A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नभ उतरू आलं

नभ उतरू आलं
चिंब थर्थर वलं
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरात.

अशा वलंस राती
गळा शपथा येती
साता जल्माची प्रीती
सरलं दिनरात.

वल्या पान्यात पारा
एक गगन-धरा
तसा तुझा उबारा
सोडून रीतभात.

नगं लाघट बोलू
उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालूऽ
तुझ्याच पदरात.
१९ मार्च १९७७ - गुढीपाडव्याला 'प्रभुकुंज'वर (मंगेशकर कुटुंबियांचे घर) मुख्य दालानात गो. नि. दांडेकर यांच्या कादंबरीवरील 'जैत रे जैत' चित्रपटाची बैठक चालू होती. "मी रात टाकली" हे पहिलं गीत लिहून झालं होतं. त्याच दिवशी दुपारी पं. हृदयनाथ म्हणाले, "या चित्रपटातील सोळा गाण्यात मी कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. पण एका गाण्यासाठी वजन देतो, लिहू शकता?"
'तम चढत आहे । रात वाढत आहे । कुणी करीत आहे । मधुर अभिसार ।'

मला संगीताच्या क्षेत्रातलं थोडंही ज्ञान नाही. खूप ऐकून ऐकून मी परिपूर्ण तयार झालो. देऊ शकलो. अठ्ठावीस अक्षरांच्या ओळींचा हा मुखडा म्हणजे निस्सीम प्रेम, शारीर प्रेम, निसर्गात उघड्यावर मनमुक्त, सगळं बेभान. तसाच भुई-आकाशाचा मिलनाचा, सुंदर सृष्टीचा देखणा असा परिसर.
नभ उतरू आलं
चिंब थर्थर ओलं
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरात.

आशाताईंनी हात वर केला. हे त्यांचं गाणं असं पक्कं झालं. दोन दिवसांत 'ठाकर', 'पीक करपलं', 'कोण्या राजानं',.. कच्चंपक्कं झालं.
हा गुडीपाडवा माझ्या नव्या वळणाच्या आयुष्याला बळ देणारा ठरला. इतकी प्रतिभावंत माणसं जोडली गेली. एका नव्या विश्वात मला घेऊन गेली. आयुष्याभराचे ऋणानुबंध बांधले गेले.
(संपादित)

ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.