A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाचनाचुनी अति मी दमले

नाचनाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला!

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची कंठि घातली माला

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीति नूपुर पायी, कुसंगती करताला
लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवर आला-गेला

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट- जगाच्या पाठीवर
गीत प्रकार - चित्रगीत
अनय - कपट, अन्याय.
कटि - कंबर.
कुंडल - कानात घालायचे आभूषण.
निसुग - आळशी / निर्लज्ज.
विषयवासना (विषय) - कामवासना.