गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार
ओठ जरी हे माझे होते
सूर उरी हे तुझेच होते
तुझ्यावाचुनी जीवन माझे करूण आर्त उद्गार
स्वप्नावाचुन आता डोळे
चंद्रावाचुन अंबर काळे
वाट तृषेची कठीण, नसता जवळ मेघमल्हार
सरले दिन ते मंतरलेले
पुन्हा परीची शिळा जाहले
तुझ्यामुळे मी वीज जाहले, तुझ्यामुळे अंधार
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | वाणी जयराम |
राग | - | चारुकेशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
नच साहवतो हा भार
गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार
वाणी जयराम यांची भाषा मराठी नसल्याने त्या गाण्याचा अर्थ त्यांना समजावून सांगणे, शब्दांचे उच्चार पण मराठी पद्धतीने करून घेणे, हे कामही मला करावे लगले. त्या गाण्याची चाल शास्त्रीय रागावर आधारित होती. चारुकेशी या रागाचा आधार घेतला होता. तीन तालापेक्षा पंजाबी अध्धा ठेका मी वापरला. 'नच साहवतो हा भार' असं म्हणताना तो भार मला सहन होत नाही ही आगतिकता दाखवयची होती. 'गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार' यातील आर्तता दाखवणारा गंधारचा स्वर जाणवला पाहिजे, अशी कल्पना होती. पण गंमत अशी आहे की, संगीतात 'सा' व 'प' हे अचल स्वर आहेत व बाकीच्या प्रत्येक स्वरांना जोडीदार आहे. त्यात गंधार हा जो स्वर आहे, त्यात शुद्ध गंधारला कोमल गंधारापेक्षा जास्त महत्त्व आहे. बहुतेक रागांमध्ये शुद्ध गंधारला जेवढी धार आहे तेवढी कोमल गंधारला नाही. कोमल गंधारमध्ये कोमलता दिसते पण गंधारची धार शुद्ध गंधारमध्येच जाणवते. तसा गंधार मला या गाण्यात दाखवायचा होता व तोही समेवर. गाण्याला यमक छान होतं. त्यामुळे चाल करताना मी काही 'अ'काराच्या जागा आखल्या होत्या व तालात ॲडजस्ट केल्या होत्या. त्या समेवर येणार्या गंधाराच्या अगोदर व नंतर त्या जागेची जी आस आहे ती आस संपूर्ण भरून, त्या रागाला शोभण्यासारखी स्वररचना केली होती.
मला हेच सांगायचंय की गाण्याच्या रेकॉर्डिंगचं काम फार कठीण असतं. चाल करताना आपल्या मनात काही कल्पना असतात. पण गायकाला आपल्या आवाजामार्फत तो गाण्याचा भास व भावना प्रकट करायच्या असतात. त्या चालींची जी ताकद आहे ती त्यात गायकाला दाखवायला लागते. तर झालं काय की, वाणी जयराम यांची भाषा मराठी नसल्याने त्यांच्यावर एक प्रकारचे दडपण आलेलं मला जाणवत होतं. दोन-तीन वेळा रेकॉर्डिंग करूनही समाधान होत नव्हतं. मध्येच कुठेतरी दक्षिणी हेल यायचा. नंतर मला जाणवायला लागलं की पुन्हापुन्हा गाणं म्हणून त्यांच्या आवाजावर परिणाम व्हायला लागला होता. आवाजाची धार बोथट व्हायला लागली होती व अजून जर तेच तेच गायला लावलं तर त्यांचा आवाज बरोबर राहणार नाही. म्हणून मग मीच म्हटलं, "ठीक आहे. आपण दुसरं गाणं घेऊया !" तर त्या म्हणाल्या, "तुमच्या दृष्टीनं हे गाणं कसं झालं? ओके झालं का?" त्या गायिकेला वाईट वाटू नये म्हणून मी 'ओके' झालं असं म्हणालो. पण गायिका हुशार होती. दुसरं जे गाणं आम्ही केलं ते लाईट गाणं होतं. त्या गाण्यात पहिल्यासारखे अवघड बारकावे व सुरावट नव्हती. ते गाणं हलकंफुलकं होतं. नुसती शब्दांची फेक व चालीलाही सरळ होतं. ते गाणं रेकॉर्डिंगला ओके झालं. ते होतं-
प्रियतम दर्शन देई
तुजविण करमत नाही
त्यानंतर वाणी जयराम यांनी मला सांगितलं, "तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की, आपण अगोदरचं जे गाणं घेतलं ते परत घेऊया. ते गाणं माझ्या मनासारखं झालेलं नाही पण तुमच्याही मनासारखं अजिबात झालेलं नाही, हे मला माहित आहे." मग ते 'नच साहवतो हा भार' हे गाणं परत रेकॉर्डिंगला घेतलं. 'दूर आज गंधार' हे म्हणताना मधल्या ज्या जागा होत्या त्यात एक तानेसारखी जागा लयकारीची होती.
'सा रे गरे रेरे गमप' असं पटकन जायचं अन् सहजपणे गंधारवर यायचं ते समेवर; अशा प्राकरची बिकट हरकत होती. पण त्या गायिकेने अतिशय तन्मयतेने व खूप मेहनत घेऊन ती जागा उत्तम प्रकारे घेतली. मग ते गाणं ओके झालं.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.