्या अनुवांतले असून त्यास कवीनें चित्ताकर्षक स्वरूप दिलें आहे. चंद्रापीड आणि कादंबरी, पुंडरीक आणि महाश्वेता यांच्या प्रेमाच्या परिपाकाचें चित्र काढण्यासाठी केव्हां केव्हां पृथ्वीवरून स्वर्गांत जाऊन तल्लीन झालेल्या कवीनें, शारदेसारख्या दीन गाईस, भद्रेश्वरासारख्या दुष्टांच्या पापांस भुलून गेलेल्या कांचनभटासारख्या निष्ठुरानें, कसायास विकली असतां सोडविण्याकरितां तिकडे धांव घेतली, हें खरोखर फार अभिनंदनीय होय. प्रस्तुत नाटक रंगभूमीवर वारंवार होत गेल्यानें फार चांगला परिणाम होईल यांत शंका नाहीं. आणि तो होतो हें स्वतः हा लेख लिहिणाराने पाहिले आहे.

पन्‍नाशीची झुळुक लागली, बाइल दुसरी करूं नको.

ही दसलाखाची गोष्ट कोणाच्या मनांत ठसणार नाहीं? नाटकांतील कित्येक पद्यें प्रसादगुणानें इतकीं भरलीं आहेत कीं, तीं लवकरच ज्याच्या-त्याच्या तोंडीं होतील याबद्दल संशयच वाटत नाहीं. मुंबईस दोनच प्रयोगांनी तो परिणाम झालेला प्रत्यक्ष पाहुण्यांत आला आहे. तेव्हां सरतेशेवटच्या भरतवाक्यांत कवीनें दर्शित केलेली इच्छा लोकांकडून पूर्ण होवो, असें इच्छून ही प्रस्तावना पुरी करतों.
(संपादित)

हरी नारायण आपटे
दि. ९ जुलै १८९९
'संगीत शारदा' या नाटकाच्या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- त्रिंबक विष्णू परचुरे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  बालगंधर्व
  लता मंगेशकर