A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ना तुलना तव वचना

ना तुलना तव वचना ।
सफलता फुलतां नता ललना ॥

मानितां मम भावना ।
त्यागितां इतरे जनां ।
रविकिरण प्रखर तरी दिपुनि जात तव वदना ॥
गीत - य. ना. टिपणीस
संगीत - वझेबुवा
स्वर- बकुळ पंडित
नाटक - नेकजात मराठा
राग - कानडी-काफी
ताल-त्रिवट
गीत प्रकार - नाट्यसंगीत
महाराष्ट्रांतील प्रेक्षकांच्या रसिकतेमुळे आणि नाटकाच्या रम्यतेमुळे 'नेकजात मराठा' या नाटकाची सातवी आवृति संपून आठवी काढण्याची संधी मला मिळत आहे, हें खरोखर माझें सद्भभाग्य आहे. जवळ जवळ गेलीं सत्तेचाळीस वर्षे हें नाटक महाराष्ट्राचें मनरंजन करीत आहे, आणि या पुढेंहि सदैव हे करीत राहील.

आतां जरी हें नाटक 'नेकजात मराठा' या नांवानें ओळखले जातें, तरी या नाटकाचें मूळचें नांव 'चंद्रग्रहण' हें आहे. ह्याच नांवानें तें १९१७ साली रंगभूमीवर आलें आणि दोन तीन प्रयोगांतच तें लोकप्रिय झालें. माझे वडील कै. यशवंतराव उर्फ आप्पा टिपणीसांनीं 'आर्यावर्त नाटक मंडळी'च्या द्वारा सदर नाटक रंगभूमीवर आणलें, आणि स्वतः त्यांत त्यांनीं शिवाजीची भूमिका केली. त्यांचें शिवाजीचें काम नमुनेदार होत असे, असें मला अनेक लोकांनी सांगितलें आहे. 'चंद्रग्रहण' नाटक ज्या वेळीं रंगभूमीवर आले, त्या वेळीं 'आर्यावर्त नाटक मंडळी'ची आर्थिक स्थिती अगदींच मामुली होती; आणि त्यांना सजावटीवर खर्च करणे शक्य नव्हतें. पण कै. आप्पांनी न डगमगतां मोठ्या काटकरीनें वेषभूषा व सिनसिनरी स्वतःच्या देखरेखीखालीं तयार करून, कुठल्याहि प्रकारें त्या बाबतींत उणीव भासूं दिली नाहीं. नाटकांतील प्रसंगाचा चटकदारपणा आणि शिवाजीचें धीरगंभीर काम हेंच त्या नाटकाचें भांडवल होतें. शिवाजीचें एक एक वाक्य म्हणजे चलतें नाणें होतें. प्रेक्षक तें ऐकण्यासाठीं कान टवकारून तत्परतेनें बसत असत. आज जी शिवाजीची वेषभूषा आपल्याला रंगभूमीवर दिसत आहे ती कै. आप्पांनी संशोधन करून, प्रयोग करून, रंगभूमीवर आणली आहे. आप्पांच्या मृत्यूनंतर श्री. पुरुषोत्तम रामचंद्र लेले यांनी नवयुग साप्ताहिकांत 'यशवंत नट' म्हणून लेख प्रसिद्ध केला होता.

चंद्रग्रहणांतील शिवाजीची भूमिका तर नमुनेदारच होती. लॉर्ड सिडेनहॅमनें जो शिवाजी रंगभूमीवरून जवळ जवळ हुसकून काढला होता, त्यास आप्पांनी नाटक लिहून आणि स्वतः सोंग घेऊन, रंगभूमीवर पुनः प्रस्थापित केला.

आणखी कांही काळ गेल्यानंतर, कै. बापूसाहेब पेंढारकरांनी नवीन चाली देऊन, नवीं पर्दे करून घेऊन हें नाटक बसविलें, त्या वेळी त्याचें नांव बदललें. तेव्हांपासून हें नाटक 'नेकजात मराठा' या नांवानें ओळखलें जात आहे. विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे 'शिवराज' व 'ललितकलादर्श' या दोन्हींहि कंपन्या संगीतप्रधान नाटकें करणार्‍या असून, शिवाजीच्या कामाकरतां गायकच नट घेऊन, मग त्याच्या तोंडीं आतां तुम्हीं गाणीं घालाच, असा आग्रह त्यांनी आप्पांना केला नाही. आप्पांनी रंगविलेला शिवाजी गद्य नट घेऊनच त्यांनी साकार केला, ही होय !

आणखी एक गोष्ट नमूद करण्यास मला अभिमान वाटतो. सदर कथानकावर 'शककर्ता शिवाजी' ह्या नांवानें बोलपट निघाला होता व तो अत्यंत लोकप्रियही झाला. आज सत्तेचाळीस वर्षे या नाटकाला झाल्यावरहि अनेक नाट्यसंस्था नव्या नाटकाच्या दिमाखानें या नाटकाचे प्रयोग सादर करीत आहेत. हें भाग्य फारच थोड्या नाटककारांना लाभर्ले आहे असें म्हटल्यास तें अतिशयोक्ति ठरणार नाहीं !

पूर्वीच्या आवृत्तीबरहुकूम ही आवृत्ती काढली आहे, ती रसिकांनी मान्य करून घ्यावी, ही विनंती.
(संपादित)

सौ. आशा श्रीकांत सुतार (कुसुम यशवंत टिपणीस)
'नेकजात मराठा' या नाटकाच्या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- त्रिंबक विष्णु परचुरे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.