A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नभि हसली चन्‍द्रिका

नभि हसली चन्‍द्रिका, चकोरा
झुरशी तू परि मनी कशाला

मोहजाली रमवुनी जिवाला
वंचिल तुजला चंचल बाला
सोड प्रीतीचा घातुक चाळा
छंद विषारी हा खरा
चकोर - चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी.
चंद्रिका - चांदणे.
वंचना - फसवणूक.
गाण्याची ओढ लागलेल्या अवस्थेतच आमच्या गावात (नगर) जे.एल. रानडे नावाचे एक गृहस्थ कोर्टात कारकून म्हणून नोकरीला आले. ते उत्तम गात. किंबहुना गाण्यामुळेच त्यांना ही नोकरी मिळाली होती. कारण नगरचे त्यावेळचे जिल्हा न्यायाधीश मिस्टर क्लेमंट हे गानवेडे होते. परदेशीय म्हणजे इंग्रज असूनही त्यांना भारतीय संगीतात रस होता. पाश्चिमात्य संगीताचा त्यांचा अभ्यास तर सर्वश्रुत होता. त्यांनी पाश्चिमात्य संगीतावर पुस्तकंही लिहिली होती. अशा या क्लेमंटसाहेबामुळे रानडे यांचं बस्तान नगरला उत्तम बसलं आणि आम्हा नगरकरांचा गाण्याकडे पाहण्याचा, गाणे ऐकण्याचा, गाणे म्हणण्याचा दृष्टिकोन जास्त रसेला झाला. गोड गाण्याचा वस्तुपाठच त्यांनी नगरकरांना दिला म्हणानात. माझी तर चंगळच झाली, कारण ते नंतर आम्ही राहत असलेल्या देशपांड्यांच्या वाड्यातच राहायला आले.

जे.एल. रानडेः आम्ही त्यांना तात्या म्हणत असू. त्यांच्या मैफली अगदी नेटक्या असत. आजच्या मैफलीत आपण काय गाणार आहोत याचा आलेख असलेली एक पत्रिकाही छापलेली असे. श्रोत्यांना ती गाण्याचे आधी वाटली जाई. मला वाटतं इतकी शिस्तबद्ध मैफिल करणारे ते एकमेव गायक होते. सुरुवातीला आटोपशीरपणे मांडलेला एक मोठा ख्याल, त्यानंतर मध्य लयीतील चीज. मग त्यांची लोकप्रिय गाणी. मध्यंतरानंतरही हाच क्रम.

माझा आवाज आणि अंदाज छान आहे हे तात्यांच्या लक्षात आलं असावं आणि म्हणून मला अधूनमधून शिकवायचंही त्यांनी मान्य केलं होतं.

या गोड गळ्याच्या तात्यांचं गाण्यातलं दैवत होतं हिराबाई बडोदेकर. त्यांच्या घरी एक ऑर्गन होता. त्यावर हिराबाईचा फोटो विराजमान झालेला असे. अशा तात्यांच्या सान्‍निध्याने आमचे खूप फायदे झाले. त्यांनी फारसं शिकवलं असं नाही. पण आमच्या गाण्यातली रसवत्ता त्यामुळे वाढली, हे मात्र नक्की.
(संपादित)

राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.